News Flash

कशी करायची कच्छी दाबेली? | How to make Kutchi Dabeli

खमंग चवीचा, सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ

Kutchi Dabeli : कच्छी दाबेली

घरातला मूड आज जरा वेगळाच होता. नेहमीचं हसरं खेळतं वातावरण कुठेतरी गायब झालं होतं. वातावरणातला तणाव जाणवत होता. वंदनाला आज कुठे बाहेर जायचं नव्हतं, म्हणून ती घरीच होती, पण संजना घरी आल्यापासून तिचं काहीतरी बिनसल्याचं जाणवत होतं. वंदना बोलायला गेली नाही, कारण अशा तणावाच्या प्रसंगी बाबाला पुढे करायचं, हे तंत्र तिला गेल्या काही वर्षांत अवगत झालं होतं. बाबानं मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. संजनाच्या खोलीत जाऊन तो तिच्याशी नक्की काय बोलला, हे वंदनाला कळलंच नाही. तू आम्हाला काही विचारायचं नाहीस, हे त्यानं तडजोडीच्या आधीच बजावलं होतं आणि अनिवार इच्छा होऊनही तिला या कराराचा भंग करायचा नव्हता. कारण ब्रह्मास्त्र एकदाच वापरण्याची संधी असते, याची तिला कल्पना होती. बराच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर काहीतरी तोडगा दृष्टिपथात आल्याचं जाणवलं. “आता अकरावीत जायला लागलीस, तरी घरात काही मदत करत नाहीस. आई एकटीच मरमर मरते, याचं तुला काहीच देणंघेणं नाही,` हे वाक्य संजनाला जरा लागलं होतं. त्यापेक्षाही `दिवसभर व्हॉटस अप, फेसबुक आणि तुझ्या फ्रेंड सर्कलमध्येच असतेस,` हे जास्त जिव्हारी लागलं होतं, हेही तिला हळूहळू समजलं. याच्यावर तोडगा काय आणि कसा निघणार, याची तिला उत्सुकता होती. तो दृष्टिपथात आला. वंदनाला काही वेळ बेडरूममध्ये टीव्ही बघत बसायला सांगून संजना तिच्या बाबांबरोबर किचनमध्ये घुसली. रागावून का होईना, पोरीनं घरकाम मनावर घेतलं, या कल्पनेनंच वंदना खूश झाली होती. थोड्यावेळानं किचनमधून खमंग वास सुटला आणि वंदना न राहवून किचनकडे धावलीच. दोघांनी मिळून घरात चक्क कच्छी दाबेली केली, याचा तिला प्रचंड आनंद झाला. तिघांनीही त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. वंदनाने संजनाला मिठी मारून तिचं कौतुक केलं, जरा जास्त बोलल्याबद्दल वाईटही वाटल्याचं सांगितलं. संजनानं तिला `जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी` छाप लूक दिला. “पुढच्यावेळी ह्या समोरच्या गाडीवाल्याकडूनच आणत जाऊ आपण कच्छी दाबेली. त्या अलीकडच्या चौकातल्यापेक्षा ही जास्त टेस्टी आहे!“ एका बेसावध क्षणी बाबा बोलून गेला आणि पुढच्याच क्षणी दोघांनी तिथून पळ काढला.

साहित्य


 • ६ – ८ लादी पाव
 • २ मध्यम उकडलेले बटाटे
 • ३/४ वाटी डाळिंबाचे दाणे
 • १० ते १२ द्राक्षे
 • ३/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
 • १/२ वाटी रोस्टेड मसाला शेंगदाणे
 • बारीक शेव
 • १ १/२ टेस्पून दाबेली मसाला
 • १/२ टिस्पून चाट मसाला
 • २ टिस्पून तेल
 • हळद
 • तिखट
 • हिरवी चटणी
 • चिंचगूळाची चटणी
 • कच्छी दाबेलीचा मसाला
 • २-३ लाल-सुक्या मिरच्या
 • २-३ दालचिनीच्या काड्या
 • ३-४ लवंगा
 • १ /२ चमचा धणे
 • १/२ चमचा बडीशेप
 • १/२ चमचा काळीमिरी
 • १ चक्रीफुल
 • १ तमालपत्र

पाककृती


 • बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा.
 • प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.
 • उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.
 • कढईत तेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ १/२ टेस्पून दाबेली मसाला घालावा. मिश्रण ढवळावे.
 • नंतर किसलेला बटाटा घालावा. चवीनुसार मीठ घालावे.
 • थोडी हळद, तिखट घालावे. त्यानंतर थोडे पाणी घालून एकजीव करून घ्यावे.
 • चांगले शिजले कि गॅसवरुन खाली उतरावे.
 • एका ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली द्राक्षं, डाळींबाचे दाणे आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे.
  थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
 • आता पावाला काप द्यावा. त्यात एका बाजूला चिंचगूळाची चटणी आणि दुसर्‍या बाजूला हिरवी चटणी लावावी. मध्ये बटाट्याचे तयार सारण घालावे. अजून हवे असल्यास थोडे डाळींबाचे दाणे, रोस्टेड शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.
 • तव्यावर १/२ टिस्पून बटर घालून त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी.
 • नंतर दाबेलीची तिन्ही बाजूची किनार बारीक शेवमध्ये बुडवून गरम गरम खायला द्यावी.
 • मसाला पाककृती
 • सर्व साहित्य एकत्र करुन कोरडेच भाजावे.
 • थंड करून मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करावी.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

एकूण वेळ : ३५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ३ ते ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:15 am

Web Title: how to make kutchi dabeli maharashtrian recipes
Next Stories
1 कसे करायचे मेथी शंकरपाळे? | How to make Methi Shankarpali
2 कसा करायचा डाळवडा? | How to make Dal Vada
3 कशी करायची बाकरवडी? | How to make Bhakarwadi
Just Now!
X