20 September 2020

News Flash

वजाबाकी आणि भागाकार

काश्मिरी पंडित आपापल्या घरांतून, गावांतून, खोऱ्यातून बाहेर पडले- ‘निर्वासित’ झाले. ही केवळ वजाबाकी नव्हती.. एका समाजाची, त्याच्या चालीरीतींची आणि ‘सांस्कृतिक बहुविधते’च्या एका घटकाची शकले यामुळे

| June 13, 2015 12:35 pm

काश्मिरी पंडित आपापल्या घरांतून, गावांतून, खोऱ्यातून बाहेर पडले- ‘निर्वासित’ झाले. ही केवळ वजाबाकी नव्हती.. एका समाजाची, त्याच्या चालीरीतींची आणि ‘सांस्कृतिक बहुविधते’च्या एका घटकाची शकले यामुळे झाली.. अनुभवकथनांतून उलगडणारा हा भागाकार मनामनांपर्यंत पोहोचला आहे..

सुशील पंडित दिल्लीत जन्मला आणि तिथेच शिकला, रुळलाही. त्याचे आई-वडील फार पूर्वीच कधी तरी दिल्लीत आले आणि तिथेच स्थिरावले. १९८९ च्या सुमारास कधी तरी.. सुशील िहदी आणि इंग्रजीतच बोलतो. त्याला काश्मिरी भाषा येत नाही. त्याच्या मुलांना तर माहितीच नाही. मध्येच कधी तरी काश्मिरात जाण्याचा योग आला. आपल्या गावाची आठवण झाली. त्याच्या वडिलांचे वयही ७५च्या सुमारास असेल. गेली अनेक वष्रे तेही तिकडे गेलेले नाहीत. कोण जाणार.. पण आता जावे, मुलांनाही आपला गाव दाखवावा, म्हणून ठरवाठरवी करून- अगदी पर्यटकांसारखी तयारी करून तो निघाला. ट्रेनने जम्मूपर्यंत पोहोचला. तिथून पुढे रस्त्याने प्रवास. सर्व काही नवे वाटत होते. काही जुन्या खुणा दिसत होत्या. लहानपणच्या आठवणींना उजळा मिळत होता. अखेर एका घरासमोर गाडी थांबली. फारसे कोणी ओळखीचे नव्हते. पण एक जण माहिती द्यायला पुढे सरसावला. ‘आम्ही इथे राहत होतो,’ असे सांगितल्यावर अनेक जण चौकशीला आले. अर्थात, घरात कोणी तरी अन्य राहत होते. बरीच वष्रे ते पडून होते, अशी माहिती मिळाली. त्यातूनच ओळखीचे चेहरे सापडले आणि आस्थेवाईक चौकशी झाली. घराजवळच एक महादेवाचं मंदिर. तिकडे हे सर्व गेले. पण ते बंदच. ते उघडून थोडी साफसफाई केली आणि महादेवाला अभिषेकही केला. मग जुन्या लोकांबरोबर गप्पाही झाल्या. आठवणीही निघाल्या..
अशा प्रकारे सुशीलचे ‘पर्यटन’ झाले. काश्मीर पाहून झाले. कधी काळी जे ‘माझे घर’ होते त्याला आता पर्यटक म्हणून भेट द्यावी लागतेय, याचा सल त्याच्या मनात राहिला. आता माझे काहीच तिथे राहिले नाही, हे दु:ख मनात कुठे तरी आहेच.
.. हीच परिस्थिती काश्मिरातील निर्वासित झालेल्या लाखो पंडितांची आहे. ती ‘फ्रॉम होम टू हाऊस’ या पुस्तकातील अनेक आत्मनिवेदनपर कथा व कथनांमधून दिसते. काश्मिरातील निर्वासितांची काय स्थिती आहे, ते आहेत कुठे, कोणत्या स्थितीत त्यांनी घर सोडले, त्यांची दैना कशी झाली, याचे चित्रण त्यांनी स्वत:च केले आहे. आपले घर सोडणे, गाव सोडणे यामुळे आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकते, याचे विदारक चित्र या कथा उभ्या करतात.
ओंकारनाथही असाच आपले घर पाहायला गेला होता. ते अप्रतिम निसर्गसौंदर्य, ती मोकळी हवा त्यांनी आपल्या श्वासात भरून घेतली परत येताना. त्याचा मित्र त्याला राहायला सांगत होता; पण इच्छा असूनही आपल्याच गावात राहणे त्याला शक्य नव्हते. किती लोक इथे आले-गेले याचा लेखोजोखा लष्कराला ठेवावा लागतो. त्यामुळे परत एखादा आला नाही तर चौकशी, कारणमीमांसा सुरू होते. ओंकारनाथ जम्मूतील निर्वासितांच्या छावणीत राहतो. त्याच्या मुलांना अजून संचारबंदी कळत नाही. बाहेर जाहीर सूचना आली की मुले घरी विचारतात काय झालंय म्हणून. पण हळूहळू त्यांनाही कळेल, असे म्हणणारा हा ओंकारनाथ, आपल्याच घरी जाण्यासाठी रीतसर परवाना मागण्याची वेळ निर्वासितांवर आल्याची खंत वाचकांपर्यंत पोहोचवतो.
