30 September 2020

News Flash

६०. राम-जन्म-भूमी!

गप्पांचा प्रवाह इतका वेगात होता की बाहेर संध्याकाळ कलू लागल्याचं जाणवलंही नव्हतं. ‘आत-बाहेर’ची चर्चा संपली तेव्हा बाहेर लक्ष गेलं!

| March 27, 2015 12:34 pm

गप्पांचा प्रवाह इतका वेगात होता की बाहेर संध्याकाळ कलू लागल्याचं जाणवलंही नव्हतं. ‘आत-बाहेर’ची चर्चा संपली तेव्हा बाहेर लक्ष गेलं!
माई – आधीच सांगत्ये, रात्रीचा भोजनप्रसाद अर्धाच तास असतो. तेव्हा वेळेवर जायला हवं..
अचलदादा – हो बाई हो..
हृदयेंद्र – पण खरंच दादा, गरमागरम आमटी, भात आणि कोरडी चटणी हा गोंदवल्याचा रात्रीचा भोजनप्रसाद इतका हलका वाटतो की नंतरही रात्री एवढंच खाण्याची सवय टिकून होती. नोकरीत रात्रपाळी सुरू झाली त्यानंतर मात्र ती तुटली..
सर्वजण खाली उतरले. महाराजांचं घर, शेजघर, आईसाहेबांची खोली, मारुतीचं मंदिर, राममंदिर हा सारा परिसरही फिरून झाला. दादा आणि माई उद्याच पुण्याला जाणार होते. तिथे चारेक दिवस नातेवाईकांकडे राहून मग इंदूरला परतणार होते. तेव्हा आपल्याच गाडीतून पुण्यापर्यंत चलण्याचा प्रस्ताव कर्मेद्रनं मांडला आणि माईंनाही तो पसंत पडला. सकाळी गोशाळा आणि ध्यानमंदिर पहायचा बेत ठरला. रात्री आरती आणि भोजनप्रसादानंतर माई खोलीवर गेल्या. चौघा मित्रांसह दादा होते. जम९ल तेवढी चर्चा करायची आणि मग झोपायला खोलीवर परतायचं, असं दादांनी ठरवलं होतं. त्यानुसार गप्पा पुन्हा सुरू झाल्या.
हृदयेंद्र – दादा, या महिन्यातच रामनवमी आहे आणि त्या दिवशी आपण उत्तर प्रदेशात गुरुजींकडे नाही की गोंदवल्यातही नाही, हे जाणवून वाईट वाटतंय बघा..
अचलदादा – (हसत) अहो शरीरानं कुठंही असलात तरी मनानं गुरुचरण सोडायला कोण सांगतंय? एकदा ते चरण हृदयात घट्ट असले की जिथे असाल तिथे गोंदवलं आहेच!
कर्मेद्र – पण दादा, मनातली एक उत्सुकता काही शमत नाही.. खरंच जिथे रामजन्मभूमी आहे, म्हणतात प्रभू रामाचा जन्म खरंच तिथेच झाला का हो? (कर्मेद्रच्या या प्रश्नावर अचलानंद दादा आणि हृदयेंद्र एकदम स्मितहास्य करतात. त्यावर कर्मेद्र काहीशा त्राग्यानं विचारतो..) हसायला काय झालं? अहो एवढा वाद चालतो, ‘मंदिर वही बनाएंगे’.. मग निदान तुमच्या सद्गुरुंसारख्या साक्षात्कारी सत्पुरुषांनीच याचं उत्तर द्यायला हवं.. तेच सांगू शकतील..
हृदयेंद्र – म्हणूनच आम्हाला हसू आलं.. (कर्मेद्रच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे बघत) मागे एकानं हाच प्रश्न गुरुजींना केला होता. त्यावर गुरुजी म्हणाले, संपूर्ण अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे यात शंका नाही. संपूर्ण अयोध्याच रामजन्मभूमी आहे, पण अमुक विशिष्ट जागीच प्रभूचा जन्म झाला, हे छातीठोकपणे सांगायला काही आधार नाही..
ज्ञानेंद्र – मलाही पटतं हे.. आता अवघ्या चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी आपला जन्म झालाय. आपणही फारतर रुग्णालय कोणतं ते सांगतो, पण अमक्या खोलीत अमक्या कॉटवर झाला, हे सांगता येईल का? जर पन्नास वर्षांपूर्वीच्या जन्माची ही कथा तर कित्येक हजारो वर्षांपूर्वीच्या जन्माची जागा काय सांगावी?
हृदयेंद्र – तेही जाऊ दे.. गुरुजींनी उलट विचारलं की रामाचा जन्म आधी झाला की रावणाचा?
कर्मेद्र – अर्थात रावणाचा..
हृदयेंद्र – त्या माणसानंही हेच उत्तर दिलं. मग गुरुजी म्हणाले, आपल्या शरीरातही अहंकाररूपी रावणाचा जन्म झाला आहे ना?
योगेंद्र – वा! हो की!!
हृदयेंद्र – मग कुशाग्र सद्बुद्धीरूपी कौशल्या आणि दहा इंद्रियरूपी दशरथ यांचं ऐक्य होईल तेव्हाच हृदय अभेद्य, अजेय अर्थात अयोध्या होईल! या हृदयरूपी अयोध्येतच मग रामाचा जन्म होईल! खरी रामजन्मभूमी हीच!! आपल्या अंत:करणात जोवर राम जन्मत नाही तोवर अहंकाररूपी रावणाचा नाश नाही.. तोवर बाहेर कितीही रामजन्म साजरे करा, काही उपयोग नाही!
अचलदादा – आणि मला सांगा, या खऱ्या रामजन्मभूमीची कुणाला पर्वा तरी आहे का? या खऱ्या रामजन्मासाठी कुणी व्याकुळ तरी आहे का? बाहेर कितीही तोडफोड कराल आणि सोन्याची मंदिरं उभाराल.. सोपं आहे ते.. पण अंत:करणातल्या अहंकारावर घाव घालाल का? जेव्हा असा रामजन्म हृदयात होईल ना, तेव्हाच आत-बाहेरचं द्वंद्व उरणार नाही.. परमार्थमय प्रपंच हीच सकृतांची खरी जोडी प्रत्यक्ष जगण्यात येईल.. मग विठ्ठलाची आवड दूर का राहील?
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2015 12:34 pm

Web Title: abhangdhara ram janmabhoomi
Next Stories
1 ५९. आत-बाहेर
2 ५८. सकृतांची जोडी – २
3 ५७. सुकृतांची जोडी – १
Just Now!
X