आज निरोप घेताना एक प्रसंग सांगावासा वाटतो. या प्रसंगात ज्यांचा संकेत आहे त्यांच्या वारसांची मी आधीच मन:पूर्वक क्षमा मागतो. काय असतं पाहा! सद्गुरूंच्या चरित्रातले सर्व जण, मग ते भाविक असोत की तथाकथित खल असोत, ते सर्व सद्गुरूंच्या विराट चरित्रातला अभिन्न भाग असतात. प्रत्येक जण या चरित्राची परिपूर्तीच करीत असतो. ‘अवधभूषण रामायणा’च्या प्रारंभी रामचरित्रातील सर्वाचंच, अगदी रावणाचं आणि कैकयीमातेचंही स्तवन आहे! ‘जिनं नुसता डोक्यावर हात ठेवला तरी ज्या परमानंदात ती विलीन आहे त्याचा अल्पसा अनुभव येतो,’ असं कैकयीचं गुणवर्णन या स्तवनात आहे! मग कैकयी ‘वाईट’ की अलौकिक? अहो हे दोघे नसते तर रामचरित्राची अनुपमता सिद्ध झाली असती का? ही गोष्ट लक्षात ठेवून या प्रसंगाकडे पाहा. ज्या नित्यपाठाचं आपण वर्षभर चिंतन केलं त्याचा उगम जर कळला नाही तर त्याची खरी अलौकिकताही कळणार नाही. म्हणूनच हा प्रसंग सांगत आहे. स्वामींच्या परिचयातील एका भक्ताच्या मुलीचा विवाह झाला. सासरी पदोपदी छळच सुरू झाला. दिवसभर काबाडकष्ट करूनही जेवणात पाणी घालून देण्यापर्यंत मजल गेली! तोवर सारं त्या माउलीनं सहन केलं होतं. पण आता सहनशक्ती संपली आणि वेड लागलं. तिला वेडय़ांच्या दवाखान्यात दाखल केलं. ही गोष्ट पावसला स्वामींच्या सेवेतील आत्ये यांना समजली. त्यांनी तिला आपल्या घरी आणलं. स्वामींना त्या म्हणाल्या, ‘‘स्वामी मी केवळ तुमच्या भरवशावर हिला आणलं आहे!’’ स्वामी काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं? ‘ज्ञानेश्वरी’तली एक ओवी त्या माउलीकडून पाठ करून घेतली. त्यानंतरच्या दिवशी ती ओवी म्हणून घेतली आणि आणखी एक ओवी पाठ करून घेतली. तिसऱ्या दिवशी दोन्ही पाठ ओव्या म्हणून घेतल्या आणि तिसरीच एक ओवी पाठ करून घेतली. या ओव्यांना वरकरणी क्रमही नव्हता. कोणत्याही अध्यायातली ओवी स्वामी सांगत. हा क्रम १०९ दिवस सुरू होता! १०९ ओव्या पाठ झाल्या तेव्हा तिचं वेड गेलं होतं आणि सासरची माणसं माफी मागत तिला न्यायला आली होती! अहो ही खोटी किंवा ऐकीव गोष्ट नव्हे! या घटनेतून स्वामी काय दाखवतात? नुसत्या ओव्या वाचून का वेड जातं, असं तुम्हाला वाटेल. अहो ते वेड तर साधं होतं, ‘मी’ आणि ‘माझे’पणाचं जे वेड आपल्याला जन्मजात लागलं आहे, ते आपल्याला कळतं तरी का? त्या वेडावर उतारा म्हणून हा ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठ’ आला आहे! सद्गुरूचरणाचं माहेर सोडून या भौतिक जगात म्हणजे सासरी जीव आला आहे. या सासरी त्याला भवदु:खाच्या झळाच भोगाव्या लागत आहेत. त्यात भर म्हणून हे ‘मी’ आणि ‘माझे’पणाचं वेड! ही परिस्थिती पालटायची तर माहेरी, सद्गुरूचरणीच गेलं पाहिजे. त्यांचा बोध पाठ केला पाहिजे. अंगी बाणवला पाहिजे. हे लक्षात ठेवूनच नित्यपाठ वाचत राहू! आपलं चिंतन संपलं. सद्गुरू कृपेनंच ते साधलं. त्यांच्या स्मरणात जे गवसलं ते अस्सल होतं. कमअस्सल असेल ते माझं होतं. आपल्या सर्वाचा मी अत्यंत ऋणी आहे!  ॐरामकृष्ण हरी!!