निसर्ग निवडीत केवळ स्वत:चेच नाही, तर रक्ताच्या नातेवाइकांचेही हितसंबंध जपले जातात. यातून उपजल्या आहेत आपल्या भगिनींसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मधमाश्यांसारख्या प्रवृत्ती..  
आपल्या अजब दुनियेत निसर्ग निवडीच्या प्रक्रियेतून एकाच वेळी पराकोटीच्या अप्पलपोटेपणाबरोबरच निस्सीम स्वार्थत्याग, निर्दयतेच्या, निर्घृणतेच्या जोडीलाच माया आणि वात्सल्य अशा विभिन्न प्रवृत्ती उपजल्या आहेत. हे कसे घडले याचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली चतुरस्र बुद्धीच्या, साठ वर्षांपूर्वी सुवेझ कालव्यावरच्या ब्रिटिश-फ्रेंच हल्ल्याचा निषेध करत भारतीय नागरिक बनलेल्या जे बी एस हाल्डेन यांनी. प्रत्येक जिवाची जडणघडण हजारो जनुकांच्या आधारावर चालते, तेव्हा जनुक हेच शेवटी निसर्ग निवडीचे लक्ष्य आहेत. कोणताही जीव स्वत:चे जनुक आपल्या संततीद्वारे पुढच्या पिढीत उतरवतोच, पण त्याखेरीज त्याचे / तिचे जनुक इतर (रक्ताच्या नात्यातल्या) आप्तांद्वारेही पुढच्या पिढीत उतरतात. तेव्हा निसर्ग निवडीचा एक भाग स्वत:चा जीव राखणे, व स्वत:चे प्रजोत्पादन, याच्या जोडीलाच रक्ताच्या नात्यातल्या आप्तांचे संरक्षण व प्रजोत्पादन हा असणार. हाल्डेनना हे सारे नीट उमगले होते. सांगतात की ते एकदा आपल्या शास्त्रज्ञ मित्रांबरोबर पोहायला गेले होते. पोहता पोहता म्हणाले : एकाच सख्ख्या भावाचा जीव वाचवताना मेलो, तर तो निखालस मूर्खपणा होईल. दोन सख्ख्या भावांचा जीव वाचवताना मेलो, तर ना फायदा- ना तोटा. पण मरताना तीन सख्ख्या भावांचा जीव वाचवला, तर मात्र माझ्या जनुकांच्या दृष्टीने ते खास फायद्याचेच ठरेल. ते हिशोब करत होते की दोन सख्ख्या भावंडांत बरोबर निम्मे-निम्मे जनुक एकासारखे एक असतात. म्हणजे एकाचा जीव वाचवताना मी मेलो, तर फक्त अध्रेच हाती लागेल, हा मूर्खपणा; दोघांचा जीव वाचवताना मी मेलो, तर जितके गमावतो तितकेच हाती लागेल, पण तिघांचा जीव वाचवताना मी मेलो, तर एक गमावून दीड हाती लागेल; हा तर मोठा शहाणपणा आहे.
हा आहे निसर्ग निवडीची अधिक फोड करणारा आप्त निवडीचा सिद्धान्त. या सिद्धान्ताच्या गणिताप्रमाणे एखादा प्राणी स्वार्थत्याग करेल, पण हात राखून, केवळ विशिष्ट प्रमाणात. तो एखाद्या भाईबंदासाठी कळ सोसेल, पण जर त्या भाईबंदाला पुरेसा लाभ होत असेल तरच. पुरेसा म्हणजे किती? सख्ख्या बहिणीला, कन्यकेला स्वत: सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे, आणि नातीला चौपटीहून जरा जास्त. अर्थात जर एकदम चार-चार नातींना लाभ होत असेल तर दरडोई स्वत:च्या हानीइतकाच झालेला पुरे. हे गणित साऱ्या प्राणिजगताला लागू आहे; मग मुंग्या-मुंगळे, मधमाश्या याच कीटकुलांत इतक्या समाजप्रिय जाती का? यामागे आहे त्यांची वैशिष्टय़पूर्ण प्रजननप्रणाली. सामान्यत: सर्व प्रगत प्राण्यांच्या देहपेशींत जनुकांचे दोन संच असतात – एक आईकडून आलेला, एक बापाकडून. केवळ मादीच्या अंडय़ांत व नराच्या शुक्रबीजांत या दोन संचांची विभागणी होऊन एकच संच उतरतो. म्हणजे प्रत्येक अंडय़ात किंवा शुक्रबीजात आई – बापांचे जनुक संच घुसळून – ढवळून दोघांचेही अध्रे-अध्रे जनुक उचलेले जातात. म्हणूनच आई- मुलींत किंवा सख्ख्या भावंडांत निम्मे निम्मे जनुक समान असतात.
