‘उत्सवखोरांचा उन्माद’ हे संपादकीय (१० सप्टें.) सणांचे उत्सव कसे उपद्रवी होऊ लागले आहेत याचे यथायोग्य मूल्यमापन करणारे वाटले. आत्ताच संपलेल्या गणेशोत्सवातच सामूहिक मनमानीचे दर्शन घडत होते.
गणपती बघायला बाहेर पडलेले लोक रहदारीची फिकीर करत नव्हते. वाहनचालक नियमांची फिकीर न करता समोरून येणाऱ्या वाहनांपुढे जाऊन उभे राहत होते. पोलिसांच्या गाडय़ाही रहदारीत अडकून पडत होत्या. मिरवणुकीच्या दिवशी तर सारे रस्ते गणपतीच्या मोठमोठय़ा गाडय़ांनी अडवून रहदारीची तमा न बाळगता, भडक रोषणाईच्या लखलखाटात, डॉल्बीच्या ठणठणाटात, अवाजवी संख्येच्या ढोलपथकांच्या साथीने ‘भक्त’गण म्हणजेच मंडळांचे कार्यकत्रे जेवढे आचकट विचकट नाचून घेता येईल तेवढे नाचत होते. त्यातले बहुतांश मद्यप्राशन केलेले होते. ढोल वाजवण्याची बंदी प्रसारमाध्यमांतून न कळण्याएवढी उपनगरातली गणेशमंडळे निरक्षर नक्कीच नाहीत; पण त्यांनी सरळ ‘कानावर’ हात ठेवले आणि दुसऱ्यांच्या कानांना त्रास देत मिरवणुकीत ढोल वाजवून घेतले. पोलिसांबरोबरच्या बठकीत केलेले संकल्प धुडकावून रात्री बाराच्या पुढेही ढोल बडवत राहिले आणि पोलीस हवालदिल होऊन ते ऐकत राहिले. या साऱ्यांतून एकच बोध घेता येतो, तो म्हणजे उत्सव हे मनमानी करण्याचे परवाने आहेत आणि त्यासाठी पोलीस हे समाजाचेच घटक असल्याने त्यांनीही मनमानी करून दिली पाहिजे.
हा उन्माद कमी करण्यासाठी आता उत्सवपश्चात तरी पोलिसांनी सर्वच मंडळांवर कारवाईचा बडगा उचलायला हवा. उत्सवपूर्व बठकीत झालेले ठराव आणि मिरवणूक काळातले सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारावर जबरदस्त दंड ठोठावून त्याची तात्काळ वसुली करावी म्हणजे पुढे येणारे उत्सव, मिरवणुका यांवर थोडेफार नियंत्रण अपेक्षित करता येऊ शकेल. सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बठक घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावावी. पुढील उत्सवासाठी लेखी वचननामा घ्यावा, ज्यात पुन्हा अटींचा भंग झाल्यास मंडळाची परवानगी रद्द होण्याची तरतूद असावी.  मिळणाऱ्या दंडाची रक्कम अनाथ महिला-मुलांच्या संस्थांना मदत देण्यासाठी, फिरती वैद्यकीय पथके, शौचालये, वृद्धाश्रम यांसाठी वापरावी. थोडक्यात उन्माद आणि उत्सव यांतल्या सीमारेषांची जाणीव नागरिकांना वेळीच करून देणे गरजेचे आहे.

मंडळांकडून खर्च वसूल करावा
‘उत्सवखोरांचा उन्माद’ हा अग्रलेख ( १० सप्टें.) उत्सवखोरांच्या डोळ्यांत खरोखरीच झणझणीत अंजन घालील का, याची शंका वाटते, कारण अशा लोकांना सण, त्यांचे पावित्र्य, त्यांचा उद्देश याच्याशी काहीही देणेघेणे नसते. गणपती विसर्जन हा खरे पाहता हुरहुर लावणारा प्रसंग. आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ; पण बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे तथाकथित कार्यकत्रे जो उन्माद दाखवतात, तो उद्वेगजनक आहे. आमच्या येथील एका सार्वजनिक मंडळाने ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ ही आणि अशाच काही लावण्यांच्या तालावर विसर्जनाची मिरवणूक काढली होती.
या उन्मादाव्यतिरिक्त आपली काही सामाजिक जबाबदारी आहे. जसे की, या उत्सवानंतरची साफसफाई, मंडपासाठी रस्त्यावर पाडलेले छोटे खड्डे बुजवणे याचे भानही या कार्यकर्त्यांना नसते.  
अशा गोष्टींसाठी होणारा खर्च आता महापालिकेने, तर बंदोबस्तासाठी आलेला खर्च पोलिसांनी काही प्रमाणात तरी सार्वजनिक मंडळांकडून वसूल करावा आणि तो मूर्तीच्या उंचीच्या प्रमाणात वाढता असावा. खरेखुरे िहदुत्ववादी याला नक्कीच पािठबा देतील.
अभय दातार, ऑपेरा हाऊस, मुंबई</strong>

