‘अल-जझीरा’च्या या तिघा पत्रकारांना प्रत्येकी सात वर्षे कैद आणि बाहर मोहम्मदला ‘शस्त्र बाळगल्याबद्दल’ आणखी तीन वर्षे कैद सोमवारी इजिप्तच्या न्यायालयाने दिली. पाश्चात्त्य देशांनी विनंत्या करूनही, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फताह अल-सिसी यांनी या तिघांना माफी देण्याचा अधिकार वापरणे नाकारले. सिसी यांच्या फौजांनी डिसेंबरात मुस्लीम ब्रदरहूडची निदर्शने कशी चिरडली, याचे या तिघांनी केलेले वार्ताकन, हाच त्यांचा गुन्हा! त्यावर पुढे, या तिघांनी पत्रकारितेच्या मर्यादाच कशा ओलांडल्या नि त्यांचे वार्ताकन इजिप्तच्या बदनामीसाठीच कसे होते, आदी राजकीयदृष्टय़ा प्रेरित आरोप ठेवण्यात आले. हे सारे बुद्धी शाबूत ठेवून पाहणाऱ्या जगाला प्रश्न पडला की खरोखरच हे तिघे एवढे धोकादायक आणि एवढे इजिप्तद्रोही होते का?
पीटर ग्रेस्टे गेली २५ वर्षे आंतरराष्ट्रीय पत्रकार आहे. मूळचा ऑस्ट्रेलियन, पण वयाच्या २३ व्या वर्षी काबूलमध्ये राहून तालिबानचा तेथील उदय त्याने पाहिला, पुढे बीबीसीचा वार्ताहर म्हणून सोमालियात गेला. सहकाऱ्याची हत्या जवळून पाहूनदेखील मोगादिशू या सोमाली राजधानीत राहण्याची हिंमत त्याने दाखवली. तेथे बीबीसीसाठी त्याने केलेल्या ‘लँड ऑफ अनार्की’ या वार्तापटाला अमेरिकी ‘पीबॉडी पुरस्कार’ मिळाला. पुढे सीएनएनसाठीही उत्तर आफ्रिकेतच काम करून, तो अल-जझीरासाठी सोमालियाचे वार्ताकन करू लागला. इजिप्तमधील यादवीवर अल-सिसींचा लष्करी रणगाडा कसा फिरतो आहे याच्या वृत्तसंकलनासाठी अवघे काही दिवस तेथे गेला असता, त्याच्यावर अटकेची पाळी आली.
मोहम्मद फाहमी मूळचा कॅनडाचा, पण इजिप्शियन वंशाचा. कॅनडात काही काळ उमेदवारी केल्यावर इजिप्तमध्ये पत्रकार म्हणून येऊन त्याने तेथील नागरिकत्वही मिळवले. बातमीदारीसोबत पाश्चात्त्य पत्रकारांसाठी दुभाषाचे कामही करता करता तो अल-जझीराचा वृत्तनिर्माता झाला. ‘इजिप्शियन फ्रीडम स्टोरी’ आणि ‘बगदाद बाउंड’ ही पुस्तके त्याने लिहिली. त्याची निरीक्षणशक्ती आणि राजकीय विचारांचा नव्हे तर लोकांच्या मनोभूमिकांचा पुरस्कार करण्याची त्याची पद्धत या पुस्तकांतूनही दिसते.
तिसरा बाहर मोहम्मद हा तुलनेने अपरिचित. तो इजिप्तचाच. तेथेच पाश्चात्त्य पत्रकारांना मदत करण्यात काही वर्षे घालवून अल-जझीराचा वृत्तनिर्माता झाला. लोकभावना आपण जगापर्यंत पोहोचवत आहोत, या जाणिवेने काहीसा भारण्याचा त्याचा स्वभाव. त्याच्या (२२ डिसेंबरपासून बंदच असलेल्या) ट्विटर खात्यावरही दिसून येणारे हेच गुण त्याला नडले.. घटनास्थळावर सापडलेली, हळवेपणाने खिशात ठेवलेली काडतुसाची एक निकामी पुंगळी, हा त्याचा ‘शस्त्रसाठा’ ठरला!