बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (१८ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आता आपल्या आयुष्याची अखेर जवळ आल्याचं प्रथमच स्पष्ट सांगितलं आणि या दिवसानंतर पाचव्याच दिवशी श्रीमहाराजांनी आपलं अवतारकार्य संपवलं. आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराजांनी नामासाठीच खर्च घातला होता आणि प्रेमानं प्रत्येकाला सत्याच्या मार्गाकडे वळवायचाच अहोरात्र प्रयत्न केला होता. या अखेरच्या पाच दिवसांतही त्यांनी नाम आणि प्रेम यांचंच दर्शन सतत घडवलं. या सुमारास श्रीमहाराजांचा देह फार थकत चालला होता. दमा बळावल्यानं आधीच बेताचा असलेला आहारही कमी झाल्यानं देहाची शक्ती घटू लागली होती. दम्यानं रात्र-रात्र झोपही नसल्यानं आणि अनेक रात्री उभं राहून काढल्यानं पाय सुजले होते. या दिवसाची सकाळ उजाडली तेव्हा श्रीमहाराज राममंदिरात आले. पायाची सूज वाढली होती आणि चालायलाही त्रास होत होता. अशा स्थितीत रामाला प्रेमभरानं नमस्कार करून ते गाभाऱ्यासमोर आसनावर बसले तेव्हा स्त्री-पुरुषांनी मंदिर भरून गेलं. गेली कित्येक र्वष या मंदिरानं हाच क्रम अनुभवला होता. महाराज दर्शन घेऊन आसनावर बसत आणि भोवती सर्व जण गोळा होत. मग ‘आज रामाला नैवेद्य काय करायचा?’ या प्रश्नापासून ते ‘हे जग का व कसं उत्पन्न झालं?’ या प्रश्नापर्यंत बोलणं चाले! त्या वेळी श्रीमहाराजांबरोबर दररोज शंभरेक माणसं पंक्तीला असत. त्यामुळे ‘रामाला नैवेद्य काय करायचा’ या प्रश्नाचा अर्थ ‘दुपारच्या जेवणात काय असेल’, हाच असल्यानं देहबुद्धीला ही चर्चा आवडत असेच, मग ‘हे जग का उत्पन्न झालं, त्यात माणूस का जन्माला आला, मानवी जन्माचं खरं ध्येय काय’ अशी आत्मबुद्धीला जागं करणारी चर्चा सुरू करून श्रीमहाराज आपल्या माणसांना अधिक अंतर्मुख व्हायला शिकवत. आजचा दिवस मात्र वेगळाच होता. महाराजांची मुद्रा गंभीर होती. या आठवडय़ात आपल्या माणसांवर काय प्रसंग येणार आहे, याची केवळ त्यांनाच कल्पना होती. समोरच्या माणसांना ती नसल्यानं जिथे महाराज तिथे आनंद, या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर सर्वाची मनं आनंदानं भारली होती. श्रीमहाराजांनी अगदी प्रेमभरानं सर्वाकडे पाहिलं. गरीब असो की श्रीमंत, विद्वान असो की अडाणी; प्रत्येकाला त्यांनी रामरूपातच पाहिलं होतं. प्रत्येकावर एकसमान प्रेम केलं होतं. ‘माझ्यातलं प्रेम काढा, मग मी उरतच नाही’, असं त्यांनीच सांगितलं होतं. त्या प्रेमस्वरूप महाराजांना न्याहाळताना प्रत्येकाचा आंतरिक भाव उचंबळून येत होता. महाराज सहजपणे बोलल्यागत उद्गारले, ‘‘बघा रे बुवा! आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे. म्हणून आता रामाची चिठ्ठी आली आहे. मला जाणे जरूर आहे. तुम्ही आनंदानं निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका हेच माझं शेवटचं सांगणं आहे.’’ त्यानंतर दीड तास महाराज फक्त नामाबद्दल भरभरून बोलले. दृश्य हे नाशवंत असतं. देह दृश्य आहे त्या देहाला चालवणारा जो अदृश्य भगवंत आहे त्याचं अनुसंधान साधण्यासाठी नाम घ्या, असं त्यांनी परोपरीनं सांगितलं.