मागील लेखात पृथ्वीवरील पहिली सजीव पेशी व त्यापूर्वी तिचा पूर्वज असलेला ‘रेप्लिकेटर’ हे कसे निर्माण झाले असावेत ते आपण थोडक्यात पाहिले. या आदिपेशींतील डीएनएमधील थोडय़ा थोडय़ा फरकांमुळे त्यांच्या वंशजांमध्ये कमालीची विविधता निर्माण झाली. हे वेगवेगळे सजीव, जिवाणू जगण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून, वेगवेगळी रसायने मिळवून वेगवेगळी प्रथिने बनविण्यात तरबेज झाले आणि निर्जीव पृथ्वीवर आणखी एक अब्ज (१०० कोटी) वर्षे फक्त अशी जिवाणूंचेच राज्य होते. या दीर्घकाळात त्यांनी जगण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधल्या व नंतर नंतर त्यांचा आकारही शेकडो- हजारोपट मोठा झाला. तसेच काही विनाकेंद्रीय पेशींमधून ‘केंद्र असलेल्या पेशी’ निर्माण झाल्या व वाढल्या. ते राहो. आजच्या मलेरियासारख्या आजारांचे जंतू-जीवजंतू हे सुरुवातीच्या एकपेशीय जीवांचेच वंशज आहेत.
केंद्र असलेल्या पेशी निर्माण होत असतानाच दुसऱ्या दोन प्रकारच्या बॅक्टेरियांनी चयापचयासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याच्या युक्त्या शोधून काढल्या होत्या. पहिले सायनोबॅक्टेरिया (म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा हरितद्रव्य) हे केवळ सूर्याची ऊर्जा वापरून स्वत:चे अन्न तयार करू शकत होते; तर दुसरे, सेंद्रिय द्रव्ये खाऊन ऊर्जा निर्माण करू शकत होते; पण त्यांना ऑक्सिजन आवश्यक होता. सायनो बॅक्टेरियांनी कर्बग्रहणाच्या प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकलेला ऑक्सिजन, त्या दुसऱ्या प्रकारच्या बॅक्टेरियांना उपयोगी पडू लागला. अशा सर्व प्रकारच्या बॅक्टेरियांची नैपुण्ये प्राप्त करण्यासाठी काही सकेंद्रीय पेशींनी अशा बॅक्टेरियांना चक्क गिळून ती क्षमता प्राप्त केली. ज्या पहिल्या गटातल्या पेशींमध्ये हरितद्रव्य आले त्या झाल्या ‘वनस्पतीज पेशी’ व दुसऱ्या गटातल्या पेशी झाल्या ‘प्राणिज पेशी’. वनस्पतीज पेशींतील हरित द्रव्यामुळे सर्व वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आणि जमिनीत आपली मुळे पसरवून स्वत:चे अन्न उभ्या जागी स्वत:च निर्माण करू शकतात. प्राणिज पेशींना मात्र अन्न मिळविण्यासाठी हालचाल करावी लागते. वनस्पतीज पेशींनी निर्माण केलेला ऑक्सिजन, प्राणिज पेशींना उपलब्ध होऊ लागल्यापासून, दोन अब्ज वर्षे धिम्या गतीने चालणाऱ्या उत्क्रांतीला नव्या सहकार्यामुळे वेग प्राप्त झाला. वनस्पतीज पेशींतून विविध वनस्पती आणि प्राणिज पेशींतून विविध प्राणी उत्क्रांत होऊ लागले. त्यामुळे पृथ्वीवर जैवविविधता तयार झाली.
साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली ‘अल्गि शेवाळ’ (जी वनस्पतींची पूर्वज होती) तिचे जीवाश्म (फॉसिल) ऑस्ट्रेलियात सापडलेले आहेत; परंतु पाण्यात व काठावर वनस्पती फोफावू लागल्या त्याचा प्रत्यक्ष पुरावा फक्त ५०-६० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय त्या वनस्पतींना आजच्यासारखी फळे-फुले नव्हती. फळे, फुले, बिया नव्हत्या म्हणजे त्या पद्धतीचे पुनरुत्पादनही नव्हते. फुले, फळे असलेल्या वनस्पती फक्त दहा-बारा कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या आहेत. म्हणजे तत्पूर्वी पृथ्वीवर वनस्पतींची आजच्यासारखी जंगलेसुद्धा नव्हती; पण आता वनस्पतींच्या उत्क्रांतीतील हा मोठा टप्पा बनला.
