News Flash

शिक्षक दिनाचा संवाद म्हणून नको वाटतो ..

लोकांची स्मरणशक्ती अल्पकाळ असते, परंतु शिक्षणक्षेत्रातील या आठवणी विसरणे अशक्य. २००२ मध्ये हजारो दंगलग्रस्त माणुसकीला काळिमा आणणाऱ्या स्थितीतील छावण्यांत अजून अडकलेले असताना, दंगलीचे वातावरण निवळलेले

| September 4, 2014 02:01 am

लोकांची स्मरणशक्ती अल्पकाळ असते, परंतु शिक्षणक्षेत्रातील या आठवणी विसरणे अशक्य. २००२ मध्ये हजारो दंगलग्रस्त माणुसकीला काळिमा आणणाऱ्या स्थितीतील छावण्यांत अजून अडकलेले असताना, दंगलीचे वातावरण निवळलेले नसताना सर्व काही ‘आलबेल’ आहे अशी हवा निर्माण करण्यासाठी बोर्डाच्या परीक्षा पुढे न ढकलता चालू केल्या.  उच्च माध्यमिक बोर्डाच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता ‘खालील वाक्य पुन्हा लिहा.’ वाक्य होते, If you dont like people, kill them. त्याच प्रश्नपत्रिकेत पुढे अनेक वाक्यांचे एक वाक्य बनवा असा प्रश्न होता. ती वाक्ये होती नाझींच्या ज्यू लोकांविषयीच्या फायनल सोल्युशनसंबंधी. तणावाखाली असलेले परीक्षा केंद्रातील विद्यार्थी आणि भयभीत पालक बघून मोदी सरकारातील शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी, ‘यात काय बाऊ करण्यासारखे? या प्रश्नपत्रिका तर गेल्या ऑगस्टच्या आहेत. आताच्या धार्मिक कत्तलींशी त्यांचा काय संबंध?’ अशी सारवासारव केली.    
आनंदीबेन यांना आता मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मोदी सरांची प्रस्तावना असलेल्या दीनानाथ बात्रा यांची पुराणकथांची पुस्तके अवांतर वाचनासाठी बोर्डाने प्रमाणित केली आहेत. िहदू धर्मसंसदेने शिर्डीच्या साईबाबांना पदभ्रष्ट केले आहे . ‘िहदूंनो आता दोन बायका करा’ असे स्त्रियांना अपमानित करणारे फतवे ऐकू येत आहेत. लाल किल्ल्यावरून घोषित केलेल्या १० वर्षांच्या बंदीला न जुमानता उत्तर प्रदेश व अन्यत्र जातीय दंगली चालू आहेत. वाल्याचा ‘वाल्मीकी’ झाल्याची खात्री कुणी द्यावी? वाटमारीची भीती आहेच. शिक्षक दिनाचा संवाद म्हणून नको वाटतो. शिक्षण क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्याचा शोध आणि मानवता यांचेच वर्चस्व असावे. तेथे राजकारण नको.

मुर्दाड समाजात अजूनही थोडी धुगधुगी शिल्लक
नथुराम व गीता घाडगे या दाम्पत्याच्या धैर्याची बातमी ( ३ सप्टें.) वाचून खरोखरच त्यांनी संपूर्ण समाजालाच आदर्श घालून दिला आहे याची खात्री पटते. आजकाल रुग्णाचा अगदी नसíगक मृत्यू झाला तरी नातेवाईक व इतर फूस लावणारी माणसे रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण करणे, कारवाई न झाल्यास मृताचा देह न हलविणे यांसारखे प्रकार करून संपूर्ण रुग्णालयालाच वेठीस धरतात. मृत व्यक्ती त्या भागातील कुप्रसिद्ध गुंड असली तर मग विचारायलाच नको. अशाच गुंडगिरीमुळे काही वर्षांपूर्वी ठाण्यातील एक मोठे रुग्णालय बंद करावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर घाडगे दाम्पत्याचा असा धाडसी निर्णय म्हणजे आपल्या मुर्दाड समाजात अजून तरी थोडी धुगधुगी शिल्लक असल्याचा विश्वास देणारी वाटते.
– शरद फडणवीस, पुणे

‘अ‍ॅबे’ नव्हे, आबे
‘विवेकाला सायोनारा’  हा अग्रलेख (३ सप्टें.) वाचला. त्यात एका गोष्टीचा उल्लेख व्हायला हवा होता. मोदी जपानमध्ये जिथे जिथे गेले- तेथे िहदीतूनच बोलले. एक भारतीय म्हणून प्रत्येकास अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे. अजून एक मुद्दा. जपानी पंतप्रधानांचे नाव ‘अ‍ॅबे’ नसून आबे असे आहे. कारण जपानी भाषेत ‘आ इ उ ए ओ’ असे फक्त पाच स्वर आहेत.
– हर्षद फडके, जपानी भाषांतरकार, पुणे