हिमाच्या आईला अजमेरच्या दग्र्यात जायचे होते. लहानपणापासून ते भक्तिभावाने ख्वाजाची प्रार्थना करत. तिच्या आईला वाटत असे की या दग्र्यात शिवाचा वास आहे. तिथे पायरीवर डोके ठेवतानाही ती ओम नम: शिवाय म्हणते. इतरांनी ऐकावे म्हणून जरा मोठय़ानेच म्हणते. ज्या टांग्याने हिमा दग्र्याला गेली तो टांगेवाला काश्मिरी होता. त्याच्या म्हणण्यानुसार भारत असो की पाकिस्तान, आम्हाला काही फरक पडत नाही. नाही तरी तुम्ही सर्व गेलात, आता तिथे लष्करी जवान आहेत, तेही जातीलच. मग काय काश्मीर स्वतंत्रच ना..
माखनलालचे कुपवाडात घर, जमीन सर्व काही होते. कंत्राटदार होता तो. एका संध्याकाळी काही मुस्लीम शेजाऱ्यांनी त्याला सांगितले की काही लोक त्याला मारणार आहेत. काही तास हा रस्त्यावरच्या पाइपमध्ये लपून बसला सहकुटुंब. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने आपली पत्नी आणि पाच मुलींसह जम्मू गाठले. तिथे छावणीचा आसरा घेतला. तिथे तर अनेक अडचणी. अगदी साध्या तंबूत राहावे लागते. सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. तिथेही खूप गर्दी. सरकार कुटुंबाला ५०० रुपये देते. आता ते वाढवून म्हणे १००० रुपये केलेत. आणि रेशन कार्ड मिळते. त्यावरून तुम्ही धान्य घेऊ शकता. बाकीचा खर्च तुमचा तुम्हालाच करावा लागतो. छावणीत कोणत्याही सुविधा पुरवलेल्या नाहीत. परंतु लोकांचा नाइलाज असल्यामुळे त्यांना तिथे राहावे लागते. आपले छान, सुंदर घर असतानाही अशा छावणीत आश्रय घ्यावा लागतो. सरकारने निर्वासितांसाठी काही इमारती बांधल्या आहेत. तिथे एक छोटी खोली मिळते. इतर सुविधांची वानवाच. त्यामुळे ज्यांना शक्य होते ते लोक हळूहळू दिल्लीत गेले. बाकी काही इतर राज्यांमध्येही स्थायिक झाले. काही परदेशातही गेले.
मुळात आता काश्मिरी पंडितांचा असा एकत्रित काही समाज उरलेलाच नाही, याचेही दु:ख या काही कथांमधून लेखक मांडतात. केवळ निर्वासित झालो एवढय़ापुरते ते सीमित राहत नाही. जसा समाज विखुरला तसे नातेसंबंधही विखुरले गेले. रैना, धर, जलाली, कौल, कोटरस, खजांची यांसारखी काश्मिरी पंडितांची नावे आता चोप्रा, मेहरा, चटर्जी, अहलुवालिया, अगरवाल, पंडय़ा यांच्यात मिसळून गेली आहे. नातेसंबंध वाढवायला आपली माणसे तर जवळ हवीत ना. कोण कुठे गेले माहीत नाही, वाट फुटेल तिकडे गेले. सामाजिक स्थित्यंतराचा असाही एक अनुभव हे लोक घेत आहेत. आता जवळजवळ २०-२५ वष्रे झाली. त्यामुळे आता पंडितांच्या नव्या पिढय़ांना काश्मीर माहीतच नाही.
