साधारण पावसाळा सुरु झाला की, एकदा तरी मृग नक्षत्रात चिकनचा बेत केला जातो. पुढच्या आठवड्यापासून मुलांच्या शाळा सुरू होतील. शाळा सुरू झाल्या की सकाळी सकाळी डब्याला काय द्यायचं हा प्रश्न तमाम आयांना भंडावून सोडतो. सकाळच्या घाईत रोज पोहे आणि उपीट देऊन मुलांचे त्यातून पोषण होत नाही. अशावेळी झटपट होणारे तरीही पौष्टीक काही दिले तर. आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. ही डीश तुम्ही तुमच्या मुलांनाही शाळेत देऊ शकता. चला तर पाहुयात चिकन डोनट रेसिपी कशी करायची

चिकन डोनट साहित्य :

  • पाव किलो चिकन, २ कांदे, ३ अंडी
  • कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, चमचाभर तिखट
  • चमचाभर वाटलेलं आलं-लसूण, १ चमचा हळद
  • १ चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा मिरपूड
  • अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा कॉर्नफ्लोअर
  • २ चमचे मैदा, ४ चमचे ब्रेडचा चुरा, तेल, मीठ

चिकन डोनट कृती :

बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात एक अंडे आणि बाकीचे सर्व मसाल्याचे पदार्थ घालून वाटून घ्यावे. हे वाटण चांगले एकजीव व्हायला हवे. हे वाटलेले चिकन एका मोठय़ा भांडय़ात काढून घेऊन फ्रिजमध्ये तासभर ठेवावे. तासाभरानंतर कढईत तेल गरम करावे. फ्रिजमधले सारण बाहेर काढून त्याचे डोनट बनवावे. आता २ अंडी फोडून घ्यावी. ती फेटून बाजूला ठेवावी. शेजारीच ब्रेडचा चुराही ठेवावा. चिकनचे हे डोनट फेटलेल्या अंडय़ात बुडवून मग ब्रेडच्या चुऱ्यात घोळून तळावे. मस्तपैकी सॉस किंवा चटणीसोबत हे चिकन डोनट फस्त करावे.

हेही वाचा – Thai red chicken curry: थाई रेड चिकन करी, चिकनची ही खास रेसिपी वाढवेल जेवणाची चव! 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचीही मुलं रोजच्या जेवणाला कंटाळत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.