बुद्धी आणि ज्ञान
‘श्रीगणेशाला पूजत नाहीत नाहीत त्यांना बुद्धी येते कुठून?’ (लोकमानस, ३ सप्टेंबर) हा पत्रलेखिकेला पडलेला प्रश्न जे गणेशाला पूजतात अशांचीही मती कुंठित करणारा आहे! यावर विचार करता असे वाटते की, सामान्य अर्थाने बुद्धी म्हणजे चांगले आणि वाईट याचे आकलन होण्याची शक्ती. जी सर्वानाच आणि जन्मजात असते. त्यामुळे बुद्धी आणि ज्ञानप्राप्ती यांतील सूक्ष्म फरक लक्षात घ्यावा लागेल. तर्कनिष्ठ विचारशक्तीच्या, संशोधन, तंत्रज्ञानविकास याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानप्राप्ती होणे हा बुद्धी शब्दाचा अर्थ अभिप्रेत असावा. याबाबत कठोपनिषदातील एका रूपकात बुद्धीची तुलना घोडागाडीच्या वाहकाशी केली आहे. त्यात लगाम म्हणजे मन, घोडा म्हणजे पंचेंद्रिये आणि गाडी म्हणजे शरीर असे म्हटले आहे. या तिघांवर नियंत्रण ठेवणारा वाहक म्हणजे बुद्धी. बुद्धी हा शब्द व्यापक आणि सखोल अर्थाने घ्यावा असे वाटते.त्यासाठी गणेशपूजन आवश्यक नाही. पण पूजक ज्ञानप्राप्तीसाठी प्रार्थना करतो. – चिदानंद पाठक, पुणे
कृतज्ञता म्हणूनही हात जोडले जातात
वसुधा गोखले यांचे पत्र (लोकमानस, २ सप्टें.) वाचले. देव ही एक कल्याणकारी संकल्पना आहे हे लक्षात घेतले तर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील. गणेश आपल्या भक्तांना बुद्धी देतो म्हणजे त्यांना ती नसते आणि मागितली, पूजा केली तरच देतो असे थोडेच आहे! असलेली बुद्धी विधायक कामासाठी वापरली जावी, तशी शक्ती मिळावी यासाठी गणेश पुजायचा.  एका मुस्लीम बांधवाने गणपतीची पूजा केल्याची बातमी एका वाहिनीवर पाहिली. आणि काही मागण्यासाठी फक्त देव पुजायचा असेही नाही. न मागता जे मिळालेय त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हात जोडले जातातच.
– राधा मराठे

केवळ देखाव्यांपुरतेच!
वसुधा गोखले यांच्या पत्रातील आशयाला सहमती दर्शविताना गणपती उत्सवाच्या काळात निदर्शनाला येते. ती म्हणजे मंडळातर्फे लोकजागृतीच्या नावाखाली उभारण्यात येणारे देखावे आणि वस्तुस्थिती. एका मंडळातर्फे पाणी वाचवा या विषयावर देखावा उभा करण्यात आला होता. आणि त्याच इमारतीची टाकी गेला महिनाभर ओतप्रोत भरून पाणी रोज वाया जात होते. एके ठिकाणी गणपती भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे निर्दालन करीत आहे असा देखावा उभा केला होता आणि त्या मंडळातील पदाधिकाऱ्यावर जमविलेल्या पशाचा अपहार केल्याचे आरोप होत होते.
– मोहन गद्रे, कांदिवली

कॉँग्रेसची टीका अनाठायी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनी भारतातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी सर्व शाळांना त्यांचे भाषण दाखवण्याची सूचना केली असून, ती स्वागतार्ह आहे. आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने असा संवाद साधलेला नाही. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य आहेत. एकाच वेळी कोटय़वधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी उपलब्ध तंत्राचा वापर करणे यात गर ते काय? जनतेपासून फारकत घेतलेल्या कॉंग्रेस पक्षाने यावर चालवलेली टीका अनाठायी आहे. स्वत: काही करायचे नाही व दुसऱ्याला काही करू द्यायचे नाही ही कॉँंग्रेसची जुनीच संस्कृती.  मोदी या शालेय विद्यार्थ्यांसमोर राजकीय भाषण नक्कीच करणार नाहीत. ‘अच्छे दिन’ आणायचे असतील तर  भावी पिढीसोबत संवाद हा साधावाच लागेल.
– डॉ. राहुल मेहेत्रे, संगमन्ॐ२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:01 am

Web Title: modis teachers day speech
Next Stories
1 साधेपणाने काम, हीच चूक?
2 भोंदूंची राजरोस भक्ती; साईबाबांवर मात्र बंदी!
3 गदारोळ माजविण्याचे प्रयोजन काय?