पोटार्थी धर्ममरतड, राडेबाज पुढाऱ्यांना कोण आवरणार?
‘उत्सवखोरांचा उन्माद’ हा अग्रलेख वाचताना प्रकर्षांने आठवण झाली ती डॉ. नरेंद्र दाभोलकरांची. अंनिसच्या भूमिकेची मांडणी करताना आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन प्रबोधन करताना, त्यांना व अजूनही समितीला प्रश्न विचारला जातो, ‘तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा शहाणपणा शिकवायला िहदू धर्मच मिळतो काय? इतर धर्माच्या अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाहीत, की तुम्ही घाबरता त्यांना?’ यावर डॉक्टरांचे प्रांजळ उत्तर असायचे, ‘या देशात िहदू बहुसंख्याक आहेत, त्यामुळे िहदूंच्या अंधश्रद्धासुद्धा त्या प्रमाणात बहुसंख्याक आहेत. आपल्या घराला उंदीर-घुशी लागल्या असताना त्या साफ करायच्या, की शेजाऱ्यांकडे बोट कसे दाखवावे?’ याही पुढे जाऊन ते म्हणायचे की, बहुसंख्याक म्हणून शांततेने वागणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे आणि इतर धर्मीयांना तसे वागण्यास प्रवृत्त करणे, ही आपली जबाबबदारीच आहे; पण ते ऐकताना उत्सवप्रियजनांच्या कपाळावर आठय़ा असायच्या. विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबतीत अडाणी-अशिक्षित आणि उच्चशिक्षित हे सारखेच अशिक्षित असतात. नवस फेडताना बोकडाचा बळी देणारा अडाणी खेडूत आणि इच्छापूर्तीसाठी नारायण नागबळी करताना सोन्याचा नाग अर्पण करणारे विद्यापीठाचे प्राचार्य यांच्यात फरक कसा करणार?
सामान्य लोक संवेदनशील आणि पर्यावरणप्रेमी असतातच, ही बाब कोल्हापुरातील ‘मूर्तिदान’ या उपक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाने पुन्हा दिसून आली आहे; पण त्यांना चिथावणी देणारे पोटार्थी धर्ममरतड, राडेबाज राजकीय पुढारी यांना कोण आवरणार? कारण हा उन्माद बंद झाला तर त्यांच्या राजकीय दुकानांचे काय होणार, हाच प्रश्न आहे.
अंकुश मेस्त्री, बोरिवली, मुंबई

मंगलमूर्ती पूजकांसाठी आणि मूर्तीपूजा न करणाऱ्यांसाठीही
गणपतीच्या मूर्ती पाण्यात विसर्जति केल्याने होणाऱ्या प्रदूषणाबद्दल पर्यावरणतज्ज्ञ आणि सजग नागरिक नेहमीच नाराज असतात. त्याऐवजी गणपतीचे विसर्जन वगरेंच्या भानगडीत न पडता एखादी घरातली मूर्ती घेऊन, तिच्याभोवती सजावट करून नंतर ती मूर्ती पुन्हा घरात ठेवण्याचा उपक्रम काही घरांत दर वर्षी केला जातो. हा एक स्तुत्य पायंडा असून त्याला उत्तेजन देणे आवश्यक आहे. विषारी रंग, अनेक वर्षे मातीत न मिसळणाऱ्या वस्तू इ. अनेक गोष्टींमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचण्याचा हा सर्वात चांगला उपाय आहे. तसेच  गणपतीच्या मूर्तीच्या उंचीविषयीसुद्धा काही निकष निर्माण करून उंचीच्या बेकार स्पध्रेला आळा घालणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषण वगरे अनेक विषय आहेतच.
मुख्य म्हणजे असे काही निकष निर्माण करायला वा त्यासंबंधी नियम करायला सार्वजनिक विरोध करून (जणू काही हा धर्मावर हल्ला होतो आहे असे भासवून) आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात काही धर्म-राजकारणी संघटना असतात. आपण गणपतीला एकीकडे बुद्धीची देवता म्हणत दुसरीकडे अनेक प्रकारे आपण समाजविरोधी वृत्तींना आणि त्यांच्या अ-विवेकी कृतींना पािठबा देत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.
आणि अर्थातच हे धर्मनिरपेक्ष वृत्तीने करणे आवश्यक आहे. पहाटेच्या वेळी येणारी मशिदीची बांगही तितकीच त्रासदायक असते. (कबिराने ‘अल्ला तेरा बहिरा है?’ असा प्रश्न विचारून काही शतके उलटूनही त्यात विशेष फरक नाही.) मात्र या साऱ्यांचा विचार करताना एखाद्या विशिष्ट धर्मावर (एकतर्फी) हल्ला करण्याचे माध्यम म्हणून ते वापरले न जाता सर्वच धर्माकडे आपली समदृष्टी हवी.
बाप्पांना  निरोप दिल्यानंतर नवरात्र, दिवाळीतले फटाके, होळी इत्यादींच्या आगमनाची तयारी आता करू या!
अशोक राजवाडे, मालाड, मुंबई

आधी उपद्रव कमी करा
‘उत्सवखोरांचा उन्माद’ हे संपादकीय (१० सप्टें.) वाचले. आपल्या देशातली ८० टक्के जनता िहदू धर्मीय आहे. त्यामुळे िहदू धर्मीयांच्या उत्सवांचा उपद्रव अन्य धर्मीयांना होत नाही, तर तो प्रामुख्याने िहदूंनाच होतो. स्वधर्मबांधवांना उपद्रव देऊन परधर्मीयांच्या उपद्रवाची भरपाई कशी होईल?
सणासुदीच्या उत्सवातील उन्माद आणि उपद्रव आधी ८० टक्के िहदूंनी कमी करावा. त्यानंतर संख्येने कमी असणाऱ्याला २० टक्के अन्य धर्मीयांच्या उपद्रवाकडे बोट दाखवता येईल.
आधी आपले घर स्वच्छ करावे, त्यानंतर इतरांच्या घरातल्या अस्वच्छतेचा विचार करावा, हे कळण्याइतके िहदू सुजाण आणि विवेकी असावेत, अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरू नये.
– प्रमोद तावडे, डोंबिवली