मरिन ड्राइव्हच्या पदपथावरील खुल्या व्यायामशाळेच्या मुद्दय़ावरून सध्या राजकीय आखाडय़ात कुस्तीचे डावपेच रंगले आहेत. खुली व्यायाम साधने किंवा व्यायामशाळा ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या व्यायामशाळेचे उद्घाटन केल्याने शिवसेनेसाठी हा प्रश्न अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे. ठाकरे यांच्या हस्तस्पर्शाने उद्घाटन झालेल्या व्यायामशाळेला हात लावण्याची हिंमत दाखविल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची धमकी शिवसेना विभागप्रमुखांनी दिली आहे. वास्तविक महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि राज्यातही सरकारमध्ये शिवसेना सामील आहे. पूर्वी या पदपथावर परवानगी नाकारली असताना आता आपल्याला मर्जीनुसार वागल्यास रोखण्याची प्रशासनाची हिंमत होणार नाही, असा समज शिवसेनेचा झाला असावा. त्यातूनच परवानगी न घेताच व्यायामशाळा सुरू करण्यात आली. मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावत असताना पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला मरिन ड्राइव्हसारख्या भागात आवश्यक ती परवानगी न घेता ही व्यायामशाळा सुरू राहावी, असे वाटणे हे खेदजनक आहे. आपणच अनधिकृत बांधकाम उभारले तर इतरांच्या अनधिकृत बांधकामांना उखडून टाकण्याचा नैतिक अधिकार आपल्याला पोचत नाही, हे कटू सत्य चौफेर दृष्टी असलेल्यांनी संबंधितांना मार्मिकपणे सांगणे आवश्यक आहे. वाद निर्माण झाल्यावर परवानगी घेण्यासाठी आता पावले टाकली जात आहेत आणि महापालिका आयुक्तांनी मध्यस्थी करून त्यासाठी वेळ दिला आहे. ही पावले आधीच टाकता आली असती. त्यातून वादही निर्माण झाला नसता. आपण ज्या संस्था, वास्तू किंवा बांधकामाचे उद्घाटन करतो, ती अधिकृत आहे की नाही, आवश्यक परवानग्या घेतल्या गेल्या आहेत की नाही, हे आधीच तपासणे हे पथ्य राजकीय नेत्यांनी आणि विशेषत: सत्ताधाऱ्यांनी पाळणे आवश्यक आहे. पदपथावर व्यायाम साधने बसविण्याचे काम सुरू असताना प्रशासनही कुठे झोप काढत होते आणि उद्घाटन झाल्यावर लगेच निद्रा झटकून कारवाई करून वाद निर्माण केला, यावरही विचार केला गेला पाहिजे. आवश्यक परवानगीनंतरच व्यायामशाळा उभारण्याची सूचना प्रशासनाने केली असती, तर वादच उद्भवला नसता, पण आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ आणि अन्य सर्व प्रश्न संपले असून फक्त अनधिकृत व्यायामशाळेचाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा समजातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी या वादात उडी घेतली आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यावर आपले अस्तित्व दाखवून द्यावे आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे ऊठसूट प्रत्येक बाबीत वाद निर्माण करीत असताना आपणही त्यात मागे राहू नये, असे बहुधा त्यांना वाटले असावे. शिवसेनेने मर्दुमकीला आव्हान दिल्यावर अहिर यांनी आणि स्वाभिमान असलेल्यांनी शड्डू ठोकले आहेत. व्यायामशाळेवर कारवाई न झाल्यास त्यालगत महिला बचत गटांची विक्री केंद्रे सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता कोणत्याही मुद्दय़ांवरून राजकीय वाद रंगत असताना त्यात ही भर पडत आहे. जनहिताच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर किंवा प्रकल्पांच्या प्रश्नांवरून राजकीय भूमिका, डावपेच आणि वादविवाद झाले, तर ते लोकशाहीत समजू शकते; पण अनधिकृत व्यायामशाळेसारख्या क्षुल्लक बाबीवरून राजकीय कुस्त्यांचे फड रंगून टोकाचे वाद निर्माण होणे हे सुदृढ लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांकडून अभिप्रेत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2015 रोजी प्रकाशित
व्यायामशाळेचा राजकीय आखाडा
मरिन ड्राइव्हच्या पदपथावरील खुल्या व्यायामशाळेच्या मुद्दय़ावरून सध्या राजकीय आखाडय़ात कुस्तीचे डावपेच रंगले आहेत.

First published on: 20-07-2015 at 01:17 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc officials dismantle then re install makeshift gymnasium on marine drive