सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वाधिक आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे पोहे. पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, पोहे बनवण्याची पद्धत बदलते. काही ठिकाणी पोह्यावर ओलं खोबरं टाकून सर्व्ह केले जातात, तर कुठे तेलाची तिखट तर्री, शेव टाकून पोहे खाल्ले जातात. त्यामुळे अनेक फूड स्टॉलवरही तुम्हाला पोह्याचे वेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे पोहे प्रेमींसाठी खास आम्ही आज दडपे पोहे कसे बनवाय याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग दडपे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊ…

साहित्य

६ मुठी पातळ पोहे
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप ओलं खोबरं
३ टीस्पून लिंबू रस
२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२ चिमूट शेंगदाणे
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून

फोडणीसाठी – १/२ टीस्पून मोहरी, ५-६ कढीपत्ता पाने, २ हिरव्या मिरच्या, हिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

पहिल्यांदा पोहे नारळाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यात कांदा, ओलं खोबरं, मीठ, साखर, शेंगदाणे, लिंबाचा रस मिसळा. यानंतर सर्व एकत्र करून छान कालवून घ्या. (खोबरं, मीठ आणि लिंबाच्या ओलसरपणामुळे पोहे ओलसर होतील.) आता एका छोट्या कढईत तेल नीट गरम करून त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग घालून चांगली फोडणी करा. यानंतर ही फोडणी आता पोह्यावर ओतून नीट मिक्स करा, आता दहा मिनिटे पोहे दडपून (वरून पातेलं उलटं ठेवून झाकून) ठेवा. मग त्यात कोथिंबीर टाका, अशाप्रकारे ५ ते ७ मिनिटांनी दडपे पोहे सर्व्ह करा.