एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जायचे तर ती गोष्ट आपल्याला डिकन्स्ट्रक्ट करता आली पाहिजे. म्हणजे ती ज्याप्रमाणे तयार केली गेली, त्याच टप्प्याने उलटे मागे जायचे.

सुंदर आणि मोडतोड हे खरे तर एकमेकांसोबत न जाणारे असे शब्द. एखाद्या सुंदर दिसणाऱ्या गोष्टीची मोडतोड करणे म्हणजे विकृतीच ठरावी. तर मोडतोड या कृतीमध्येच एवढी नकारात्मकता ठासून भरलेली आहे की, त्यात सौंदर्य असूच शकत नाही, असे वाटावे. पण सोबतच्या दृश्यचित्रातील या कलाकृती पाहून मनात येणारी पहिली प्रतिक्रिया ही ‘सुंदर मोडतोड’ अशी असू शकते.

सर्व छायाचित्रांमध्ये दिसतात त्या पोस्रेलिनच्या सुंदर कलाकृतीच. पण त्यांच्या सौंदर्याला मोडतोडीचे ग्रहण लागलेले दिसते. त्यावर जोरदार प्रहार झालेला आहे आणि त्याचे तुकडे तुकडे होण्यापूर्वीचा असा तो क्षण आहे. किंवा येशू ख्रिस्ताला खिळे ठोकून क्रुसावर चढविण्यात आले तसेच काहीसे या सुंदर कलाकृतींना खिळे ठोकलेले पाहून वाटत राहाते..

सर्वसाधारणपणे पोस्रेलिनची भांडी दैनंदिन वापरात शक्यतो नसतात. कारण ती नाजूक व अनेकदा महागच अधिक असतात. त्यांचा वापरही अनेक घरांमध्ये होतो तो केवळ दिखाव्यासाठीच. शोकेसमध्येच ही भांडी किंवा पोस्रेलिनच्या कलाकृती अधिक असतात. श्रीमंती-समृद्धीचा दिखावा हेच अनेक ठिकाणी त्याच्या निर्मितीचे प्राथमिक उद्दिष्ट असते. दिसायला या कलाकृती खूपच सुंदर दिसतात. पण प्रत्यक्षात त्या तेवढय़ाच नाजूक असतात. त्यांचा कार्यात्मक वापर अतिशय कमी असतो. कदाचित हीच बाब लॉरेंट क्रेस्ट व्यक्त करत नाहीए ना, अशी शंका आपल्या मनात उपस्थित होते. क्रेस्ट हा फ्रेंच कलावंत असून त्याने शोषण-गरवापर या शीर्षकाखाली या कलाकृती सादर केल्या आहेत.. मग आपण शीर्षकाशी या कलाकृतींचा काही ताळमेळ बसतो का, याचा शोध घेऊ लागतो आणि मग कोडे उलगडण्यास सुरुवात होते.

क्रेस्ट म्हणतो, दिखाव्यासाठी म्हणून किंवा कलात्मक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कलाकृतींच्या मागे त्याशिवाय आणखी काही अर्थ दडलेले असतात का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कलाकृतींमधून केला आहे. त्यावेळेस असे लक्षात आले की, दिखाव्यालादेखील अनेकदा ऐतिहासिक, सामाजिक अंगं असतात. पोस्रेलिन प्रत्येक घरात सरसकट नाही सापडत. यातून ते दिखाव्यासाठी वापरणाऱ्यांचा आíथक स्तरही सहज कळतो. पण केवळ एवढेच नव्हे तर त्यामागे एखादा वैचारिक स्तरही असू शकतो.

क्रेस्टचे शब्द ऐकत असतानाच आपण एक कलाकृती पाहात असतो. ज्यामध्ये निळ्या रंगाच्या फुलांचे नक्षीकाम केलेले एक मोठे भांडे रबराचे असेल तर ते िभतीवर फेकून मारल्यानंतर कसे फुटून, चिकटून राहील तसे चिकटलेले दिसते. पण चिकटलेलेही कसे म्हणावे ते एखाद्या पदकाप्रमाणे किंवा पूर्वी एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर विजय व शौर्य दाखविण्यासाठी त्यांची मुंडकी घरात टांगली जायची त्याप्रमाणे टांगलेले दिसते. क्रेस्ट म्हणतो त्याप्रमाणे यामागे काही वैचारिक स्तर असू शकतो का? मग हा विचार आहे का? किंवा विचारपद्धती, जी आपण केवळ दिखाव्यासाठी िभतीवर टांगली आहे?

असे म्हणतात की, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जायचे तर ती गोष्ट आपल्याला डिकन्स्ट्रक्ट करता आली पाहिजे. म्हणजेच ती ज्याप्रमाणे बांधली किंवा तयार केली गेली, त्याच टप्प्याटप्प्याने उलटे मागे जायचे. म्हणजे त्यात कोणकोणत्या घटकांनी भूमिका बजावली, ते कसे एकत्र आले, त्याचे परिणाम काय झाले, ते आपल्याला लक्षात येते असाही एक कलाविचार आहे. एखादी िहसक कृती झाली की, ज्याप्रमाणे गोष्टींमध्ये बदल घडत जातात तसेच ते बदल सुघटित गोष्टींमध्ये दाखविण्याचा आणि त्याही पलीकडे समाजातील अशा घडलेल्या गोष्टींवर भाष्य करण्याचा प्रयत्न कलाकाराने केला आहे का, हा प्रश्नही सहज डोक्यात येतो.. हा प्रश्न डोक्यात येणं हेच समकालीन कलाकार असलेल्या क्रेस्टचे यश असते!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com  @vinayakparab