भारतीय इंग्रजी साहित्याच्या पहिल्या शिलेदारांपैकी एक असलेल्या कथा-कादंबरीकार राजा राव (१९०८-२००६) यांचं नाव आजच्या पिढीतल्या कितीजणांना ठाऊक असेल माहीत नाही. चेतन भगत, अमिष त्रिपाठी यासारख्या ‘भारतीय इंग्रजी लेखनजगतातल्या सलमान खान, अक्षयकुमार’छाप कादंबरीकारांच्या भाऊगर्दीत राजा राव फारसे माहीत नसण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कर्नाटकातल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या, सात बहिणी आणि दोन भाऊ यांच्यात सर्वात मोठय़ा असलेल्या या कथा-कादंबरीकाराने मुल्कराज आनंद, आर. के. लक्ष्मण यांच्यासह भारतीय इंग्रजी लेखनाची पायाभरणी केली. इतकंच नव्हे तर या लेखनाला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं. भारतीय परंपरा आणि संस्कृती यांची थोरवी राव यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. ब्राह्मण्य, जातीयता, अस्पृश्यता, म. गांधी आणि स्वातंत्र्यलढा याविषयी राव यांनी प्रामुख्यानं लेखन केलं. त्यांची ‘कंठपुरा’ ही पहिली कादंबरी १९३८ साली प्रकाशित झाली. म. गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनाची चर्चा करणारी ही कादंबरी दक्षिण भारतात घडत असली तरी ती भारतीय लोककथा-दंतकथा यांचाही चांगल्या प्रकारे आढावा घेते.  यानंतर १९६० साली त्यांची ‘द सर्पेट अँड द रोप’ ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. यात त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीवर भाष्य केलं आहे. भारतीय नायक पाश्चात्य तरुणीशी लग्न करतो, तेव्हा त्याला कोणकोणत्या सांस्कृतिक आणि मानसिक आव्हानांना सामोरं जावं लागतं, याची अतिशय सुंदर मांडणी या कादंबरीत आहे. ही कादंबरी काही प्रमाणात आत्मचरित्रात्मक असल्याने- म्हणजे राव यांचा व्यक्तिगत अनुभवही तसाच असल्याने- ती चांगली पकड घेते. त्यानंतर पाच वर्षांनी प्रकाशित झालेल्या ‘द कॅट अँड शेक्सपिअर- अ टेल ऑफ इंडिया’ (१९६५) या कादंबरीत तत्त्वज्ञानात्मक प्रश्नांची विनोदाच्या अंगाने मांडणी केली आहे. तत्त्वज्ञानी क्लर्क आणि त्याचा प्रतिगामी मित्र यांना मध्यवर्ती ठेवून लिहिलेली ही कादंबरीही आधीच्या दोन्हींप्रमाणेच भारतीय आणि जागतिक पातळीवर वाखाणली गेली. याशिवाय अजून दोन कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, पाच लेखसंग्रह इतकी साहित्यसंपदा राव यांच्या नावावर आहे. sam06वरील तिन्ही कादंबऱ्या आणि निवडक कथांचा एक संग्रह नुकताच पेंग्विनने पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.  राव यांच्या साहित्याची ही पुनर्भेट नेमकी दिवाळीच्या माहोलात होत असल्याने तिची गोडी अधिक खमंग व्हायला हरकत नाही. चांगल्या साहित्याचं पुनर्वाचन हे पुन्हा पुन्हा मोहात पाडणारं, आनंदाचा पुनप्र्रत्यय देणारं आणि आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारं असतं. त्यात राव यांच्या नजरेतून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्याकडे पाहणं या इतकं मनोज्ञ दुसरं काहीच असू शकत नाही. इंग्रजी लेखनजगतातल्या सलमान खान, अक्षय कुमार यांच्यापेक्षा राव यांचं लेखन कितीतरी सरस आहे. किंबहुना ही नावं एकत्र घेऊच नयेत, इतकी थोरवी राव यांच्या साहित्याची आहे.