News Flash

आकसाची शंका यावी, अशी टीका

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरचे ओढलेले ताशेरे (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचून, नेमाडे यांच्याबद्दल आदर राखूनही भीती व्यक्त करावीशी वाटते

| April 7, 2015 01:01 am

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरचे ओढलेले ताशेरे (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचून, नेमाडे यांच्याबद्दल आदर राखूनही भीती व्यक्त करावीशी वाटते की, सतत टीका करत राहिल्याने ते स्वत:च टीकेचे धनी होऊ लागतील.
घुमानला नेमाडे स्वत: गेले नाहीत तरी त्यांच्या ‘कोसला’चे अभिवाचन करण्याचे ठरले होते, पण कदाचित वेळेचे व्यवस्थापन कोलमडल्याने ते होऊ शकले नसावे. म्हणजे यांनी कितीही आगपाखड केली तरी त्यांचे आदराचं स्थान इतर साहित्यिकांनी कमी केलेले नाही. नेमाडे यांचा आकस नेमका कशाविषयी आहे, हा प्रश्न पडण्याइतके टोकाचं टीकायन ताणू नये असे वाटते. उलट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सहभागी साहित्यिकांनी प्रयत्न करण्याच्या केलेल्या निश्चयामध्ये काही योगदान देता येईल का ते पाहावे. नाही तर नेमाडे यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यावर मार्मिक टिप्पणी करणारी त्यांची पुस्तके आणि मराठी शाळांबद्दलचा आग्रह याबद्दल त्यांचा वाटणारा आदर आणि अभिमान यांना धक्का लागेल की काय अशी भीती वाटते.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

‘विवेकवेल धर्माच्या आधाराने वाढणार नाही
‘सदानंदांचा येळकोट’ हा परखड अग्रलेख (४ एप्रिल) आवडला. ‘आपल्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करून त्याचा आधुनिकतेशी मेळ घालत आधुनिक होणे हा विचार म्हणून छानच आहे, पण व्यवहारात त्याचा अर्थ सनातनत्वाकडे झुकत असतो. हे रोजचे वास्तव आहे’ ही त्यातील टिप्पणी योग्यच आहे. ‘ज्ञान आणि उत्सव यांनी एकत्र नांदणे ही आमची एक सांस्कृतिक सिद्धी आहे,’ असे मोरे म्हणत असले तरी उत्सवी वातावरणात ज्ञानापासून मुक्तताच करून घेतली जाते. विशेषत: आता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ‘येळकोट’ किंवा डोळे मिटून केलेल्या जयजयकाराचा गदारोळ किंवा आरडाओरडा अधिक कर्णकर्कश झाला आहे.
‘‘मराठी भाषेच्या या भूमीत ‘विवेकवेली’ची लावणी होऊ द्या’’ ही इच्छा निश्चितच स्वागतार्ह आहे; परंतु ‘विज्ञान आणि धर्म या दोहोंवरही विवेकाचे नियंत्रण पाहिजे’ याबाबत नमूद व्हावे की एक तर ‘विज्ञान’ हा शब्द ‘निसर्ग विज्ञान’ अशा संकुचित अर्थाने वापरला जातो आणि ‘सामाजिक विज्ञानां’च्या व्यापक विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. निसर्ग आणि सामाजिक विज्ञानांचा वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक मनोवृत्तीने अभ्यास केला की विवेकवाद अपरिहार्य होतो. दुसरे म्हणजे धर्म हा अपरिवर्तनीय स्वरूपातच येतो. ‘वारशाचे (जुजबी) पुनर्मूल्यांकन करून त्याचा आधुनिकतेशी मेळ’ घालण्याची ओढाताण समाजाला सनातनत्वाकडे खेचते. अशी धडपड वैचारिक अप्रामाणिकपणा असते, तो विवेक नव्हे. धर्माची परखड चिकित्सा केली तर धर्माची निर्थकताच स्पष्ट होते.
‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लाऊ जगी॥’  यात सरळच परस्परविरोध आहे. विकारांचा त्याग करण्याचे आणि विचारांना अंगीकारण्याचे महत्त्व सांगितले जाते. बेभान होऊन नाचताना विचार, विवेक आणि ज्ञानसंवर्धन यांना काहीच स्थान उरत नाही. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥ श्री ज्ञानदेव नामदेव तुकाराम॥ – हा काही एका धर्मसंप्रदायाचा घोष नव्हता’ असे मोरे यांचे प्रतिपादन आहे. ते  म्हणतात- ‘ज्या दैवताला केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहिलेल्या व्यापक आणि समावेशक अभिजात परंपरेचा हा घोष आहे’. विवेकाला बाजूला ठेवून ‘दैवता’चे पूजन होते ती कृती धर्मातीत असूच शकत नाही. शरण जाण्याची भक्तिमार्गाची वृत्ती आणि विवेक हे परस्परविरोधी आणि एकमेकास वज्र्य करणारे आहेत.
‘काही शक्ती धर्माचे हत्यार घेऊन पुढे सरसावल्या आहेत’, विचारच काय, पण व्यक्तींनासुद्धा िहसेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भक्तीचे विषारी तण मुळासकट नाहीसे केल्याशिवाय ‘विवेकवेल’ रुजणारच नाही, हे समजून घेतले पाहिजे. आव्हाने मोठी आहेत, परंतु नेमके कोणत्या दिशेने जाणे आवश्यक आहे याची स्पष्ट जाणीव असणे महत्त्वाचे आहे.
‘साहित्यरूपी सोन्याची खाण उघडत असताना विवेकरूपी वेलीचा विस्तार करायला विसरू नका’ या विचाराचे आणि विवेकाचे तरीही स्वागतच. ‘याचे नेमके काय आणि कसे करायचे हे मोरेसरांनी सांगितले असते, तर प्रतिपादनातील वैचारिक येळकोट टळला असता’ या ‘लोकसत्ता’ने व्यक्त केलेल्या विचारांवर कार्यवाही झाली तर विवेकरूपी वेलीचा विस्तार जोमाने होऊ शकेल.
राजीव जोशी, नेरळ

