News Flash

एक लाट तोडी त्यांना..

युती तोडल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा एकत्र राहिल्याने मिळणारा लाभ हा अधिक होता हे कळत होते म्हणून प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबा एकत्र राहिले

| September 27, 2014 04:27 am

युती तोडल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा एकत्र राहिल्याने मिळणारा लाभ हा अधिक होता हे कळत होते म्हणून प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबा एकत्र राहिले, हे उघडच आहे. एकत्र कुटुंबातील एखाद्या भावाच्या प्रगतीचा वेग अधिक असल्यास काही कालानंतर त्यास कुटुंबापासून वेगळे व्हावेसे वाटत असेल तर ते जसे समजून घेणे गरजेचे असते तसेच राजकीय पक्षांबाबतही घडत असेल तर त्यात गैर ते काय?  
गोडीगुलाबीने वेगळे होणे हे आपल्या संस्कृतीतच नाही. मग हे वेगळे होणे नोकरीतील असो, कुटुंबातील असो किंवा राजकीय. वेगळे व्हायचे ते मी तुझे पुन्हा तोंडही पाहणार नाही या नंतर मोडावयाच्या भीष्मप्रतिमेसह. वेगळे होणे म्हणजे शत्रुत्व पत्करणे असाच वेडगळ समज आपल्या समाजात अजूनही आहे. परंतु वेगळे होणेदेखील आनंददायी असू शकते या प्रौढ जाणिवेपासून आपण कैक योजने दूर असून याचेच प्रतिबिंब राजकारणातही पडलेले दिसते. शिवसेना आणि भाजपचा देवाधर्माच्या आधारे चाललेला २५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सोयीची सोयरीक तुटल्यानंतर याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्र घेत आहे. राज्यातील सांस्कृतिक समजूतदारपणा किती खालच्या यत्तेत आहे, हेच यातून दिसून येते. भाजप-सेना काय किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काय. या चारही पक्षांनी एकमेकांपासून फारकत घेण्यात काहीही गैर नाही. किंबहुना तसा तो घेणे ही त्यांच्या त्यांच्या काळाची गरज होती आणि नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे नसते. तसे केले तर मन मारून जगावे लागते. मग ती व्यक्ती असो वा अनेक व्यक्तींचा बनलेला राजकीय पक्ष. असे मन मारून जगणे हे स्वत:वर अन्याय करणारे असते. असा अन्याय या पक्षांकडून यापुढे होणार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेना यांची युती ही अधिक जुनी. आणि म्हणूनच घटस्फोटासाठी अधिक लायक. हे दोन पक्ष एकत्र आले ते त्या वेळी त्यांची गरज होती म्हणून. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकटय़ा पडलेल्या भाजपला कोणी मिळाला तर साथीदार हवा होता आणि लटके मराठी मराठी करून अडकलेली शिवसेना वाढीसाठी दुसरा काही मुद्दा शोधत होती. तेव्हा गरजू जीव जसे एकमेकांकडे आकृष्ट होतात तसेच हे राजकीय पक्ष नैसर्गिक ओढीने एकमेकांकडे आकर्षित झाले. परस्परांच्या गरजा भागवणे ही किमान गरज या संबंधातून भागवली जाईल अशी खात्री झाल्यानंतर देवाधर्माच्या साक्षीने या दोन्ही पक्षांनी जाहीर केले, आमची युती झाली. तेव्हा मुदलातील मुद्दा हा की ही युती एकमेकांची तात्कालिक गरज आणि भूक भागवणे याच उद्देशाने झालेली होती. तीस तत्त्वाचा आधार होता वगैरे भाषा करणे हा शुद्ध भंपकपणा. तो आपल्याकडील संस्कारांत चपखल बसतो. ज्या वेळी ही युती झाली त्यावेळी हे दोनही पक्ष वयाने आणि आकाराने लहान होते. कोणत्याही जैविक घटकाप्रमाणे काळाच्या ओघात त्यांचा आकार वाढणे नैसर्गिकच. तसा तो वाढल्यावरही त्यांना ते लहानपणी ज्यात मावत होते त्यातच त्यांनी राहावे असे मानणे अशास्त्रीय आहे. परंतु आपल्याकडची गंमत ही की हे असेच अशास्त्रीय असायला हवे असे खुद्द त्या पक्षांतील काहींना आणि जनतेतीलही अनेकांना वाटते. हे समाजात शास्त्रीय विचार न रुजल्याचेच लक्षण. तसा तो नसल्यास व्यक्ती वा व्यक्तींचा समूह असलेले राजकीय पक्ष विचार भावनेच्या आधारे करतात. त्याचमुळे प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबांची आठवण काढली जाते आणि फुकाचे भावनिक कढ काढले जातात. हे