महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन हजार झाल्याची बातमी (लोकसत्ता, २४ डिसेंबर) वाचली आणि लक्षात आले की, राजकारणात एखादा खोटा ‘शत्रू’ निर्माण केल्याशिवाय नवनिर्माण होत नाही, हे राज ठाकरे स्व. बाळासाहेबांकडून चांगलेच शिकले आहेत. ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध बोंब उठवली तशीच बोंब बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय आणि दलितांविरुद्ध उठवली होती. पण भारतीय लोकशाहीची किमया म्हणून त्यांना शेवटी जय भीम करावा लागला होता. राज ठाकरेसुद्धा त्याच दिशेने जात आहेत.
असुरक्षित लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, हेच असुरक्षित लोक सोबत घेत राडा करायचा आणि ताकद निर्माण करून तिचे नवनिर्माण झाले की आणखी ताकदवान होण्यासाठी ज्यांना शिव्या घातल्या त्यांनाच नमस्कार घालायचे. हे संधी साधतात आणि सत्तेत येतात. यांनी पेरलेले विष समाजातून नाहीसे होण्याला कितीतरी काळ जावा लागतो. जे विष भारतीय लोकशाहीला आणि देशाच्या एकात्मतेला नष्ट करते. व्यक्तिपूजा भारतात जोपर्यंत आहे, तोपर्यंत अशा प्रकारच्या नेत्यांचे फावत राहणार, ते लोकांना मूर्ख बनवत राहणार आणि कोहिनूर खरेदी करीत राहणार. याला िहदीत एक चांगली म्हण आहे, ‘जब तक बेवकूफ जिंदा है तब तक अकलमंद भूखे नहीं मरते।’
प्रा. अनिल हिवाळे  

त्सुनामीची आठवण नव्हे.. संशोधनातून प्रतिबंधही!
२६ डिसेंबर २००४ च्या त्सुनामीस यंदा नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. या तारखेच्या आधी बऱ्याच लोकांना त्सुनामी हा शब्द व त्याचे इंग्रजी स्पेलिंगदेखील येत नव्हते. पण २७ डिसेंबरनंतर एकाएकी हजारो त्सुनामी तज्ज्ञांचे पीक आले. यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली व हैदराबाद येथील त्सुनामी संशोधन केंद्राची स्थापना झाली. मी या केंद्राशी संबंधित असल्यामुळे तेथील व जगातील काही संशोधनाची माहिती मिळत असते. त्यातील काही मुद्दे सामान्य माणसांशी संबंधित आहेत व त्याचा योग्य उपयोग केल्यास हानी कमी होऊ शकते.
समुद्री अथवा किनारी क्षेत्रात अतिमहान शक्तीचा म्हणजे ८ ते ८.५ अथवा अधिक शक्तीचा भूकंप झाला तर त्सुनामी निर्मिती होते व भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सर्व दिशांना जलतरंग त्सुनामी लाटेच्या स्वरूपात प्रवास करू लागतात. या लाटांची गती ७००-७५० कि.मी. प्रति तासाच्या आसपास असते. सर्वाना आठवत असेल की तामिळनाडूच्या किनाऱ्यावर नागपट्टनम व त्याच्या १०० कि.मी. अंतरावरील तटावर त्सुनामीमुळे अधिक हानी झाली. तसेच थायलंडच्या किनाऱ्यावरही प्रचंड हानी झाली. या त्सुनामीच्या लाटा विशाखापट्टणम पारादीप, कोलकाता, ढाका (पश्चिमेकडील समुद्री भाग) चित्तगाँव येथेही पोहोचल्या, पण तेथे काहीच हानी झाली नाही. याचे कारण आकृतीमधून स्पष्ट होईल.
भूकंपात जेव्हा जमीन फाटते तेव्हा खडकांच्या तुटण्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तरंगरूपात सर्व दिशांमध्ये पसरत जाते. याचे गणित असे आहे की जमीन फाटताना जो प्रचंड तडा जातो त्या तडय़ाच्या दिशेत जाणाऱ्या तरंगांची तीव्रता व ऊर्जा कमी असते व तडय़ाच्या लंब दिशेमध्ये जाणाऱ्या तरंगाची तीव्रता व ऊर्जा महत्तम असते. २६ डिसेंबर २००४ च्या त्सुनामीच्या आधी तेथील भूभ्रंश (फॉल्ट) हा अंदाजे ११०० कि.मी. लांब फाटला व यासाठी ७ मिनिटे आणि २८ सेकंद लागले. याचा परिणाम म्हणून त्सुनामी तयार झाली व श्रीलंका, थायलंड व नागपट्टनम येथे साधारणत: ७ ते ७.५० मीटर उंचीची त्सुनामीची लाट आली. श्रीलंकेतील गावे व भारतातील नागपट्टनम ही गावे व थायलंड भूकंप केंद्रापासून अंदाजे १७५० व १८०० कि.मी. अंतरावर आहेत. तथापि अंदाजे १७५० कि.मी. अंतरावरील पण भूभ्रंशाच्या दिशेत एक कोकोस द्वीप आहे. येथे त्सुनामीची उंची फक्त ४२ सें.मी. एवढीच होती. अंदमान ते इंडोनेशिया या क्षेत्रातील प्रचंड भूकंपजन्य भूभ्रंश साधारणत: उत्तर-दक्षिण अथवा वायव्य-आग्नेय दिशेत आहेत. त्यामुळे या भूभ्रंशावर मोठा भूकंप झाल्यास त्सुनामी तरंग व लाटा कशा प्रकारे असतील हे संगणकाद्वारे सहज काढता येते.
याचा उपयोग किनारपट्टीवरील विकासासाठी केला जाऊ शकतो. जेथे त्सुनामी लाटांची तीव्रता अधिक असेल अशा ठिकाणी बंदरे अथवा बंदराचा विस्तार कमी प्रमाणात असावा. तसेच अशा ठिकाणी मोठय़ा प्रकल्पांची योजना, उदा. वीज उत्पादन केंद्र, मोठे कारखाने करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तेलंगण राज्य होणार हे जवळजवळ नक्की आहे. पण या राज्याची राजधानी तर हैदराबाद राहील पण उर्वरित आंध्र प्रदेशची राजधानी किनारी प्रदेशात करताना वरील मुद्दा लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. याचा उपयोग करून हैदराबाद येथील त्सुनामी केंद्र, त्सुनामीची सूचना देताना भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विविध ठिकाणी त्सुनामी लाटांची उंची किती राहील (अंदाजी स्वरूपात) सांगितले जाईल. ज्या ठिकाणी, उदाहरणार्थ पारादीप, डायमंड हार्बर (कोलकाता) येथे एक मीटरपेक्षा कमी उंची असेल तेथे प्रतिबंधात्मक उपायांची गरज नाही.
– डॉ. अरुण बापट, पुणे</strong>

