scorecardresearch

गव्हाची खीर कधी खाल्लीये का? नसेल तर आजच बनवा हेल्दी आणि चविष्ट रेसिपी

गव्हाची खीर ही गोड आणि चविष्ट तर आहेच पण ती आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे

Wheat pudding recipes
गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात आणि त्यामध्ये जर खीर असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. गोड पदार्थांमध्ये जर खीर असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हो कारण खीर तेवढी चविष्ट असते. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला किंवा पाहुणे आल्यावर खीर आवर्जून बनवतात. खीर अनेक वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते. ज्यामध्ये तांदळाची खीर, रव्याची खीर आणि गव्हाची खीर असे अनेक प्रकार आहेत.

यापैकी आज आम्ही तुम्हाला आज गव्हाची खीर कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. ही खीर गोड आणि चविष्ट तर आहेच पण ती आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया गव्हाची खीर बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी. ही खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे –

साहित्य –

१ कप गहू (स्वच्छ निवडून, पाण्यानं धुऊन ४५ मिनिटं भिजवून ठेवा.), २ टेबलस्पून तांदूळ (स्वच्छ धुऊन, ४५ मिनिटे पाण्यात भिजवून त्यानंतर खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावेत.), अर्धा कप बारीक केलेलं किंवा खोवलेलं ताजे खोबरे, दीड कप (३०० ग्रॅम) गूळ (शक्यतो सेंद्रिय गूळ घ्यावा.), १ चमचा काजूचे तुकडे, १ चमचा मनुका, १ चमचा बदामाचे काप, १ चमचा सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा लिटर दूध, तूप गरजेनुसार.

हेही वाचा- ज्वारीचा उपमा कधी खाल्लाय? नसेल तर आजचं घरी बनवा ही हेल्दी रेसिपी

कृती –

भिजवलेले गहू आणि तांदूळ प्रेशर कुकरमध्ये घालावेत. मध्यम आचेवर ३-४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावेत. शिजलेले गहू व तांदूळ एका ताटलीत काढून घ्यावेत. एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावं. सुकामेवा तुपात परतून एका ताटलीत काढून घ्यावा. त्याच तुपात गूळ घालून वितळू द्यावा. ओलं खोबरं आणि सुंठ पावडर घालून एकत्र करावं. नंतर तुपात परतलेला सुकामेवा घालावा.

हेही वाचा- मालवणी कोंबडी वड्यांनी खास करा संडे; खुसखुशीत वड्यांसाठी जाणून घ्या सोपी ट्रिक

शिजवलेले गहू आणि तांदूळसुद्धा घालून एकत्र करून घ्यावं. मध्यम आचेवर २-३ मिनिटं शिजवावं. नंतर आच बंद करावी. कोमट झालेलं दूध घालून खीर ढवळून घ्यावी. अति गरम दूध घातलं तर गुळामुळे दूध फाटतं हे ध्यानात राहू द्या. परत आचेवर ठेवून खीर मंद आचेवर शिजू द्यावी. ही खीर घट्ट चांगली लागते. खीर घट्ट झाली की आचेवरून खाली उतरवावी आणि सुक्या मेव्यानं सजवून वरून साजूक तुपाची धार घालून खायला द्यावी.

उपयोग –

ही खीर खायला चविष्ट आहेत पण ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कारण ती अस्थिसंधानकर, पौष्टिक वजन वाढवणारे, शक्तिवर्धक अशी आहे.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 16:12 IST