प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबा हयात असतानाही भाजप-सेना संबंधात अनेकदा तणाव निर्माण झाले होते. त्यावेळी ते मिटले याचे कारण काही त्यांना एकमेकांविषयी ममत्व वा प्रेम होते म्हणून नाही. तर युती तोडल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा एकत्र राहिल्याने मिळणारा लाभ हा अधिक होता हे कळत होते म्हणून हे काका आणि आजोबा एकत्र राहिले. परंतु राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदीमामांच्या उदयानंतर आणि मुख्य म्हणजे हे काका आणि आजोबा दोघेही दिवंगत झाल्यानंतर ही नफातोटय़ाची सगळीच गणिते बदलली. एकत्र कुटुंबातील एखाद्या भावाच्या प्रगतीचा वेग अधिक असल्यास काही कालानंतर त्यास कुटुंबापासून वेगळे व्हावेसे वाटत असेल तर ते जसे समजून घेणे गरजेचे असते तसेच राजकीय पक्षांबाबतही घडत असेल तर त्यात गैर ते काय? अशा वेळी मी तुला लहानाचा मोठा केला..वगैरे गळा काढणे हे घरगुती पातळीवर जितके हास्यास्पद आणि केविलवाणे दिसते तितकेच ते राजकीय पातळीवरही दिसते. तेव्हा आमच्यामुळे भाजप मोठा झाला हा सेना नेत्यांचा युक्तिवाद अगदीच शालेय ठरतो.
त्या तुलनेत दुसऱ्या बाजूला असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तसे प्रौढ आणि बनेल. अनेक घरोब्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी. त्यामुळे एकत्र येतानाच आपण हे एकमेकांच्या सोयीसाठी एकत्र नांदणार आहोत, ही खूणगाठ उभयतांच्या मनाशी होती. १९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म. त्यावर्षीच झालेली विधानसभा निवडणूक या पक्षाने काँग्रेसच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी सेना-भाजपच्या सरकारला हतवीर्य काँग्रेसकडून काही आव्हान उभे राहील ही शक्यतादेखील कोणाच्या..म्हणजे अगदी शरद पवार यांच्यादेखील..मनात आली नव्हती. परंतु त्या निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आणि त्या यशात वाटा उचलण्याची संधी सोडणे मूर्खपणाचे ठरेल हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अचूक ओळखले. वेगळे झालेले असले तरी मूळ रक्त आपलेच आहे, हे काँग्रेसलादेखील उमगत असल्यामुळे त्या पक्षाने राष्ट्रवादीचा हात अव्हेरला नाही आणि जनता म्हणू लागली त्यांची आघाडी झाली. सलग १५ वर्षे सत्ता भोगल्यानंतर आपण एकमेकांना आता काही देऊ शकत नाही याची जाणीव या दोन्ही पक्षांना झाल्यामुळे ते दोघेही नव्या जोडीदाराच्या शोधात दिसतात. काँग्रेसबरोबर राहून राष्ट्रवादीला आता एक पैचाही उपयोग नाही आणि घरचेच झाले थोडे अशी अवस्था असलेल्या काँग्रेसला राष्ट्रवादीचा आधार असला काय आणि नसला काय, काहीच फरक पडत नाही. तेव्हा १५ वर्षांच्या कामचलाऊ सहजीवनानंतर या दोघांची एकमेकांबाबतची चव गेली असेल तर ते आपण समजून घ्यावयास हवे. त्यांनाही वेगळे व्हावेसे वाटणे तसे नैसर्गिकच.  अनैसर्गिक आहे ते या घटस्फोटानंतर या राजकीय पक्षांनी आपापल्या जोडीदारांच्या नावे बोटे मोडणे. भाजपवगळता सर्वच पक्षांनी आपापल्या माजी जोडीदारांविषयी कुरकुर करावयास सुरुवात केली असून यात आघाडी घेतली आहे ती शिवसेनेने. खरे तर आपापल्या एकेकाळच्या जोडीदाराची असभ्य शब्दांत संभावना करणे म्हणजे आपली निवड चुकली असेच मान्य करण्यासारखे. ते मान्य असेल तर वेगळे होणे आवश्यकच नाही का? आणि ते जर आवश्यक असेल तर मग आपल्या एकेकाळच्या साथीदाराविषयी अपशब्द का वापरावे?
यातील सत्य हे की सागरात तरंगणारे ओंडके जसे एकमेकांना योगायोगाने भेटतात तसेच आपल्यालाही साथीदार भेटत असतात. ते जवळ येतात ती एक लाट असते आणि दूर जातात त्यामागेही लाट असते. मग त्या व्यक्ती असोत वा राजकीय पक्ष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 4:27 am

Web Title: nothing wrong in maha break ups in shiv sena bjp alliance and congress ncp alliance
Next Stories
1 काजळमाया
2 अवकाशातील मंगळागौर
3 सुतावरून युती
Just Now!
X