Ginger tea: चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी साधारण चहा तर सगळे बनवत असतीलच, पण आल्याचा कडक चहा प्यायल्यानंतर जी काही तरतरी वाटते ती वेगळीच. गरमागरम आल्याचा चहा कोणाला आवडत नाही? दिवसाची सुरूवात करण्यासाठी किंवा सौम्य थंड वातावरणात संध्याकाळच्या वेळी जर कोणी वाफाळता कडक आल्याचा चहा समोर ठेवला तर त्यासारखं सुख दुसरं काही नाही.
आल्याचा चहा अनेक जण बनवत असतीलच, मात्र तो करताना त्यामध्ये तुम्ही आलं ठेचून टाकता की किसून? आल्याचा तिखटपणा आणि त्याचा रस पूर्ण चहामध्ये उतरण्यासाठी आलं नेमकं कोणत्या पद्धतीने वापरायचं हे जाणून घेऊ…
आलं किसायचं की ठेचायचं…
आलं किसून टाकलं की ठेचून त्याने काय फरक पडतो असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही विश्वास ठेवा अगर नको, पण दोन्ही पद्धतीने तयार केलेल्या चहाची चव वेगवेगळी असते. तुम्ही कोणती पद्धत वापरता यावर चहाचा अनुभव आणि सुगंध बदलतो, शिवाय चहा पावडर कोणती वापरायची यामुळे अगदी साधारणसा चहादेखील अगदी स्पेशल चहा बनू शकतो.
जेव्हा तुम्ही आलं ठेचता तेव्हा त्याची चव हळूहळू येते. ते तुमच्या चहाला एक सौम्य उबदारपणा देते, जी चहाच्या प्रत्येक घोटात जाणवते. त्यामुळेच बाहेर टपरीवर किंवा दुकानातील चहाविक्रेते आलं ठेचून टाकताना दिसतात. ते दूध, साखर किंवा चहा पावडरवर जास्त भर न टाकता चव वाढवत जाते.
दुसरीकडे, किसलेलं आलं वेगळ्या पद्धतीने काम करतं. ते एकाच वेळी सर्व ताजा रस बाहेर टाकतं. त्यामुळे चहा घट्ट आणि जास्त तिखट होतो. तुम्हाला जर कडक, मसालेदार आणि ताज्या आल्याच्या चवीचा चहा आवडत असेल, तर आलं किसून टाकल्यास ती चव मिळू शकते.
तसंच तुम्हाला जर दूध आणि साखरेसोबत हळूहळू मिसळणारा सौम्य तिखट चवीचा चहा हवा असेल तर आलं ठेचून टाकावं.
एवढंच नाही, तर चहात आलं टाकण्याची वेळही महत्त्वाची आहे. दूध, चहा वापडर आणि साखर आधीच एकत्रित उकळून घेतल्यानंतर पहिली उकळी येऊ द्यावी आणि मग आलं टाकावं. शिवाय, आल्याचा चहा केवळ चविष्टच नाही, तर पचनास मदत करतो. आलं रक्ताभिसरण सुधारतं आणि डोकेदुखी नैसर्गिकरित्या आणि प्रभावीपणे कमी करण्यास मदत करू शकते. आल्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो आम्ल रक्ताभिसरणदेखील सुधारते.
