उंदीर-मांजराच्या खेळात उंदरांचे जिवाच्या भीतीने पळताना चतुराईने स्वत:ची सुटका करून घेणे जितके स्वाभाविक, तितकेच त्यांना पकडण्यासाठी मांजराचा चाललेला आटापिटाही नैसर्गिक आणि आवश्यक. या खेळात उंदरांचा जीव जाणार की मांजराला त्याची शिकार मिळणार? हा थरार पाहणाऱ्याला अनुभवायचा असतो. ‘लखनौ सेंट्रल’मध्ये तुरुंगात बंद असलेल्या पाच कैद्यांचा त्या बंधनातून बाहेर पडण्यासाठीचा झगडा आणि त्याचा वास लागल्याने त्यांच्या सतत मागावर असलेला तुरुंगाधिकारी (जेलर) यांचे एकमेकांविरोधातले योजना, तो समजू नये म्हणून म्युझिक बँडचा रचलेला कट आणि या सर्वापेक्षा प्रत्यक्षात उतरलेला नियतीचा एक वेगळाच प्लॅन.. कथा, अभिनय अशा दमदार बाजू घेऊन सुरू होणारा ‘लखनौ सेंट्रल’ मांडणीच्या वेगात थोडा ढेपाळला असला तरी जमून आलेला चित्रपट ठरला आहे.
वाचा : सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या घराचे वॉशरुम पाहून भडकली सेलेना जेटली
मोरादाबादमध्ये स्वत:चा म्युझिक बॅंड तयार करण्याचे स्वप्न पाहणारा किशन (फरहान अख्तर) दुर्दैवाने खून प्रकरणात अडकतो. आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते आणि त्याची रवानगी लखनौ मध्यवर्ती कारागृहात होते. स्वप्न आणि मृत्यू या अंतरात एकच निसटता धागा त्याला मोरादाबाद तुरुंगाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ती गायत्री कश्यपच्या (डायना पेंटी) रूपाने सापडतो. गायत्रीला लखनौ सेंट्रलमधील कैद्यांचा बँड तयार करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत जेलमधून बाहेर पडण्याचा प्लॅन किशन आखतो. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी म्हणजे ओघाने बँडसाठीही आणखी चार कैद्यांचा शोध, त्यांना प्लॅनमध्ये सहभागी करून घेण्यासाठीची धडपड आणि बँडला संमती मिळवण्यापर्यंतच्या प्रवासातच चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा भाग खर्ची पडला आहे. त्यामुळे सुरुवातीला किशनचे गाणे सोडले तर कैद्यांचा म्युझिक बँड हा विषय मध्यवर्ती असूनही प्रत्यक्षात त्यांचे पहिले गाणे ऐकायला मिळण्याकरता मध्यंतरानंतरही काही काळ प्रेक्षकांना वाट पाहावी लागते. पण मुळात दिग्दर्शकाने त्यांचा नेमका प्लॅन म्युझिक बँड नाही हे उघड ठेवले असल्याने दिग्दर्शकोच्या या मांडणीला अगदीच चुकीचे ठरवता येत नाही. तुरूंगातून सुटका या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपट गुंफल्याने किशन, इंजिनीअर असलेला बंगाली कैदी व्हिक्टर(दीपक दोब्रियाल), सगळ्यात जुना कैदी पंडित (राजेश शर्मा), तुरुंगात अश्लील मासिके मिळवून विकणारा दिक्कत (इनामुल हक) आणि तुरुंगातून बाहेर पडून प्रेयसीला भेटण्यासाठी आसुसलेला परमिंदर (जिप्पी गिरेवाल) या पाचजणांचे एकत्र येणे हा जितका महत्त्वाचा भाग आहे. तितकाच या कैद्यांची प्रत्येक गोष्ट माहिती असणारा, तुरुंगावर स्वत:चा वचक ठेवून असलेल्या जेलर श्रीवास्तवकडून (रोनित रॉय) त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ नये, म्हणून केली जाणारी मुस्क टदाबी हा संघर्ष चित्रपटात प्रामुख्याने पाहायला मिळतो.
वाचा : जाणून घ्या, ‘तुझं माझं ब्रेक अप’ या नवीन मालिकेची कथा
सर्वसाधारण कल्पनेची मनोरंजक मांडणी करताना दिग्दर्शक रणजीत तिवारी यांनी पुरेपूर मसाला भरला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत कथेत वळणे येत राहतात, मात्र हे करीत असताना या व्यक्तिरेखा कुठेही अवास्तव होणार नाहीत, याची काळजी घेतली असल्याने चित्रपट वेगळा ठरतो. प्लॅन प्रत्यक्षात उतरवताना त्यांना झालेली वास्तवाची जाण आणि शेवटपर्यंत ‘आजादी की बँड’ हा घोळवत ठेवलेला मुद्दा यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम राहते. शेवटी बँड म्हणून पाचहीजणांना टिपिकल ‘हिरो’ पद्धतीने उभे करणारा शेवट चित्रपटाच्या तोपर्यंतच्या मांडणीला गालबोट लावतो. म्युझिक बँड म्हणून चित्रपटात गाणीही महत्त्वाची ठरायला हवी होती. पण ‘एक कबूतर’ हे गाणे सोडले तर बँडचे म्हणून वापरलेले ‘कावा कावा’ या गाण्याचा रिमेक तितकासा आकर्षक वाटत नाही.
अभिनयाच्या बाबतीत फरहान अख्तर, दीपक दोब्रियाल, राजेश शर्मा, इनामुलहक, जिप्पी हे सगळेच सरस असल्याने ही भट्टी चांगली जमली आहे. रोनित रॉय जेलरच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे उत्तम ठरला आहे. रवी किशन मुख्यमंत्र्यांच्या छोटेखानी भूमिकेत भाव खाऊन जातो. डायना पेंटीला फारसे काम नाही. त्यामुळे तिची व्यक्तिरेखा तेवढय़ापुरतीच मर्यादित राहते. चटकदार संवाद, अॅक्शन असा सगळा मालमसाला असलेला ‘लखनौ सेंट्रल’ हा व्यावसायिक पठडीतला असला तरीही गर्दीत उठून दिसणारा आहे.
चित्रपट समीक्षण – रेश्मा राईकवार