रोख  कशावर?
साहित्य संमेलनाच्या आयोजनावर  ज्ञानपीठ विजेते नेमाडे यांनी केलेली बोचरी टीका अप्रस्तुत होती यात तिळमात्र शंका नाही. साहित्य संमेलनवाल्यांना ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा जिलबीचा रंग कसा असावा याचे महत्त्व वाटते (लोकसत्ता, ६ एप्रिल) अशा  शब्दांतील या टीकेचे नेमके लक्ष्य कोणते? नेमाडे यांना टीका नेमकी कशावर करायची होती हेच कळले नाही.
परमानंद कोडकणी, माहीम (मुंबई )

मुद्दे विस्कळीत
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर सडकून टीका करत विचारस्वातंत्र्याचा आनंद घेतला असला तरी टीकेतील मुद्दे विस्कळीत होते. नेमाडे यांनी ती टीका छोटय़ा पुरस्कार समारंभात न करता संमेलनात सहभागी होऊन केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते.
– श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई)
अनिल रेगे, अंधेरी  (मुंबई) यांनीही नेमाडे यांच्या टीकेशी असहमत पत्र पाठविले.

त्यापेक्षा ऐक्याकडे लक्ष द्या
आंबेडकर जयंतीचे निमित्त साधून रामदास आठवले यांनी प्रादेशिक तसेच केंद्रातील नेत्याकडे आपल्या सत्तासहभागाची (मंत्रिपदाची) मागणी पुन्हा पुढे आणली आहे. इंदू मिलचा प्रश्न लोकांसमोर ठेवून रामदास आठवले राज्य व केंद्रात आपला धाक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु भारतीय जनता पक्षासमोर अशी शरणागती पत्करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याला बळकटी देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारायला हवे. मोठय़ा पक्षाकडून डावलले जाण्याची ही रिपब्लिकन पक्षाची पहिलीच वेळ नाही. जी वागणूक भारतीय जनता पक्ष आता देत आहे, तशीच वागणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेही दिली होती. मोठय़ा पक्षाकडून वारंवार दुर्लक्ष होऊनसुद्धा आठवलेंसारखा नेता काही धडा घेत नाही.
-विनीत देविदास ठमके, नवी दिल्ली.

भरपाईसाठी प्रयत्न हवे
पनवेलनजीक तळोजा येथे भटका कुत्रा चावल्यामुळे प्रतीक्षा सारू या मुलीच्या झालेल्या मृत्यूची, मन सुन्न करणारी बातमी (लोकसत्ता, ३१ मार्च) आता विसरली जाणे योग्य नव्हे. संबंधित मुलीच्या परिवाराला मदत करण्यासाठी वकील संघटनेने पुढाकार घेऊन, प्राणिमित्र संघटनेच्या सदस्यांवर व नगरपालिकेवर खटला दाखल करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करावी, ही विनंती. सज्जड भरपाई द्यावी लागल्यास भविष्यात प्राणिमित्र संघटना अनाठायी भूतदया सोडून देतील.
संजय बरबडे, यवतमाळ

भटक्या कुत्र्यांचा पुळका नकोच
गेले अनेक महिने देशाच्या अनेक भागांतून ‘भटक्या कुत्र्यांनी चावे’ घेतल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. काही वेळा तर लहान मुले या चाव्यांनी दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एवढे सगळे होत असूनसुद्धा त्या भटक्या कुत्र्यांची हत्या का करायची नाही व त्यांच्यावर का प्रेम करायचे हे अनाकलनीय आहे. तसे बघितले तर या भटक्या कुत्र्यांचा समाजाला काडीमात्र उपयोग नाही उलटपक्षी त्रासच आहे आणि तरीही त्यांच्यावर दया दाखवायची? ज्या लोकांना या कुत्र्यांचा पुळका आहे त्या लोकांनी ही कुत्री आपापल्या घरात ठेवावी व करावे त्यांच्यावर मनमुराद प्रेम, आम्हा सामान्य नागरिकांना हा त्रास का?
 – डॉ. मयूरेश जोशी, पनवेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2015 1:01 am

Web Title: letters to editor 31
Next Stories
1 अनधिकृतांचा भविष्यकाळ उज्ज्वल!
2 माझ्या काळात अशी वेळ आली नव्हती!
3 केजरीवाल यांनी ‘मुख्य प्रवाहा’प्रमाणे यशस्वी होण्यापेक्षा निराळा पक्ष काढावा!
Just Now!
X