लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कर्ज देण्याबरोबरच औषधोपचार, घरदुरुस्ती, वाहनखरेदी यांसह आता यात्रा आणि सहलींसाठीही कर्ज देण्याची अभिनव योजना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आणली आहे. त्यामध्ये कमीत कमी दीड लाख तर जास्तीत जास्त सात लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तारण म्हणून जमीन ठेवावी लागणार आहे.

‘पीडीसीसी’ बँकेने ‘बळीराजा मुदती कर्ज योजना’ आणली आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण येते. त्यामुळे ते सावकारांकडून व्याजाने कर्ज घेत असतात. त्यामुळे ते कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या घटना घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी बँकेने ही योजना तयार केली आहे. त्यामध्ये शेतकरी सभासदांना त्यांच्या शेती अनुषंगिक खर्चासाठी कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या देखभालीसाठीही कर्ज मिळू शकणार आहे. शेतकरी आजारी पडल्यास औषधोपचारासाठी खर्च करताना अडचण येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांपुढील खर्चाची चिंता मिटणार आहे.

आणखी वाचा-पुण्यात यंदा घर खरेदीला अच्छे दिन! देशात पटकावला दुसरा क्रमांक

घराची दुरुस्ती, गृहपयोगी वस्तुंची खरेदी, संगणक खरेदी, दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी किंवा यासाठीही या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विवाहासाठी पैशाची चणचण असल्यास या कर्जयोजनेचा हातभार लागणार आहे. या योजनेमध्ये यात्रा आणि सहली यासाठीही कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने दीड लाख ते सात लाख रुपयांपर्यंत कर्ज काढून शेतकऱ्यांना यात्रा आणि सहलींला जाऊन मजा करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले, शेतकऱ्यांना अत्यावश्यक खर्चासाठी पैशाची गरज असते. पैसे नसल्याने ते खाजगी सावकार किंवा नागरी बँक, नागरी पतसंस्थांकडून जास्त व्याजदाराने कर्ज घेतात. तेच भिशी योजना, चिट फंडासारख्या योजनांद्वारे जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांना सहज आणि तत्पर कर्ज मिळावे, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बँकेच्या शेतीकर्ज विभागामार्फत विविध कार्यकारी संस्था या थेट शेतकऱ्यांना प्रति एकरी दीड ते सात लाखापर्यंत कर्ज पुरवठा करणार आहेत.