‘तूं मन हें मीचि करीं,’ हे साधणं सोपं नाही. कारण सद्गुरूंची आवड आणि आपल्या मनाची आवड, त्यांची इच्छा आणि आपली इच्छा, त्यांचं जीवनध्येय आणि आपलं जीवनध्येय यात मोठी तफावत आहे. आपण साधनपथावर आहोत, म्हणून आपलंही जीवनध्येय आत्मकल्याण, आत्मसाक्षात्कारच आहे, असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात मनाची खोलवर तपासणी केली तर भौतिकाच्या सुरक्षिततेलाच आपला अग्रक्रम असतो. भौतिकाची पर्वा न करता किंवा भौतिकाच्या बदल्यात आपल्याला आत्मकल्याण नको असतं! आता याचा अर्थ भौतिक जीवन सुखाचं असूच नये किंवा भौतिक सुखासाठी आवश्यक ते प्रयत्न करूच नये, असा नाही. तर भौतिक परिस्थितीची मर्यादा आपण कधीच विसरू नये, हा आहे. आपल्या मनाचं समाधान, मनाची निश्चिंती ही भौतिकातील अनुकूलतेवर अवलंबून राहू नये. हा अभ्यास साधकासाठी अनिवार्यच आहे. तेव्हा आपलं जीवनध्येय भौतिक सुरक्षित राखून साधना करणं हे आहे. सद्गुरूंचा हेतू शिष्याचं आत्मकल्याण हाच आहे. त्याच्या आड भौतिक येत असेल तर त्याचीही आवश्यक तेवढी काटछाट करायला ते मागेपुढे पाहात नाहीत. त्या भौतिकात मी गुंतत नसेन, अडकत नसेन त्या भौतिकाचा प्रभाव माझ्या मनावर नसेल तर मग भौतिकात कितीही का प्रगती होईना, त्यांना त्याचा धोका वाटत नाही! तेव्हा त्यांची इच्छा आणि माझी इच्छा, त्यांचा हेतू आणि माझा हेतू, त्यांचा विचार आणि माझा विचार जितका एक होत जाईल तितकी एकरसता येईल. मग ‘तूं मन हें मीचि करीं’ ही सहजस्थिती होत जाईल. मग त्यांची जी धारणा आहे, तीच माझीही होईल. त्यांची धारणा काय आहे? तर हे समस्त जग भगवंताचं आहे, भगवंतकेंद्रित जीवन हीच उपासना आहे, या सोऽहं भावातच जगणं गुंफलं पाहिजे. हीच त्यांची धारणा आहे, हेच त्यांचं सततच भजन आहे! जेव्हा हे साधेल तेव्हा त्यांच्या भजनात खरं प्रेम निर्माण होईल. मग ‘माझिया भजनीं प्रेम धरीं’ हीसुद्धा सहजस्थिती होईल. मग चराचरातला आकारभेद नष्ट होईल. जेव्हा सर्वत्र केवळ सद्गुरूचीच सत्ता आहे, हा भाव येईल तेव्हा खरा नमस्कार साधेल! ‘सर्वत्र नमस्कारीं। मज एकातें’  ही मनाची सहजस्थिती होईल. मग काय होऊ लागेल? आधी जगात वावरताना ‘मी’केंद्रित जगताना त्या ‘मी’ला अनुकूल असे संकल्प उत्पन्न होत होते. हे हवं, ते हवं, अशी हाव सदोदित असे. आता जगणं सद्गुरूकेंद्रित होऊ लागल्याने मनातल्या संकल्पांचा जोर ओसरू लागेल. मनात इच्छा उमटताच, ही गोष्ट सद्गुरूंना आवडेल का, हा विचार प्रथम मनात येऊ लागेल.  मग सद्गुरूंना आवडणार नाही, अशी इच्छा मनात उत्पन्न झालीच तरी ती जणू लगेच मुळापासून जाळून टाकली जाईल! याच स्थितीचं वर्णन ‘माझेनि अनुसंधानें देख। संकल्पु जाळणें नि:शेख। मद्याजी चोख। याचि नांव।।’ या ओवीत आहे. ही इच्छा कशी जाळली जाईल? तर ती ज्ञानाग्नीनं जाळली जाईल. तो ज्ञानाग्नी कसा उत्पन्न होईल? तर केवळ सद्गुरूंच्या अनुसंधानानेच उत्पन्न होईल. असं अनुसंधान हेच खरं मुख्य भजन!