तब्बल नऊ वर्षे ज्या कारणामुळे नारायण राणे अस्वस्थ होते, तीच अस्वस्थता पुन्हा सोबत घेऊन त्यांनी आपल्या बंडाचा झेंडा सपशेल गुंडाळून ठेवला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना, पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते आणि तब्बल नऊ वर्षे या पदापासून दूर, झुलवतच ठेवले ही राणे यांच्या काँग्रेसी कारकिर्दीची व्यथा आहे. नऊ वर्षे ही ठुसठुसती वेदना शिरावर घेऊन राणे यांनी काँग्रेस आघाडीच्या सरकारात मंत्रिपद भोगले. आपण कोणत्याच पदाच्या मागे धावत नाही, पदे आपल्यामागे धावत येतात, अशी धारणा जाहीरपणे मांडणाऱ्या राणे यांना या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाने मात्र चकवा दिला. ते पद त्यांच्या मागे तर आले नाहीच, पण त्यांच्यापासून दूर दूरच गेले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाल्यानंतर पक्षातील प्रत्येक जण त्या पराभवाचे विश्लेषण करू लागला. त्या निवडणुकीत राणे यांना बसलेला धक्का तर अन्य नेत्यांच्या तुलनेत मोठाच होता. आधीच पक्षाची दाणादाण झालेली असताना, पुत्राला घरी बसणे भाग पाडून कर्मभूमीनेच धक्का दिला तर कोणताही नेता आपल्या राजकीय भविष्याचा आणि अस्तित्वाचा फेरविचार करणार, हे साहजिकच आहे. राणे यांनाही कदाचित त्याच विचाराने छळले असेल. पक्षाचे धूसर भविष्य आणि संपुष्टात आलेली कर्मभूमीतील सद्दी अशा दुहेरी कात्रीत सापडलेला कोणताही राजकीय नेता भविष्याच्या चिंतेने उद्विग्न होणे साहजिकच असते. मुळात, काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हा राणे यांना या पक्षाच्या संस्कृतीची पुरती ओळखदेखील नव्हती. पक्षश्रेष्ठींच्या एखाद्या आश्वासनावर किती गांभीर्याने विश्वास ठेवायचा, हे या संस्कृतीत मुरलेल्या प्रत्येकाला नेमके माहीत असते. राणे यांना तसे माहीत असणे असंभवच होते. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न कुरवाळत वर्षांनुवर्षे एखाद्या पक्षासोबत राहण्यासाठी लागणाऱ्या संयमालाही काही कालमर्यादा असते. राणे यांनी तर तो कालावधीही पार केला, आपली घुसमट वेगवेगळ्या पद्धतीने, प्रसंगी ‘राणे स्टाइल’ने पक्षश्रेष्ठींसमोर उघडही केली. राजकारणात आणि रोजच्या व्यवहारातही, एक नियम सहजपणे पाळला जातो. माणसाला समज येण्याच्या वयातच, उकळत्या पदार्थावर फुंकर मारली नाही, तर खाताना जीभ पोळते. अनुभवातून मिळणाऱ्या शहाणपणामुळे हा नियम पुढे आयुष्यभर पाळलाही जातो. काँग्रेसी राजकारणात मुरलेले सारे जण याच नियमाचे जणू गुलाम असतात. म्हणूनच, राणे यांच्या उकळत्या रागाची त्याच वेळी दखलही घेतली गेली नाही. त्यांचा राग शमविण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याचा संयम पक्षनेतृत्वाकडे होता, हेही कालांतराने स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या उद्विग्नतेतून सुरू झालेल्या राजीनामानाटय़ाची अखेर करताना राणे यांना शेवटी आपली दबावाची सारी अस्त्रे आणि शस्त्रे निमूटपणे म्यान करावी लागली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे धनी होण्याची आपली इच्छा नाही, असे जाहीरपणे सांगत आपल्या बंडाचा झेंडा फडकावणाऱ्या राणे यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झंझावाती दौरे करण्याची घोषणा करीतच हा झेंडा गुंडाळून ठेवला आणि काँग्रेसच्या राजकारणापुढे नमते घेतले. राणे यांच्या बंडनाटय़ाचे आणखीही काही अर्थ लावले जातात. भाजपचे काही नेते त्यांच्यासाठी पक्षाची दारे किलकिली करून बसले होते, असेही म्हणतात. पण वारे अनुकूल नसल्याने ती दारे बंद झाली अशीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या काळात आत्मचिंतन करून राणे यांनी आपल्या भवितव्याबद्दल गांभीर्याने विचार केला असेल, अशी प्रतिक्रिया राणे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या सर्वाना त्याच्या अर्थाचा नेमका संदेश पोहोचला असेलच..