सन १९९०च्या सुमारास जवळपास साडेतीन लाख काश्मिरी पंडित खोरे सोडून जम्मूत आले. दहशतवादाची समस्या होती. पण एक मोठी सामाजिक घुसळणही होती. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लोक जम्मूत आले तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना स्वीकारले की नाही.. तिथेही काही वाद झाले. तिथल्या डोग्रा समाजाच्या रीतीभाती वेगळ्या होत्या. त्यामुळे पंडितांना स्वीकारणार कसे? डोग्रा समाज प्रामुख्याने सूर्यपूजा करणारा, तुळशीला पाणी घालणारा, नागाला दूध पाजणारा आणि महत्त्वाचे म्हणजे शुद्ध शाकाहारी. तर पंडित शिवाची पूजा करणारे, रात्री उशिरापर्यंत प्रार्थना करणारे, मटण, कोंबडी आणि मासे खाणारे होते. त्यामुळे त्यांना कोण डोग्रा ठेवून घेणार आपल्या घरात? पंडित घरात गुपचूप मांसाहार करीत. इंग्रजी पेपरवाचनामुळे पंडितांची इंग्रजी भाषा चांगली होती, पण िहदी फारशी बरी नव्हती. तर डोग्रांची िहदी चांगली होती. त्यामुळे सुरुवातीला संवादातही अडचणी येत असत. परंतु दोन्ही समाजांनी एकमेकाला स्वीकारले आणि एकमेकांच्या चालीरीतीही स्वीकारल्या. समाजांनी खुलेपणा ठेवला की प्रगती कशी होते, याचेही विवेचन लेखकाने उत्तम केले आहे. पंडितांमुळे डोग्रा समाजातही शिक्षणाचे महत्त्व वाढले आणि त्यांच्याही मुली शिकू लागल्या. त्यामुळे डोग्रांची प्रगती मोठय़ा प्रमाणावर झाली, असेही निरीक्षण शालीन कुमार सिंग यांनी त्यांच्या कथनात नोंदविले आहे.  काश्मीरच्या अनेक समस्या आहेतच. त्यांचा वेध सर्वच लेखकांनी घेतला आहे. परंतु इतरही अनेक स्तरांवर ही सामाजिक घुसळण झाली, हे दाखवण्याचा प्रयत्न हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.
गेल्या वर्षी नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात आले, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला मोठा पािठबा मिळाला. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार मोदींनी केला आहे. सहा हजार कुटुंबांनी आपल्याला खोऱ्यात परतायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश जास्त आहे. तरुणांची परतण्याची मानसिकता फारशी दिसत नाही. मोदींनी निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी नोकरी, जमीन देऊ केली असली तरी तरुणांच्या मनात आपल्या करिअरविषयी वेगळे दृष्टिकोन आहेत. ते काश्मीरमध्ये उपलब्ध नाही, असे त्यांना वाटते. सध्या काश्मीर खोऱ्यात असलेल्या पंडितांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिचित मुस्लीम कुटुंबांसोबत राहणे ते सुरक्षित मानतात. ही स्थिती पाहता, निर्वासितांचे पुनर्वसन करताना खोऱ्यातील मुस्लीम समाजाला प्रथम विश्वासात घ्यावे लागणार आहे आणि ते आव्हानात्मक असेल, असे लेखक एम. एल काक यांनी म्हटले आहे. परंतु मोदींनी पंडितांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे, हे मात्र खरे. मुळात या संपूर्ण पुस्तकात काश्मीर खोऱ्यात आपसात वाद असल्याचा कुठेही उल्लेख नाही. सर्वच पंडितांचे अनुभव हे चांगलेच आहेत. त्यांचे मुस्लिमांशी घनिष्ठ शेजारसंबंध आहेत. आजही अनेक जण जे आपली घरे पाहायला जातात तेव्हा त्यांचे शेजारी त्यांचे उत्तम आगतस्वागत करतात, आणि कायमचे इथे राहायलाच या अशी गळही घालतात. पण दहशतवादापासून सुटका सर्वानाच हवी आहे.

‘फ्रॉम होम टु हाऊस’
संपादन – अरिवद गिगू, शालीन कुमार सिंग, आदर्श अजित
प्रकाशक – हार्पर कॉलिन्स इंडिया
पृष्ठे – २१६ किंमत- ३५० रुपये.

जयवंत चव्हाण – jaywant.chavan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:35 pm

Web Title: from home to house
Next Stories
1 प्रतिमानिर्मितीमधील विरोधाभास
2 साहसकथेला वास्तवाचा तडका
3 सुरक्षेपुढील गुंत्यांचा आढावा
Just Now!
X