प्राणिज पेशींपासून प्रथम ‘अमिबा’सारखे एकपेशीय प्राणी-जीव निर्माण झाले. अन्नकण गिळणाऱ्या अशा अमिबांच्या जवळजवळ पाच हजार जाती आहेत. एकपेशी जीवांतून पुढे अनेक प्रकारचे बहुपेशीय सूक्ष्म जीव बनले. त्यातील काही मोठे झाले, काहींनी विविध क्षमता प्राप्त केल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण माणूस जसा सामाजिक प्राणी आहे तशा मुंग्या आणि मधमाशाही सामाजिक प्राणी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र इच्छा नसूनही त्या समूहाने राहतात, समूहाचे नियम पाळतात, कामाची विभागणी करतात, एकमेका साह्य़ करतात, कुटुंबनियोजनही करतात. टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे. ते सर्व राहो.
आजपासून ४४ कोटी वर्षांपूर्वी ‘माणसाचे पूर्वज’ ‘माशाचे जीवन’ जगत होते. तेव्हा आपण (म्हणजे आपल्या पूर्वजांचे पूर्वज किंवा आपले ‘अतिपूर्वज’ म्हणू या.) चक्क मासे होते मासे. हे आश्चर्याचा धक्का बसावा असे आहे, पण ते खरे आहे. नंतर साधारण ३४ कोटी वर्षांपूर्वी आपल्या या मत्स्य पूर्वजांनी समुद्रातून बाहेर येऊन ते जमिनीवर आले, ‘उभयचर’ बनले. म्हणजे त्यांच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन होऊन आधी त्यांना हवेच्या पोकळ्या व मग प्राथमिक फुफ्फुसे बनली असावीत. म्हणजे पाण्याप्रमाणेच जमिनीवरच्या हवेत जगण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली. तेव्हा विषुववृत्तावर फुले नसलेल्या वनस्पती निर्माण झाल्या होत्या, दक्षिण ध्रुवावर बर्फ जमू लागला होता. इतरत्र हवामान साधारण आजच्यासारखे असावे. अशा वेळी चार पायांचा ‘टेट्रापॉड’ जमिनीवर उत्क्रांत झाला. त्याच्यापासून पुढे चार प्रकारच्या जीवजाती उत्क्रांत झाल्या. त्या अशा- १) बेडकासारखे उभयचर प्राणी २) सरपटणारे प्राणी ३) पक्षी व ४) आपल्यासारखे सस्तन प्राणी. या प्रत्येक जातिसंघात हजारो प्रकारचे प्राणी पृथ्वीवर आहेत.
नंतर साधारण २२ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा जमिनीवर जीवसृष्टी पसरत होती, पण तरीही बहुतांश जीवसृष्टी अजून समुद्रातच होती, तेव्हा एक ‘पर्मियन विध्वंस’ होऊन गेला. ज्वालामुखी अचानक जागे होऊन, दहा लाख वर्षे ते आग ओकत राहिले, खंडांचे आकार व स्थाने बदलू लागली. ज्वालामुखींच्या धूरधुळीने सूर्यप्रकाश अडला, हिमयुग सुरू झाले. जमिनीवर बर्फच बर्फ, पाऊस पडला तरी आम्लयुक्त पडायचा, खायला काही नाही. तेव्हा बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली.
त्यातून जे वाचले अशा काही वेगवेगळ्या आकारांच्या सरडय़ासारख्या प्राण्यांपासून हळूहळू आकाराने मोठे होत गेलेले विविध प्राणी पृथ्वीवर वावरू लागले. हाच तो सुप्रसिद्ध ‘डायनासोरचा काळ’ होय. हे प्राणी राक्षसी सरडय़ांसारखे महाकाय होते. कुणी शाकाहारी, कुणी मांसाहारी, कुणी एकमेकांना खाणारे, कुणी पाण्यात, कुणी जमिनीवर राहणारे, तर कुणी उडू शकणारे. जवळजवळ दहा कोटी वर्षे ते पृथ्वीवर सर्वात बलिष्ठ प्राणी म्हणून वावरले व सुमारे सहा-साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अचानक ‘क्रेटेशियन विध्वंसाने’ (बहुधा प्रचंड उल्कावर्षांवाने) पृथ्वीवरून नष्ट झाले.
