१९५० ते १९७६ हा हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानला जातो. चित्रपटाच्या सर्व विभागांची भरभराट होत जाऊन अनेक उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलावंत या काळात उदयास आले आणि त्यांनी आपापल्या परीने हिंदी चित्रपटांचे सौंदर्य खुलविले, असे मानले जाते.  चित्रपट बोलू लागल्यानंतर संगीत आणि गाणी हा हिंदीच नव्हे तर सर्व भारतीय प्रादेशिक भाषांतील चित्रपटांचा अविभाज्य भाग बनला. याच काळात सिनेमाप्रेमींची संख्या प्रचंड वाढली. इसाक मुजावर यांचे सिनेमावेड हे याच काळातले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मराठी चित्रपटांचे निर्मितिस्थळ असलेल्या कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला.
 वयाच्या २० व्या वर्षी इसाक मुजावर ‘पुढारी’ वृत्तपत्रात रुजू झाले. सिनेमावेडे असल्यामुळेच तत्कालीन पद्धतीनुसार वृत्तपत्रांमध्ये चित्रपटविषयक मजकुराला फारसे महत्त्वाचे स्थान दिले जात नसतानाच्या काळात त्यांनी एका नटाच्या निधनाची बातमी पहिल्या पानावर छापली होती.  र. गो. सरदेसाई यांच्या ‘तारका’ या  साप्ताहिकातही ते लेखन करीत. त्यामुळे त्यांचा सिनेमाविषयक अभ्यास वाढत गेला. १९५८ च्या दरम्यान ते ‘रसरंग’ या  सिनेसाप्ताहिकात कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाले. मराठी तसेच हिंदी सिनेमांतील अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार यांच्याविषयी तसेच त्यांच्या चित्रपटांविषयी सखोल माहिती गोळा करून त्यांनी सातत्याने लेखन केले. मुख्यत्वे सिनेमाची ‘लोकप्रिय’ बाजू याबाबत माहिती मिळवून लेखन करणे आणि २४ तास फक्त सिनेमाविषयक लिहिणे-बोलणे याचा ध्यासच मुजावर यांना होता. मात्र त्यांनी कधीही दिग्दर्शकांबद्दल फारसे लेखन केले नाही. १९७८ च्या दरम्यान मुजावर मुंबईत आले आणि गोगटे नामक व्यक्तीच्या सहकार्याने त्यांनी ‘चित्रानंद’ हे सिनेसाप्ताहिक सुरू केले. १९८४ च्या सुमारास टीव्हीचे आगमन झाल्यानंतर रुपेरी पडद्यावरचे स्टार कलावंत, संगीतकार प्रेक्षकांच्या स्वयंपाकघरात पोहोचले. त्यामुळे ओघानेच सिनेसाप्ताहिकांची रया गेली. आपल्याकडील सखोल व मुखोद्गत माहितीच्या जोरावर मुजावर रेडिओकडे वळले, तसेच पुस्तक लेखनाकडे ते वळले. कलावंतांविषयीचे खूप किस्से लिहिताना सवंग लिहिण्यात ते रमले नाहीत. ‘रफीनामा’, ‘चित्रमाऊली’, ‘सिनेमाचे तीन साक्षीदार’, ‘गुरुदत्त एक अशांत कलावंत’ अशी असंख्य पुस्तके लिहून मुजावर यांनी मराठी वाचकांची  जुन्या सिनेमांच्या स्मरणरंजनात रमण्याची हौस भागवली. त्यांच्या विपुल लेखनाचे संदर्भमूल्य पुढील काळातील मराठी-हिंदी सिनेमाच्या अभ्यासकांना अधिकच महत्त्वाचे ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isak mujawar
First published on: 28-02-2015 at 01:06 IST