महाराष्ट्रीयन जेवणात वरण-भात, भाजी-पोळीप्रमाणे भाकरीचाही समावेश केला जातो. नेहमी गव्हाची पोळी खाऊन कंटाळा येत असल्याने अनेकदा ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी बनवली जाते. यात काही घरात दुपारच्या जेवणात जर पोळी खाल्ली असेल तर रात्रीच्या जेवणात गरमा-गरम भाकरी बनवली जाते. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ कोणत्याही धान्यापासून बनवलेली भाकरी पचायला हलकी, पौष्टिक असते. तुम्ही आजवर तांदूळ, नाचणीच्या भाकऱ्या खाल्ल्या असतील, पण आज आम्ही भाकरीचा असा एक वेगळा प्रकार सांगणार आहोत जो तुमच्यापैकी अनेकांसाठी नवीन असेल. आज आपण मसाला भाकरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

१) १ वाटी ज्वारीचे पीठ,
२) चवीनुसार मीठ,
३) १ छोटा चमचा तीळ,
४) चिरलेली मेथी,
५) चिरलेली कोथिंबीर,
६) हिरव्या मिरच्या आणि लसूणची पेस्ट
७) पाणी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

सर्वप्रथम एका मोठ्या परातीमध्ये ज्वारीचे पीठ घ्या. यानंतर त्यात चवीनुसार मीठ, तीळ, चिरलेली मेथी, कोथिंबीर टाका. यानंतर लसूण-मिरचीची पेस्ट टाकून सर्व मिश्रण एकजीव करून मीठ चांगल्याप्रकारे मळून घ्या. आपण तांदुळाच्या भाकऱ्या बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ मळतो अगदी त्याचप्रकारे हे पीठ पाणी घालून चांगले मळून घ्या. यानंतर पीठाचा छोटा गोळा घेऊन भाकरी चांगल्याप्रकारे थापून घ्या. तुम्हाला भाकरी नीट थापता येत नसेल तर तुम्ही लाटूनही ही भाकरी बनवू शकता. यानंतर आपण ज्याप्रकारे इतर भाकऱ्या तव्यावर शेकतो, अगदी त्याचप्रकारे ही भाकरीदेखील चांगली शेका. अशाप्रकारे तुमची चविष्ट मसाला भाकरी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही झुणका, चटणी, भाजीबरोबर ही चविष्ट मसाला भाकरी खाऊ शकता.