क्रिकेटचा महाकुंभमेळा आजपासून सुरू झाला. मात्र  गतविजेता भारत यंदा हा पराक्रम करू शकणार नाही,  याची क्रीडाप्रेमींनी बहुधा मनाची तयारी केली असावी. कारण भारतीय क्रिकेट चाहत्यांचा जोश, उत्साह आणि अपेक्षा यंदा अभावानेच पाहायला मिळत आहे.

दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या रूपातील क्रिकेटचा महाकुंभमेळा आजपासून सुरू झाला आहे. आठ पारंपरिक, दोन कसेबसे आणि चार लिंबूटिंबू क्षमतेचे देश खेळत असलेल्या या स्पर्धेला महाकुंभ वगैरे म्हणणे ही अतिशयोक्तीच. पण ज्या आठ-नऊ देशांतील संघांत नेमाने क्रिकेट खेळले जाते, त्या प्रत्येक देशाला आपणच क्रिकेटची पंढरी, काशी वा मक्का आहोत, असे वाटत असते. या समजापुढे कोणतीही अतिशयोक्ती खरीच वाटू लागते. क्रिकेट हा जणू देशाचा धर्मच ठरतो, खेळाडू देव ठरतो आणि विश्वचषक कुंभमेळा वगैरे ठरतो. दुसरीकडे क्रिकेटचे अतोनात व्यावसायिकीकरण होते आहे याबद्दल खंत व्यक्त होत राहते. यंदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश संयुक्तपणे स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. याच दोन देशांकडे यापूर्वी १९९२ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद होते तेव्हा क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली. खेळाडूंचे रंगबिरंगी कपडे, प्रकाशझोतात खेळले गेलेले दिवसरात्र सामने आणि पांढरा चेंडू या तीन गोष्टींनी एकदिवसीय सामन्यांना व पर्यायाने क्रिकेटला नवी ऊर्जा मिळवून दिली. त्यानंतर आतापर्यंतच्या काळात क्रिकेटचे नियम, सामन्यांचे स्वरूप, खेळणारे देश अशा अनेक गोष्टींत वेळोवेळी बदल झाले, पण या सगळय़ांच्या मुळाशी १९९२ चा विश्वचषक होता. क्रिकेटचे व्यावसायिकीकरण होण्याची सुरुवातही त्या विश्वचषकापासूनच झाली. मात्र या वाटचालीनंतरचे अटळ वादळ यंदाच्या विश्वचषकापुढे आहे.  
तब्बल २३ वर्षांनी कांगारू आणि किवींच्या भूमीवर परतलेली यंदाची विश्वचषक स्पर्धा ही गेल्या चार विश्वचषकांसाठीच्या लढती गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, राहुल द्रविड, शेन वॉर्न, ब्रायन लारा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन या खेळाडूंविना होणार आहे. त्यांची जागा नव्या दमाच्या, तरुण रक्ताच्या क्रिकेटपटूंनी घेतली आहे. यंदाच्या स्पर्धेत अव्वल दहा संघांतील तब्बल ९२ खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषकासाठी खेळणार आहेत. टी-२०, आयपीएल, बिग बॅश अशा झटपट क्रिकेटच्या मुशीत घडलेल्या पिढीच्या कामगिरीवर केवळ त्यांचेच नव्हे तर क्रिकेटचेही भवितव्य अवलंबून आहे. एकदिवसीय क्रिकेटची जागा टी-२० किंवा त्याहीपेक्षा कमी आकाराचे क्रिकेट किती झपाटय़ाने घेईल, हे या विश्वचषक स्पर्धेतून ठरेल. ९२ च्या विश्वचषकानंतर कसोटीचे प्रस्थ कमी होऊन एकदिवसीय क्रिकेटचा बाज चढत गेला. पण आठेक वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यापासून एकदिवसीय क्रिकेटही वेळखाऊ वाटू लागले आहे. कमी वेळेत अधिक पैसा कमावण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन तर ५० पेक्षा २० षटकांचा खेळ अधिक प्रिय ठरण्यामागे होताच. त्यातच गेल्या आठ वर्षांतच क्रिकेटच्या क्षितिजावर उदयास आलेला विराट कोहली, अजिंक्य रहाणे, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स अशा खेळाडूंचा वर्ग झटपट क्रिकेटचे प्रतिनिधित्व करीत आहे. हा वर्ग क्रिकेटचा गुणात्मक आविष्कार दाखविण्यापेक्षा संख्यात्मक पराक्रम गाजविण्याच्या प्रयत्नात अधिक दिसतो.
