चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच सरकार. म्हणजेच न्यायव्यवस्था. म्हणजेच प्रसारमाध्यमं आणि म्हणजेच लष्करही. त्यामुळे या देशात नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ता बाहेरच्यांना लागू दिला जात नाही. सारं काही दडवण्याचं, दडपण्याचं काम केलं जातं. आणि ते सर्व सर्व पातळीवर. म्हणजे भ्रष्टाचारापासून ते लैगिक स्वैराचारापर्यंत..
चीनमध्ये काय चाललंय हे ज्याला कळू शकेल त्याला ब्रह्मांडात, अवकाशातल्या कृष्णविवरांत काय काय घडतंय तेही कळू शकेल. भलताच गुंतागुंतीचा देश आहे, हा. एके काळी हा असा अदृश्यतेचा मान सोविएत रशियाकडे जायचा. काय चाललंय ते कळायचंच नाही आणि कळायचं तेव्हा बराच उशीर झालेला असायचा. तोपर्यंत नवीन काही घडून जायचं. आता हे सगळं चीनच्या बाबत होतं. ताजं बो झिलाई यांचं प्रकरण पाह्य़लं तरी चीन कसा जगाला झुलवतो ते कळू शकेल. बो झिलाई हा चिनी राज्यव्यवस्थेवरचा उगवता तारा होता. आता चीनचा पुढचा उद्धार त्यांच्याच हातून होणार असं वातावरण होतं. पण त्यांच्या पत्नीचं- ग्वु कैलाई हिचं एक प्रकरण बाहेर आलं आणि बघता बघता बो चिनी क्षितिजावरनं नामशेष झाले. ही कैलाईदेखील खरं तर त्यांची दुसरी पत्नी. पहिली लि दान्यू. गेल्या महिन्यात चीनमध्ये जे सत्तांतर झालं त्याच्या आधी तिनं न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत देऊन बरंच काही उघड केलं होतं. बो आणि दान्यू यांचा एक मुलगा कोलंबियात शिकायला होता. तो म्हणे बो यांची दुसरी पत्नी कैलाई हिच्या हत्येचा कट रचत होता. असा बो यांचा संशय. पण प्रत्यक्षात कैलाई हिनंच ब्रिटिश व्यापाऱ्याचा खून केल्याचं उघड झालं आणि बो यांचे दिवस पालटले. या ब्रिटिश व्यापाऱ्याशी बो यांचे काही आर्थिक हितसंबंध होते. त्यात त्यांच्या मुलाचाही काही वाटा होता, असं सांगितलं गेलं. त्यातूनच मग काही ताणतणाव निर्माण झाला आणि त्यात या ब्रिटिशाचा हकनाक बळी गेला.
त्यानंतर बो आणि कैलाई दोघेही तुरुंगात गेले. आता त्याची एक बाजू अशी की चिनी नेतृत्वबदलाच्या पाश्र्वभूमीवरच हे सर्व झाल्यामुळे या सर्व प्रकरणामागचा हेतू वेगळाच आहे, असं म्हटलं गेलं. पुढे तर या प्रकरणातलं उपकथानकच महत्त्वाचं बनलं. कारण नंतर हा खटला उभा राहिला तेव्हा कैलाई यांना सुनावणीसाठी न्यायालयात सादर केलं गेलं. त्या सगळ्याचंच वार्ताकन करणाऱ्यांनी न्यायालयात आली ती कैलाई नव्हतीच, दुसरीच कोणी तिच्याशी साधम्र्य असणारी समोर आणली गेली असं शपथेवर सांगितलं. अर्थात ती शपथही चीनमधली. तेव्हा तिला कितपत गांभीर्यानं घ्यायचं हादेखील प्रश्नच.
या सगळ्याच्या मुळाशी असलेला मुद्दा तोच. तो म्हणजे चीनमध्ये नक्की काय चाललंय ते कोणालाही कळत नाही. चिनी मंडळींचा म्हणून असा कोणी ब्रह्मदेव असलाच तर त्यालाही वेड लागत असेल अशी परिस्थिती.