इतर समाजांच्या अंधश्रद्धांचे काय?
आंबेडकरवादी जनतेतील काहीजण अजूनही धागेदोरे, गंडेदोरे घालून पुरोगामी चळवळीला तसेच आंबेडकर, बुद्धांच्या धम्माला हरताळ फासतात, हे काही अंशी सत्यही आहे. परंतु हा प्रकार इतर मागासवर्गीय तसेच उच्च जातींमध्येही चालतोच. उलटपक्षी जास्तच असतो. मग त्या तुलनेत आंबेडकरी जनता कमी अंधश्रद्धाळू आहे. इतर समाजांकडूनही पुरोगामी व विज्ञानवादाची अपेक्षा ठेवायला किंवा रुजवायला काय हरकत आहे ?  समतावादी, विज्ञानवादी समाजाची अपेक्षा फक्त आंबेडकरवादी जनतेकडूनच का ?
सचिन धोंगडे, अकोले (अहमदनगर)

शेतकरी शहाणे झाले..
‘कांदा उत्पादक मात्र आपल्याला पाठच दाखवतो – केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची खंत’ ही बातमी (लोकसत्ता, २५ डिसेंबर) वाचून मनोरंजन झाले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली दलालांना व व्यापाऱ्यांना भाववाढ करण्यास उत्तेजन देण्याची राजनीती आता शेतकऱ्यांनाही चांगली माहीत झाली आहे, असाच या बातमीचा अर्थ होतो.
सुहास सहस्रबुद्धे, पुणे

केवळ जन्माआधारेच?
देवयानी खोब्रागडे प्रकरणी वांद्रे येथे चेतना महाविद्यालयाजवळ अनेक आरपीआय कार्यकर्त्यांनी डॉमिनो  शॉपवर हल्ला केला आणि तोडफोड केली हे वृत्त (२१ डिसेंबर) अनेक वर्तमानपत्रांत वाचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन केले, तेव्हा जन्माच्या आधारावर वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करण्याचा निषेध त्यांच्या अनुयायांनी केला. असे असताना देवयानी खोब्रागडे यांना केवळ जन्माच्या आधारावर ‘दलित’ मानणे ही मनुवादी वृत्ती नाही का?
केशव आचार्य, अंधेरी.

एनजीओंमुळे सरकार ‘नॉट गोइंग ऑन’!
‘एनजीओकरणाचे बळी’ हा  अग्रलेख (२५ डिसेंबर) वाचला. भावनेच्या आहारी जाऊन पर्यावरण पुळका दाखवणारे सरकार आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रपंच का मांडत आहे कळत नाही.
कुणाचे केव्हा, किती ऐकायचे याचे तारतम्य हा तर शासनाचा कणा आहे. तेव्हा ऊर्जानिर्मिती प्रक्रियेचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र स्वायत्त संस्था- समिती नेमलेली असेल तर त्यातल्या तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन पावलं उचलली पाहिजेत. स्वायत्त संस्था- समितीत उद्योगपती, शास्त्रज्ञ, विचारवंत, लोकांना विश्वासात घेऊन सर्व बाजूंनी पटवून देणारे निस्पृह नेते – समाजसेवक आणि निवृत्त अनुभवी अधिकारी असावेत. तशा यंत्रणा भारतात आहेतही.
त्यांचा वापर झाला नाही, तर ‘एनजीओ’ म्हणजे ‘नॉट गोइंग ऑन’ असं म्हणायची वेळ येईल.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे