News Flash

बुकबातमी: भारतीय वंश, भारतीय जीवनदृष्टी

'बुकर पारितोषिका'साठी यंदाच्या वर्षीची पहिली १३ कादंबऱ्यांची यादी जाहीर झाली आहे, त्यातल्या एकमेव भारतीय कादंबरीकार म्हणजे अनुराधा रॉय, अशी बातमी सर्वच महत्त्वाच्या दैनिकांनी यापूर्वी दिली

| August 1, 2015 03:04 am

‘बुकर पारितोषिका’साठी यंदाच्या वर्षीची पहिली १३ कादंबऱ्यांची यादी जाहीर झाली आहे, त्यातल्या एकमेव भारतीय कादंबरीकार म्हणजे अनुराधा रॉय, अशी बातमी सर्वच महत्त्वाच्या दैनिकांनी यापूर्वी दिली आहे. पण या यादीत भारतीय वंशाचे एक ब्रिटिश कादंबरीकारही आहेत. संजीव सहोटा हे त्यांचं नाव, पण स्पेलिंग मात्र ‘सुन्जीव्ह’ असं वाचलं जाण्याजोगं. ब्रिटनच्या या शेफील्ड भागात संजीव यांचं बालपण गेलं, तिथंच त्यांच्या कादंबऱ्यांची कथानकं घडतात. ‘अवर्स आर द स्ट्रीट्स’ ही त्यांची २०१३ पहिली कादंबरी गाजली, आणि ग्रँटा या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकानं संजीव यांना ‘बेस्ट ऑफ यंग ब्रिटिश नॉव्हेलिस्ट लिस्ट’ या यादीत गणलं. आता नव्या- ‘द इयर ऑफ द रनअवेज’ या कादंबरीला बुकर पारितोषिकाच्या पहिल्या यादीत तरी स्थान मिळालं आहे. संजीव यांच्या दोन्ही कादंबऱ्यांतली पात्रं ही गरीब भारतीय आहेत पण ती ब्रिटनमध्ये राहतात. पहिल्या कादंबरीचा नायक तर, शेफील्डमध्ये घातपात घडवण्याच्या उद्देशानंच आला आहे! दुसऱ्या कादंबरीला नायक असा नाहीच.. तोची, रणदीप आणि अवतार असे तीन स्थलांतरित मजूर, आणि यापैकी रणदीपची- त्याच्यापासून वेगळी राहणारी- पत्नी नरिंदरकौर या चारही पात्रांचं आत्मनिवेदन कादंबरीच्या चार भागांमधून लेखकानं मांडलं आहे. कथाभाग अर्थातच, नरिंदरकौर आणि रणजीत यांच्यातल्या दुराव्याची कारण ंउलगडणारा आहे.
दुसऱ्या ‘भारतीय’ लेखिका अनुराधा रॉय यांची  ‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर’ ही कादंबरी यंदा बुकरच्या यादीत आहे. त्यातही नोमिता ही नायिका, बालपणीच आईवडिलांची हत्या,  घर उद्ध्वस्त होणं हे सारं उघडय़ा डोळय़ांनी पाहाते. धसका बसलेल्या नोमिताला एका आध्यात्मिक गुरूंनी चालवलेल्या अनाथालयात आश्रय मिळतो आणि हे गुरू इंटरनॅशनल कीर्तीचे वगैरे असल्यानं नोमिताला दत्तक घेणारे परदेशी पालकही मिळतात. आता तिचं नाव नोमिता फ्रेडरिकसेन! ती मोठेपणी भारतातही येते आणि पुढली कथा पुन्हा भारतात घडते.. पण नोमिता भारतीय राहिलेली असते का?
ही दोन्ही पुस्तकं ‘बुकमार्क’प्रेमी वाचतीलच; पण या निमित्तानं प्रश्न असा आहे की, भारतीय वंशाचे लेखक नेहमी भारतीय वंशाच्याच लोकांबद्दल का लिहितात? अगदी नायपॉल यांच्याही पहिल्या दोन कादंबऱ्या, त्रिनिदादमधल्या भारतीयांबद्दलच.. त्यांच्यापासून झुंपा लाहिरीपर्यंत सर्वच कथा भारतीयांच्याच! राणा दासगुप्ता यांची चार वर्षांपूर्वीची ‘सोलो’ ही पूर्व युरोपात घडणारी कादंबरी अनेकार्थानी निराळी, पण नायकाची नजर भारतीयच. अनुभवविश्वाचं अवसान आणता येत असेल, पण दृष्टिकोन मात्र अस्सल आणि आतलाच असावा लागतो, हेच पुन्हापुन्हा सिद्ध होतंय ते असं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2015 3:04 am

Web Title: indian writer sunjeev sahota on man booker prize 2015 longlis
टॅग : Editorial
Next Stories
1 सावधान, ‘पेराल तेच उगवेल’!
2 गंगुबाईंच्या ‘तींन सप्तकां’चा कान..
3 बुकबातमी : इतिहासाचा ‘पुनर्लेखनकार’!
Just Now!
X