एकदिवसीय क्रिकेटच्या घसरत्या लोकप्रियतेची धग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) बसू लागली आहे. २०११ च्या विश्वचषकानंतर आयसीसीने यापुढील विश्वचषकात अव्वल दहा संघांनाच प्रवेश देण्याचा निर्धार केला होता. मात्र, भारतासारख्या क्रिकेटवेडय़ा देशातही एकदिवसीय मालिकेपेक्षा आयपीएलच्या सामन्यांची तिकिटे अधिक दराने आणि पटीने खपू लागल्यानंतर एकदिवसीय क्रिकेट रुजवण्यासाठी नव्या भूमीचा शोध घेणे आयसीसीला क्रमप्राप्त होते. त्यातूनच आयसीसीचा निर्धार गळून पडला आणि अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती अशा संघांचा प्रवेश झाला. क्रिकेटवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात संतुलित आणि प्रतिस्पध्र्याना धडकी भरवणारा आहे. वॉर्नर, स्मिथ, क्लार्क, वॉटसन अशी धडाकेबाज फलंदाजांची फळी आणि जॉन्सन, स्टार्क, हेझलवूड, फॉकनर अशी वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या कांगारूंना त्यांच्याच भूमीवर होत असलेली ही स्पर्धा जिंकणे सर्वात सोपे आहे. दुसरीकडे, ‘दबावापुढे गळून पडणारे’ असा कायमस्वरूपी शिक्का बसलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही तोडीस तोड आहे. डेल स्टेनसारखा तुफानी गोलंदाज आणि डिव्हिलियर्स, आमला यांच्यासारखे तगडे फलंदाज असलेल्या या संघाकडे विश्वचषक जिंकण्याची पुरेपूर क्षमता आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ जेतेपदाचे दावेदार आहेत. याशिवाय, संयुक्तपणे यजमान असलेला न्यूझीलंडचा संघ इतिहास घडवू शकतो. या तिघांपलीकडे अन्य संघांच्या विश्वचषक जिंकण्याच्या क्षमतेबाबत साशंकता आहे.
विश्वचषकाच्या दावेदारांच्या यादीत भारत नसणे, ही बाब भारतीय क्रिकेटचे चाहते, आयसीसी आणि जाहिरातजगत या सर्वाचीच घालमेल वाढवणारी असू शकते. स्वप्नवत कामगिरी करून  महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०११ चा विश्वचषक जिंकला होता.  त्याच धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद कायम राखण्याच्या ईष्र्येने स्पर्धेत उतरला आहे. कर्णधार तोच असला तरी संघ पुरता बदलला आहे. विराट कोहली, सुरेश रैना आणि अश्विन हे तिघे वगळता उरलेला संघ पहिल्यांदाच जागतिक जेतेपदाच्या परीक्षेला सामोरा जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दबावाखाली कामगिरी घसरणे स्वाभाविक आहे. पण या संघाच्या एकूण कार्यक्षमतेबद्दलही शंका आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्टय़ांवर जिथे जलदगती गोलंदाजांवर संघाची भिस्त असली पाहिजे, तिथे भारतीय संघाच्या गोलंदाजांकडे अनुभव, वेग आणि नियंत्रण या तिन्ही गोष्टींची कमतरता जाणवते. भारताचे कायमस्वरूपी बलस्थान असलेली फलंदाजीही मोठा चमत्कार घडवण्याच्या क्षमतेची दिसत नाही. तिथेही पण-परंतु आहेच. दोन महिन्यांच्या मुक्कामानंतरही कांगारूंच्या खेळपट्टय़ांवर तग धरणे भारतीय खेळाडूंना जमलेले नाही. भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही बहुधा याबद्दल मनाची तयारी केली असावी. कारण भारतीय क्रिकेटप्रेमींचा जोश, उत्साह आणि अपेक्षा यंदा अभावानेच पाहायला मिळत आहे. अर्थात, ही बाब सच्च्या क्रिकेटप्रेमींपेक्षा आयसीसीसाठीच अधिक चिंताजनक म्हटली पाहिजे. क्रिकेट खेळणाऱ्या दहा-बारा देशांपैकी एकटय़ा भारतातूनच क्रिकेटजगताला ६० टक्के महसूल मिळतो. त्यामुळेच भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्रिकेट मंडळांकडे आयसीसीचे अधिकार एकवटले गेले आहेत. सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या देशातील क्रिकेटप्रेमामुळे जाहिरात कंपन्यांचेही उखळ पांढरे होत असते. पण भारतीय संघाच्या कामगिरीबद्दलच्या साशंकतेने त्यांचीही झोप उडवली आहे.
क्रिकेट विश्वचषकाच्या वादळाने अजूनही भारतात जोर धरला नसल्याचे आणखी एक कारण असू शकते. हे कारण म्हणजे राजकारण. लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिसू लागलेला नरेंद्र मोदी या वादळाचा प्रभाव अगदी महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत कायम होता. तो प्रभाव नेहमीचाच, असे वाटत असतानाच दिल्लीतील निकालाने या समजालाही हादरा दिला. भारतीय प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांच्यातील चर्चेचे आकाश आता कुठे मोकळे होऊ लागले आहे. सध्या हवा संथ आहे. पण उद्या पाकिस्तानच्या संघाशी यशस्वीपणे चार हात झाले की हे कपातले वादळ नव्या जोमाने भारतावर घोंघावू लागेल, हे निश्चित.