पण मुंग्या-मुंगळे, मधमाश्या हे कीटकुल तऱ्हेवाईक आहे. त्यांच्यातले नर असतात बिनबापाचे. या कीटकुलात शुक्रबीजाने फळवलेल्या, नेहमीसारख्या जनुकांचे दोन संच असलेल्या अंडय़ांतून फक्त माद्या उपजतात, तर नर उपजतात न फळवलेल्या, जनुकांचे केवळ एक संच असलेल्या अंडय़ांतून. या तऱ्हेवाईकपणामुळे एकेका नराची सर्व शुक्रबीजे एकासारखीच एक, आवळी जावळी, असतात; त्यांत काहीच वैविध्य नसते. यामुळे सख्ख्या बहिणी बहिणींत बापाकडून आलेला जनुक संच अगदी सारखा असतो, तर इतर जीवजातींप्रमाणे आईकडून आलेल्या जनुकसंचांत मात्र सरासरी अध्रे जनुक एकासारखे एक असतात. परिणामत: बहिणी बहिणींत तीनचतुर्थाश जनुक एकासारखे एक असतात, तर मायलेकींत इतर जीवजातींप्रमाणे अध्रे. याचाच अर्थ असा की आप्त निवडीच्या भाषेत आपल्या स्वत:च्या मुलींपेक्षाही बहिणींसाठी स्वार्थत्याग करणे शहाणपणाचे ठरते! हे आहे मुंग्या-मुंगळे, मधमाश्या याच कीटकुलांत इतक्या मोठय़ा प्रमाणात समाजप्रिय जातींची उत्क्रान्ती होण्याचे रहस्य.
या संघप्रिय कीटकांत आघाडीवर आहेत आग्या या आकाराने सर्वात मोठय़ा मधमाश्या. या दरडींवर, झाडांवर, मोठय़ा इमारतींच्या वळचणीला, मोठमोठी पोळी बांधतात. त्यांच्या पोळ्यांतल्या मधाच्या साठय़ावर हल्ला मारायला अस्वले, माणसे सरसावतात. या शत्रूंवर आग्या माश्या तुटून पडून नांगीचा डंख करतात. डंख करताच नांगी तुटते आणि कोथळा बाहेर पडून त्या मृत्युमुखी पडतात. पण आपल्या भगिनीमंडळाच्या हितासाठी त्या आपखुशीने मृत्यूला सामोऱ्या जातात. मधमाश्या फुलांतल्या मधावर, परागांवर उपजीविका करतात. तो गोळा करण्यासाठी दूरदूर भटकतात. त्यात भरपूर कष्ट झाले.
कदाचित जिवाला धोका असला, तरी त्यांना पर्वा नसते. तेव्हा एखादे झाड कित्येक किलोमीटर दूर अंतरावरही फुलले तरी तिकडे धाव घेतात. असे समृद्ध अन्नस्रोत बरोब्बर कुठे आहेत हे एकीला कळल्यावर बाकीच्या भगिनीमंडळाला ते ठिकाण व्यवस्थित सांगता आले तर मोठय़ा झुंडीने तिथे पोचून मध-पराग गोळा करणे फारच लाभदायक ठरणार. अशी माहिती एकमेकींना नेटकेपणे पुरवण्यासाठी मधमाश्यांनी एक सांकेतिक नाचबोली विकसित केली आहे. एखादे घबाड सापडून, तिथून मध, पराग गोळा करून एखादी मधमाशी पोळ्यावर परतली की ती पोळ्याच्या पृष्ठभागावर नाचायला लागते. तिचा उत्साह पाहात, त्याने आकर्षति होऊन दुसऱ्या मधमाश्या तिची नक्कल करत, तिच्या मागेमागे स्वत:ही नाचतात. या नाचाच्या दिशेतून मधाच्या स्रोताची दिशा कळते – कारण या स्रोताचा आणि सूर्याकडे पाहिल्यास सूर्याच्या दिशेचा जो कोन होतो, तो नाचाच्या दिशेशी नेटकेपणे जोडलेला असतो. नाचताना मधमाश्या आपला पृष्ठभाग हलवत असतात. या कंबर घुसळण्याच्या वेगाचा आणि किती अंतरावर मधाचा स्रोत आहे, याचाही संबंध नेटकेपणे जोडलेला असतो. मूळ स्रोत सापडवणारी माशी नाचत असताना तिने आणलेला मध, पराग यांच्या सुगंधावरून हे कोणत्या जातीचे झाड आहे याचाही अंदाज येतो. अशा तऱ्हेने मागे-मागे नाचून इतर मधमाश्या हा नवा, आकर्षक स्रोत कसला, कोणत्या दिशेला, किती अंतरावर आहे हे ताडतात आणि तडक तो हुडकायला निघतात.
सामान्यत: प्राण्यांचे संदेश ‘इथे आणि आत्ता’ पुरते मर्यादित असतात, त्यांच्यात जास्त खोलवर अर्थ फार क्वचित दिसून येतो. पण मधमाश्यांच्या नाचबोलीतून त्या बऱ्याच वेळापूर्वी सापडलेल्या, दूरवरच्या मध-परागांच्या स्रोताची माहिती नेटकेपणे एकमेकींना पुरवतात. हे साधू शकते कारण मानवी भाषेप्रमाणेच मधमाश्यांची नाचबोली ही एक सांकेतिक भाषा आहे. आपल्या भाषांत वेगवेगळे आवाज आणि अर्थ यांचा असाच सांकेतिक संबंध जोडलेला असतो. कानडीत हागु म्हणजे तसेच, तर मराठीत विष्ठा. सगळे ध्वनी केवळ चिन्हे, खुणा, निशाण्या आहेत. रूढीने त्यांना वेगवेगळे अर्थ चिकटतात.
माणसाच्या दहा कोटी वष्रे आधी मधमाश्या असे संकेत वापरू लागल्या होत्या!
लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.