परमार्थमय प्रपंच हीच ‘सकृतांची जोडी’, हा विराट अर्थ सर्वाचीच अंत:करणं प्रकाशमान करणारा होता..
कर्मेद्र – खरंच दादा आपण ढोंगीच आहोत, ढोंगालाच फसणारे आहोत आणि ढोंगच जपणारे आहोत.. चित्रपटात एखादा प्राणी दिसला रे दिसला तरी दहा खेपा घालून परवानगी काढावी लागते, पण भाजीच्या जुडय़ा बांधाव्यात तशा कोंबडय़ा बांधून खचाखच भरलेले टेम्पो याच देशात रस्तोरस्ती दिसतात, असं आपलं बेगडी प्राणीप्रेम! सिनेमात सिगारेट दिसली रे दिसली की धूम्रपान कसं कर्करोगाला आमंत्रण देतं, हे सांगणारी पाटी झळकते, मग सिगारेट विकूच का देता? त्याचा महसूल कर्करोग निवारणात पूर्ण का देत नाही?  पुस्तकात, कवितेत जिथे-जिथे मद्य वा सिगारेटचा संकेत होतो तिथेही वैधानिक इशारे का देत नाही? एक पोरसवदा मुलगा देहविक्रय करणाऱ्या बाईच्या प्रेमात पडतो तर त्याचं वय वाढवल्याशिवाय चित्रपट मंजूरच होत नाही, मग या धर्तीच्या कादंबऱ्यांचं काय? आणि सिनेमातल्या प्रत्येक दृश्यात वैधानिक इशारे द्या की.. रस्त्यात मारामारीचं दृश्य दाखवलं की लगेच सामाजिक कायद्याची कलमं दाखवा, लग्नदृश्यात विवाहविषयक कलमं दाखवा, मृत्यूचं दृश्य आलं की वारसा कायद्याची कलमं दाखवा.. पुरतंच मातेरं करा की..
योगेंद्र – (हसत) मागे कर्मूनं एका चित्रपटाला अर्थसाह्य केलं होतं.. म्हणून एका निर्मात्याचं दु:खं आणि धूम्रपानप्रेमीचं दु:ख बाहेर पडतंय बरं का दादा!
कर्मेद्र – मुद्दा हा की सगळीकडे ढोंगच आहे आणि अध्यात्म प्रचारातही ते शिरले आहेच.. मग रामाचा जन्म होईलच कसा? ढोंगाचाच जन्म होणार ना?
अचलदादा – बरोबर आहे.. म्हणून आचार आणि विचार खऱ्या अर्थानं आध्यात्मिक वृत्तीनं होतील तेव्हा हीच आचार आणि विचाराची जोडीच सद्गुरुंचं प्रेम जागं करील.. बहुत सकृतांची जोडी म्हणुनि विठ्ठलीं आवडी! आणि जेव्हा सद्गुरू बोधानुरूप जगण्याची आवड निर्माण होईल ना, तेव्हा जीवन खऱ्या अर्थानं सुखानं भरून जाईल.. ‘सर्व सुखाचे आगरु। बाप रखुमादेवीवरु’.. आगर म्हणजे जिथे अखंड सुखच भरून आहे.. सुखाशिवाय जिथे दुसरं काही नाहीच.. सुखाचं कोठारच.. असा केवळ सद्गुरूच असतो!
कर्मेद्र – मग हे ‘बाप रखुमादेवी वरु’ काय आहे?
हृदयेंद्र – ही ज्ञानेश्वरांची नाममुद्रा आहे..
कर्मेद्र – नाममुद्रा?
हृदयेंद्र – म्हणजे प्रत्येक संत अभंगाच्या शेवटी आपली नाममुद्रा उमटवतो.. जसं ‘नामा म्हणे’, ‘तुका म्हणे’ तसं माउली कधी ‘ज्ञानदेव म्हणे’ तर कधी ‘बाप रखुमादेवी वरु’ असा उल्लेख करतात.
अचलदादा – गुळवणी महाराजांचे परमशिष्य मामा देशपांडे यांनी या शब्दांचा विलक्षण अर्थ सांगितला आहे.. ‘बाप’ म्हणजे ‘परमात्मा’ अर्थात ‘सद्गुरू’! रखुमादेवी म्हणजे ‘आत्मा’ अर्थात भक्ती आणि ‘वरु’ म्हणजे पूर्ण स्वीकार करणे.. आता आवड असली तरच हा पूर्ण स्वीकार साधतो ना? म्हणून ‘वरु’ म्हणजे आवड, ऐक्य.. तेव्हा ‘बाप रखुमादेवी वरु’ म्हणजे आत्मा-परमात्मा ऐक्यच! ‘रुप पाहता लोचनी’ची खरी अर्थपूर्ती ही या आत्मा-परमात्मा ऐक्यातच तर होते! असं सद्गुरुंशी ऐक्य, तादात्म्य हेच सर्व सुखाचं आगर आहे!! त्या सद्गुरुंशी अंत:करणपूर्वक स्वत:ला जोडून घेणे हाच परमार्थ आहे, हीच साधना आहे, हाच नित्यनेम आहे, हेच सर्व सुखाचं आगर आहे!!
रात्र झाली होती. निघण्यापूर्वी अचलानंद दादांनी श्रीगोंदवलेकर महाराजांचं बोधवचनांचं पुस्तक समोर ठेवलं. प्रत्येकानं कोणतंही पान उघडून एक वाक्य वाचायचं ठरलं.. प्रत्येकानं सुरुवात केली..
हृदयेंद्र – भगवंताच्या सहवासानं त्याचं प्रेम येतं, पण भाव पाहिजे. भाव भगवंताच्या प्रेमाचा प्राण आहे. ‘मी तुझ्याकरिता आहे’ ही भावना वाढवावी..
ज्ञानेंद्र – प्रचीती तीन आहेत. पहिल्या दोन प्रचीतींनी वागेल तो तरेलच, पण माणूस आत्मप्रचीतीने शहाणा होत नाही हे नवल आहे. आपण जागे होत नाही, डोळे असून पहात नाही. म्हणून अंधश्रद्धा प्रपंचातच आहे..
योगेंद्र – आपल्या ध्येयाच्या आड येणारी गोष्टच नाही, मग कोणतीही गोष्ट घडली तरी काय हरकत आहे?
कर्मेद्र – समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकवता येते व कोणत्याही परिस्थितीत राहात नाही!
अचलदादा – या वाक्यांचं चिंतन करा.. पुढचा मार्ग दिसेलच!
चैतन्य प्रेम