अनेकांना नाश्त्याला पराठ्यासोबत लोणचे खायला आवडते. मात्र, जर तुम्हाला रोज लोणचे खाण्याचा कंटाळा आला असेल तर आज तुम्हाला एक मजेदार आणि चटकदार अशी रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही जेवणासोबत लोणच्याला पर्याय म्हणून किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता. ती चटकदार रेसिपी म्हणजे दही मिरची ती तुम्ही रोटी, पराठा, पुलाव किंवा डाळ-भातासोबतही खाऊ शकता.

सध्या देशभरात उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकजण उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांचे सेवन करतात. थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांमध्ये दह्याचाही समावेश होतो. उन्हाळ्यात नियमित दह्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच, सोबतच आपण निरोगीही राहतो. त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्हाला चटकदार चवीहीसह आरोग्याला फायदा देणारी आहे. तर चला चवदार दही मिरचीची रेसिपी.

साहित्य –

  • मोठ्या हिरव्या मिरच्या २५
  • दही २-३ वाट्या
  • मीठ २ चमचे

कृती –

थोड्या मोठ्या आकाराच्या ताज्या हिरव्या मिरच्या चांगल्या पद्धतीने धुऊन पुसून घ्या. त्या मिरच्यांचे देठ काढू नका. त्यानंतर या मिरच्यांच्या मध्यभागी उभी चीर द्या. दोन्हीकडची टोके आणि देठ तशीच ठेवून सुरीच्या साहाय्याने अलगद थोडे पोखरून बिया काढून घ्या. दह्यात मीठ घालून फेटून घ्या. मिरच्या दह्यात २ दिवस बुडवून ठेवा. तिसऱ्या दिवशी दह्यातून काढून उन्हात सुकवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हात सुकवलेल्या मिरच्या पुन्हा रात्री दही तयार करून त्यात भिजवून ठेवा. तिसऱ्या दिवशी बाहेर काढून उन्हात दिवसभर सुकवा. असे ३- ४ वेळा करा. असं केल्याने मिरच्यांचा रंग फिकट पिवळसर होत जाईल. नंतर उन्हात अगदी कडकडीत वाळवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. या मिरच्या वर्षभर सहज टिकतात. खायला घेताना तपकिरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तेलात तळा.