News Flash

वधस्तंभावरील लोकशाही

इजिप्तमध्ये ५२९ जणांना एकाच वेळी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, ही घटना धक्कादायक खरी. पण तेवढीच ती क्रांतीसाठी कासावीस होत असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.

| March 27, 2014 02:12 am

इजिप्तमध्ये ५२९ जणांना एकाच वेळी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, ही घटना धक्कादायक खरी. पण तेवढीच ती क्रांतीसाठी कासावीस होत असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. ती समजून घ्यायची, तर आधी तहरीर चौकात जावे लागेल. ठिकठिकाणी स्वातंत्र्याची दुसरी, तिसरी, चौथी लढाई लढत असलेल्या क्रांतिवाद्यांसाठी इजिप्तमधला तहरीर चौक म्हणजे तीर्थक्षेत्रच झाला होता. त्याची ऑनलाइन धूळ मस्तकी लावून या नवक्रांतिकारकांच्या फौजा तेव्हा रस्तोरस्ती उतरल्या होत्या. आपल्याकडे त्यातील काही मेणबत्त्या विझल्या. काही व्यवस्थांकित झाल्या. काही अरब देशांत सत्तापालट झाले. आणि त्याच सत्तापालटास क्रांती म्हणण्यात येऊ लागले. इजिप्तमध्येही तेच घडले. तेथील होस्नी मुबारक हे पाश्चात्त्य परिमाणाने हुकूमशहा. लोकांनी त्यांचे सरकार उलथवून लावले. या लोकांचे नेतृत्व केले मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेने. ही कट्टरतावादी संघटना. या कथित क्रांतीचे निमित्त साधून तिने ‘फ्रीडम अ‍ॅण्ड पीस पार्टी’ नावाचा पक्ष जन्मास आणला. जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘१९८४’ या कादंबरीत वर्णन केलेल्या ‘न्यूस्पीक’चे याहून उत्तम उदाहरण अलीकडच्या काळात शोधूनही सापडणार नाही. मुबारक यांच्या सत्ताच्युतीनंतर तेथे लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाली. या स्वातंत्र्य आणि शांतता पक्षाने मोहम्मद मोर्सी यांना उमेदवारी दिली. त्यांनी भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची हमी दिली. त्यास भाळलेल्या लोकांनी अपेक्षेनुसार या स्वातंत्र्य आणि शांतता पक्षाला ५१.७ टक्के मते दिली. पक्षाचे नेते मोहम्मद मोर्सी इजिप्तचे अध्यक्ष बनले. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले इजिप्तचे पहिले अध्यक्ष म्हणून अमेरिकेसारख्या लोकशाहीच्या ठेकेदार राष्ट्रांनी त्यांचा उदोउदो केला. इस्रायल आणि मुस्लीम ब्रदरहूडमधील विळ्याभोपळ्याचे सख्य पाहता अमेरिकेची ही कृती तशी बुचकळ्यात टाकणारीच होती. परंतु क्रांतीची नशा सर्वानाच चढली होती. त्यात ओबामा आणि जॉन केरी हेही वाहून गेले. मोर्सी यांनी क्रांतीच्या शत्रूंना नामोहरम करण्याच्या नावाखाली स्वत:कडे अमर्याद अधिकार घेतले होते. कायदे बदलले होते. मुबारक यांची तथाकथित सेक्युलर हुकूमशाही जाऊन मुस्लीम ब्रदरहूडची धर्मशाही सुरू झाली होती. आधीचा मुबारकी कालखंड परवडला, पण मोर्सी यांचे धर्मकारण नको असे नागरिकांस झाले. याविरोधात प्रतिक्रिया येणारच होत्या. पुन्हा क्रांतीच्या मशाली फरफरल्या. तहरीर चौक रक्ताळला.अखेर लष्कराला हस्तक्षेप करावा लागला. मोर्सी अध्यक्षीय प्रासादातून कारावासात गेले. संरक्षणमंत्री अब्दुल फताह अल सिसी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. या सत्ताबदलाने इतिहासाचे एक आवर्तन जणू पूर्ण झाले. आता दमनशाही सोसण्याची पाळी मुस्लीम ब्रदरहूडची होती. परवा ज्या ५२९ जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली ते सगळे मुस्लीम ब्रदरहूडशी संबंधित आहेत. लोकशाही आणि न्यायाचे धिंडवडे काढणारा असाच हा निकाल. त्याची अंमलबजावणी करणे लष्करशहांनाही शक्य नाही, हे उघडच आहे. पण या निकालाने इजिप्तमधील क्रांतीचे काय करायचे, असा प्रश्न मात्र अमेरिकेसारख्या त्याच्या पाठिराख्या देशांना पडला आहे. सध्या अमेरिकेने इजिप्तला केली जाणारी सुमारे १.५ बिलियन डॉलरची मदत रोखली आहे. ती खुली करण्यासाठी स्वत: जॉन केरीच उत्सुक आहेत. त्यासाठी इजिप्तने लोकशाही मार्गावर यावे, एवढीच त्यांची अट आहे. प्रश्न असा आहे, की इजिप्तमधील क्रांती, प्रतिक्रांती, पुन्हा त्याविरोधातील क्रांती आणि तेथे कायम वधस्तंभावर दिसत असलेली लोकशाही यांची सांगड कशी घालायची?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 2:12 am

Web Title: democracy on gibbet
Next Stories
1 ‘अशोकपर्वा’चा अस्त आणि उदय..
2 उरले एक युग मागे..
3 चीनचे ‘अपघाती’ राजकारण
Just Now!
X