याच विषयावर एका चीनवाऱ्या करून आलेल्या समव्यावसायिकाशी बोलत होतो. जे गूढ आहे त्याचं नाही म्हटलं तरी..अर्थात नाही म्हणायचंच कशाला म्हणा..माध्यमांना आकर्षण असतंच. पण चीनबाबत काही हे कुतूहल शमत नाही..असं त्या मित्राला म्हटलं. त्यावर त्यानं एका पुस्तकाचं नाव सांगितलं. ‘द पार्टी : द सीक्रेट वर्ल्ड ऑफ चायनीज कम्युनिस्ट रूलर्स’ हे ते पुस्तक. ही दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. नावावरनंच अंदाज येतो त्यात काय मालमसाला असेल, त्याचा. ते नावाला जागतं.
मजा आहे हे पुस्तक. कम्युनिस्ट पक्षाची जनस्नेही वगैरे वाटणारी धोरणं आणि ते राबवणारे हे नक्की कसे आहेत, याचा अंदाज बांधण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होतो. परिस्थिती साधारण सौदी अरेबिया वगैरे तत्सम देशांसारखी असावी. सौदीत धर्माच्या नावानं राज्य करणारे वास्तवात एक नंबरचे अय्याश असतात, याची अनेक उदाहरणं आहेत. चीनमध्ये दुसरं काही नाही. ही मंडळी सत्ता डाव्या म्हणवून घेणाऱ्या पक्षाच्या नावाने चालवतात. पण प्रत्यक्षात सगळ्यांचीच अय्याशी सुरू असते.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे आज ७ कोटी ८० लाख सभासद आहेत. हा पक्ष म्हणजेच सरकार. म्हणजेच न्यायव्यवस्था. म्हणजेच प्रसारमाध्यमं आणि म्हणजेच लष्करही. हा कम्युनिस्ट पक्षच चीनचा सर्वेसर्वा. किती? तर लष्कराचा प्रमुख हा सरकारला नव्हे तर या पक्षाला उत्तरदायी असतो. म्हणजे तो हुकूम पक्षाचे घेतो. तेच सरकारी मालकीच्या म्हणवून घेणाऱ्या अजस्र कंपन्यांचंही. त्यांचे प्रमुख सरकार नव्हे तर पक्ष नेमतो आणि कंपनीच्या पैशावर सरकारचा नव्हे तर पक्षाचा हक्क असतो.
यातला महत्त्वाचा भाग हा की चिनी पक्षनेतृत्व जवळपास एकजात भ्रष्ट आहे. त्यांच्यात एका मुद्दय़ावर एकमत आहे. ते म्हणजे भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर. कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा कसलाही भ्रष्टाचार कधीही बाहेर येणार नाही याची हवी ती काळजी तो पक्ष घेतो. त्यातूनही कोणाच्या भ्रष्टाचाराला वाचा फुटलीच तर त्याचा बो झिलाई होतो. जवळपास सर्वच नेत्यांची पोरंबाळं परदेशात शिकतात. प्रत्येक नेत्यानं मोठमोठय़ा परदेशी कंपन्या बांधून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कंत्राटं मिळताना या नेत्यांचे डावे हात ओले होतात, हा सगळा तपशील यात आहे. लेखक रिचर्ड मक्ग्रागर यानं पुस्तकातली बरीचशी पानं आर्थिक उलाढालींना वाहिलेली आहेत. म्हणजे चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेतला किती वाटा हा सरकारी कंपन्यांकडून येतो, खासगी कंपन्या आहेत का..त्या काय करतात..वगैरे. ज्याला आर्थिक विषयांत रस आहे त्याला अर्थातच हे सर्व आवडेल.
पण या पुस्तकाच्या उपशीर्षकामुळे या नेत्यांच्या ‘अन्य’ उद्योगांविषयी उगाचच कुतूहल चाळवलं जातं. कारण इतका पैसा मिळवून ही सर्व मंडळी चम्मत ग करतच असणार. अर्थात ही सर्व माहिती मिळवणं अवघडच असेल चिनी वातावरणात. त्यामुळे असेल पण यांच्या बाकीच्या उद्योगांचा, खुनखराब्याचा तपशील यात नाही. हे पुस्तक वाचून झाल्यावर आठ-नऊ वर्षांपूर्वी माओ झेडाँग यांच्यावरच्या वाचलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली. ‘माओ : द अननोन स्टोरी’ हे जुंग चँग आणि जॉन हॅलीडे या नवरा-बायकोंनी लिहिलेलं पुस्तक. जवळपास हजार पानांचा ऐवज आहे. एकदम सणसणीत. यातल्या जुंग चँग यांच्या नावावर त्याआधीही एक पुस्तक आहे. ‘वाइल्ड स्वान्स’ नावाचं. चीनमधल्या सांस्कृतिक क्रांतीचा भ्रमनिरास दाखवणारं. ते वाचायचं राहिलंय. त्या आधी हे दुसरं, माओ यांच्यावरचं हाती लागलं. मॅग्ना बुक स्टोअर्सच्या वार्षिक सेलमध्ये अवघ्या पाचशे रुपयात ते सापडलं. ही २००७ सालची गोष्ट.
 माओ यांचा बुरखा हे नवरा-बायको टराटरा फाडतात..असं म्हणणं हे या पुस्तकाचं किमान वर्णन म्हणता येईल. जवळपास नऊ र्वष हे नवरा-बायको या पुस्तकावर मेहनत घेत होते. बरंच सरकारी दफ्तर त्यांनी उलथंपालथं केलं, माओंच्या समकालीनांना भेटले, इतर अनेकांच्या मुलाखती घेतल्या..अगदी माओ यांच्या कपडे धुणारीलाही त्यांनी बोलतं केलंय.. आणि त्यावर आधारित हे पुस्तक हातावेगळं केलं. तेव्हा अर्थातच वाचताना माओंच्या काळचा समग्र चीन उभा राहतो. त्या काळातही उठून दिसतो तो अत्यंत क्रूर, कमालीचा निर्दय, तरीही वैयक्तिक आयुष्यात भित्रा, लैंगिकदृष्टय़ा विकृत आणि पाताळयंत्री असा नेता. माओला स्वत:ला शेतकरी म्हणवून घ्यायला आवडायचं. पण शेतकऱ्यांविषयीच त्याला भयंकर राग होता. अनेक शेतकऱ्यांचं, त्यांनी पिकवलेल्या धान्योत्पादनाचं अत्यंत क्रूरपणे त्यानं नुकसान केलं. माणसं तर इतकी मारली असतील की हिटलरची कृत्यं दुय्यम ठरावीत. लेखकद्वयींनी सादर केलेल्या तपशिलानुसार माओच्या काळात तब्बल सात कोटी ९० लाख चिनींची हत्या झाली. माओंची विकृती अशी की त्यांना आपल्याच साथीदारांत संघर्ष पेटवायला आणि नंतर त्यातनं त्यांची हत्या करायला आवडायचं. माणसं मरताना बघणं हा त्यांचा विरंगुळा असावा. जनतेचेच नाही तर आपल्या पत्नींचेही माओंनी असेच हाल केले. त्यांचे बरेच विवाह झाले होते आणि तरीही अखंड तरुणींचा पुरवठा करावा लागायचा.
 हे सर्वच मुळात वाचायला हवं.
 अर्थातच मनोरंजनासाठी नाही. तर चीनच्या मगरीची शेपटी पुन्हा एकदा आपल्या सीमारेषांवर वळवळू लागली आहे, तेव्हा तो देश आणि त्याचं नेतृत्व आहे तरी कसं हे समजून घेण्यासाठी. चायनीज चेकर्सचा हा खेळ माहीत करून घेणं आवश्यकच आहे. नाही तर उगाच हिंदी- चिनी भाई भाई असं म्हणण्याचा भोंगळपणा पुन्हा व्हायचा.

द पार्टी- द सिक्रेट वर्ल्ड ऑफ चायनीज कम्युनिस्ट रूलर : रिचर्ड मॅक्ग्रागर,
प्रकाशक : हार्पर पेरिनियल,
पाने : ३३६, किंमत : १२.२५ डॉलर्स.

corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
Sanjeev Sanyal
“UPSC म्हणजे वेळेचा अपव्यव”, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्याचं विधान; म्हणाले, “तुम्हाला खरोखरच…”
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

माओ – द अननोन स्टोरी :
जुंग चँग आणि जॉन हॅलीडे,
प्रकाशक : विंटाज बुक्स,
पाने : ९७१, किंमत : ५२५ रुपये.