संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. काही लोक भक्तीभावाने पूर्ण नवरात्रीत उपवास करतात. अशावेळी उपवासात खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवणंही गरजेचं आहेच. उपवासात तुम्हाला काही हेल्दी ट्राय करायचं असेल तर हा राजगिऱ्याचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हा खूप टेस्टी तर आहेच, पण आरोग्यासाठीदेखील खूपच पौष्टिक आहे. हा हलवा तुम्ही साजूक तुपातही तयार करू शकता. यामुळे याची चव आणि पोषण आणखी वाढेल.
राजगिरा खाण्याचे फायदे
राजगिरा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असते. याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. राजगिरा खाल्ल्याने बऱ्याच वेळासाठी पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे उपवासादरम्यान थकवा जाणवत नाही.
राजगिरा हलवा बनवण्यासाठी साहित्य
१ कप राजगिरा पीठ
४ मोठे चमचे साजूक तूप
३ कप पाणी
चवीनुसार साखर
अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
बदाम
काजू
मनुके
राजगिरा हलवा बनवण्याची पद्धत
राजगिरा हलवा तयार करण्यासाठी सर्वात आधी कढईत साजूक तूप घ्या. ते गरम झाल्यावर त्यात राजगिरा पीठ ठाकून मंद आचेवर सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या. पीठ भाजलं की त्यात हळूहळू पाणी टाका आणि सतत ढवळत रहा.
आता यामध्ये साखर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या. साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. काही मिनिटे हलवा मंद आचेवर शिजू द्या. थोड्या वेळाने हलवा घट्ट होईल. शेवटी यामध्ये वेलची पावडर टाक आणि कापलेले बदाम, काजू व मनुके घालून एकत्रित करून घ्या. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही राजगिरा हलवा तयार करू शकता.