सध्या आंब्याचा सिझन सुरु असून कैऱ्या सुद्धा बाजारात दिसू लागल्यात. कैरी म्हटले की, त्यापासून विविध पदार्थ बनविण्याची तयारी गृहिणींची सुरु होते. आज आपण अशीच एक साधी सोपी अशी कैरीची जेली बनविण्याची रेसिपी पाहणार आहोत.

कैरीची जेली साहित्य

कैरी – १/२ किलो
साखर – १ वाटी
पुदिन्याची पानं – १ वाटी
मीठ – १/२ चमचा
काळ मीठ – १/२ चमचा
मिरेपूड – १/२ चमचा
जिरा पावडर – १ चमचा

कैरीची जेली कृती

१. सर्वप्रथम कैरी धुवून साल काढून घ्या व बारीक चिरून घ्या.

२. आता एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे व पुदिन्याची पाने घालून बारीक करून घ्या लागल्यास त्यात थोडं पाणी टाका.

३. कैरी मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर चाळणीमधून गाळून घ्या म्हणजे आपल्याला मऊ असा गर मिळेल व कचरा निघून जाईल.

४. आता त्यात एक वाटी साखर घाला. कैरी जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर घ्या.

५. नंतर त्यात १/२ चमचा मीठ व १/२ चमचे काळे मीठ घाला. १/२ चमचा मिरे पूड व १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला आणि एकत्र करा.

६. आता एक कढई किंवा पॅन घ्या त्यात हे मिश्रण घाला. व मध्यम आचेवर शिजायला ठेवा आणि सतत ढवळत रहा हळूहळू हे मिश्रण घट्ट होईल.

७. आता गॅस मंद करा व त्यात एक चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग घाला व छान एकत्र करा आणि सतत ढवळत रहा म्हणजे ते मिश्रण छान घट्ट होईल. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा.

८. नंतर एक ट्रे किंवा ताट घेऊन त्याला थोडं तेल लावा व तयार झालेले मिश्रण त्या ट्रेमध्ये टाका व छान पसरवून घ्या व एकसमान करा. आपल्याला त्याची जाडी थोडी जाड ठेवायचं आहे.

९. आता ट्रे किंवा ताट एक पूर्ण दिवस उन्हात ठेवा किंवा रात्रभर फॅन खाली सुद्धा ठेवू शकता.

१०. आता हे मिश्रण वाळल की ट्रे च्या कडेकडेने चाकूने थोड सैल करून घ्या व ट्रे उलटा करून घ्या. आता आपला जेली बेस तयार झाला.

११. नंतर चाकूने त्याचे चौकोनी तुकडे करा व एका भांड्यात काढून घ्या.

१२. आता एका भांड्यात बारीक साखर घ्या व त्यात या जेली घाला व एकत्र करून घ्या. लागल्यास त्यात अर्धा चमचा काळ मीठ घालू शकता. आता आपली जेली तयार आहे.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीची झणझणीत वांग्याची घोटलेली भाजी; एकदा खाल तर खातच रहाल

१३. तर ही कैरीची जेली लहान मोठ्या सर्वांनाच आवडते व सर्व आवडीने खातात. तुम्ही सुद्धा ही कैरीची जेली करून बघा व आम्हाला कशी झाली ते सांगा व फोटो शेअर करायला विसरू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेसिपी कुकपॅडवरुन घेतली आहे.