How to make kaju curry : अनेकदा जेवणासाठी काय वेगळे बनवायचे असा प्रश्न पडलेला असतो. मात्र वेगळं म्हणजे नेमकं काय तेच सुचत नाही. चला तर मग आज जरा हटके रेसिपी पाहूया. बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यूमध्ये ‘काजू करी’ हा पदार्थ पाहतो. मात्र त्याची किंमत पाहू तो पदार्थ घ्यावा कि न घ्यावा असा प्रश्न पडतो.

मात्र हॉटेल किंवा ढाब्यासारखी चमचमीत आणि स्वादिष्ट काजू करी अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची याची रेसिपी, युट्युबवरील सरिताज किचनने शेअर केली आहे. युट्युबवरील ही रेसिपी साधारण ३ ते ४ लोकांच्या प्रमाणानुसार दिली गेली आहे. चला तर मग सोप्या आणि मोजक्या साहित्यामध्ये ढाबा स्टाईल काजू करी कशी बनवायची पाहू.

साहित्य

तेल
तूप
५-६ कांदे
२ टोमॅटो
१०० ग्रॅम काजू
जिरे
१ हिरवी मिरची
लसूण
१ चमचा आले-लसूण पेस्ट
हळद
बेडगी मिरची पावडर
लाल तिखट
धणे पूड
गरम मसाला / किचन किंग मसाला
फ्रेश क्रीम
मीठ

कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये २ मध्यम आकाराचे, पाकळ्या केलेले कांदे आणि १ छोटी वाटी तुकडा काजू घालून घ्या. दोन्ही पदार्थ मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर १० मिनिटांसाठी उकळून घ्या.
  • आता पातेल्यातील शिजलेले कांदा आणि काजू मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
  • आता एका पॅनमध्ये चमचाभर तेल आणि एक चमचा तूप घालून ते तापवू द्यावे.
  • तेल तापल्यानंतर, त्यामध्ये १०० ग्रॅम काजू खरपूस परतून घ्या. काजू सोनेरी झाल्यानंतर, एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.
  • आता पुन्हा पॅनमध्ये थोडेसे तूप घालून त्यामध्ये जिरे आणि एक चमचा बारीक चिरलेले लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.
  • नंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ ढवळून घ्यावे.
  • टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत पॅनमधील सर्व पदार्थ शिजवून घ्यावे.
  • टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, धणेपूड घालून सर्व मसाले परतून घ्यावे.
  • आता मसाल्यांमध्ये तयार केलेली कांद्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
  • कांद्याच्या पोस्टला तेल सुटेपर्यंत ती चांगली परतून घ्यावी. ग्रेव्ही घट्ट होऊ लागल्यावर त्यावर काही मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
  • आता एकजीव झालेल्या ग्रेव्हीमध्ये साधारण पाऊण कप कोमट पाणी घालून घ्यावे.
  • गॅस मोठा करून ग्रेव्हीला उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर खरपूस परतलेले काजू ग्रेव्हीमध्ये घालून घ्यावे.
  • मध्यम आचेवर साधारण २ ते ३ मिनिटांसाठी ग्रेव्हीमध्ये काजू शिजवून घ्यावे.
  • शेवटी तयार होणाऱ्या काजू करीमध्ये एक छोटी वाटी फ्रेश क्रीम घालून, ग्रेव्ही ढवळून घ्या.
  • तयार आहे ढाबा स्टाईल चविष्ट काजू करी.

विशेष टिप्स –

फ्रेश क्रीम नसल्यास दुधावरील साय आणि चमचाभर दूध एकत्र फेटून वापरावे.
फ्रेश क्रीम घातल्यानंतर काजू करी जास्तवेळ शिजवू नये. अन्यथा फ्रेश क्रीममध्ये असलेले फॅट्स पदार्थात उतरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्युबवरील saritaskitchen नावाच्या चॅनलने काजू करीची ही अतिशय सोपी आणि भन्नाट रेसिपी शेअर केली आहे.