डायनासोरच्या काळी आपले म्हणजे माणसाचे अतिपूर्वज हातभर चिचुंद्री किंवा घुशीसारखे दिसणारे, लहान आकाराचे व संख्येने कमी असलेले प्राणी होते. दिवसा ते भीतीमुळे गुहांमध्ये लपून राहायचे. रात्र होऊन डायनासोर झोपले की, हे निशाचरासारखे बाहेर येऊन भक्ष्य शोधायचे. या दहा कोटी वर्षांत त्यांच्यातही महत्त्वाचे बदल होतच होते.
ज्या कुणा सस्तन प्राणिवर्गातील पूच्छविहीन मर्कट जातीपासून पुढे मानव उत्क्रांत झाला, तो सहा किंवा चार कोटी वर्षांपूर्वीपासून भूतलावर माकडासारखा वावरत असावा. तो अन्न, निवारा व स्वसंरक्षणासाठी जंगलात वृक्षांवर राहात होता. बहुधा दोन-अडीच कोटी वर्षांपूर्वी तो मागचे दोन पाय चालण्यासाठी व पुढचे दोन पाय हातासारखे वापरण्याचा प्रयत्न करू लागला असावा. उत्क्रांतीच्या या पायरीचा प्रत्यक्ष पुरावा ‘रामपिथेकस’ नाव दिलेल्या, भारत व पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या जीवाष्माच्या रूपाने उपलब्ध आहे. या किंचित उत्क्रांत पूच्छहीन वानराचा पुरावा एक कोटी २० लक्ष वर्षांपूर्वीचा असून तो जरा वाकून, पण दोन पायांवर चालू शकत होता. त्यापुढे, आजपासून सुमारे ७० लक्ष वर्षांपूर्वी गोरिला व चिम्पाझी यांचे पूर्वज व माणसाचा वानर पूर्वज हे तीन ‘ऑस्ट्रेलोपिथेकस’ हे आधीच्या वानर पूर्वजांपासून उत्क्रांत झाले. (आजच्या प्रगत ‘जेनेटिक्स’ या विज्ञानाने असे दाखवून दिलेले आहे की, ‘मानव, चिम्पाझी व गोरिला’ या तिघांच्या शरीरांतील प्रथिने, होमोग्लोबिनस् व डीएनए यात कमालीचे साम्य आहे.) त्यानंतर पन्नासेक लाख वर्षांनी म्हणजे आजपासून १५-२०लाख वर्षांपूर्वी ‘होमो हॉबिलिस’ ही हातांचा काहीसा वापर करू लागलेली ‘वानर-मानव’ जात, त्यानंतर आजपासून दहा किंवा १२-१३ लाख वर्षांपूर्वी दोन पायांवर ताठ चालणारी ‘होमो इरेक्ट्स’ ही ‘आदिमानवजात’ व फक्त दीड-दोन लाख वर्षांपूर्वी होमो सॅपियन (शहाणा मानव) ही जात उत्क्रांत होऊन ते मानव सबंध पृथ्वीवर कसे पसरले ते आपण या लेखमालेच्या पहिल्या दोन लेखांत पाहिले आहे.
प्रस्तुत लेखाच्या शेवटी एक विचार मांडतो. प्रचंड आकाराचे व शक्तीचे ‘डायनासोर’ ज्यांनी या पृथ्वीवर, सर्वात बलिष्ठ प्राणी म्हणून दहा कोटी वर्षे(!) राज्य केले, ते जर या पृथ्वीवरून एका झटक्यात नष्ट होऊ शकले, तर इथे ‘काल आलेला हा दुबळा माणूस प्राणी’ ज्याने आधीच (म्हणजे गेल्या दोन-तीन शतकांत) अक्षम्य चुका करून, सबंध पृथ्वीवरचे वातावरण कार्बन डायऑक्साइडने भरून टाकले आहे, त्याने आपली ही मानवजात, अजून काही लाख किंवा हजार किंवा निदान १०० वर्षे तरी या पृथ्वीवर टिकून राहील, असा विश्वास बाळगू नये हे बरे! कारण काही घोटाळा झालाच, तर आपल्याला वाचवायला, टिकवायला, आपल्या कल्पनेतल्या देवासारखा, निसर्ग काही दयाळू, प्रेमळ वगैरे नाही! तर माणसा, सांभाळून राहा रे बाबा! देवांची देवळे बांधून व त्यांच्या प्रार्थना करून काही उपयोग नाही. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा विध्वंस, सर्वनाश नको असेल तर आधी निसर्गाला सांभाळ. त्याला जप! उत्क्रांतीने मेंदू, बुद्धी प्राप्त झालेला एकमेव सजीव म्हणून तुझे ते ‘कर्तव्य’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humans forefathers
First published on: 13-07-2015 at 03:30 IST