आनंद यादव यांनी वातावरण किती तापले आहे याचा अंदाज आल्यावर स्वत:चेच लिखाण झटकून टाकले आणि आपल्याच कादंबरीस अनाथ केले. न्यायालयाच्या टोकाच्या निर्णयाने त्यांच्या या कादंबरीचा अंत झाला, म्हणून दु:ख करण्याचे कारण नाही. परंतु त्यामुळे वारकऱ्यांचा काळ सोकावला, त्याची दखल घेणे गरजेचे ठरते.. 
मराठीतील काही नामांकित भिकार लेखनकृतीत आनंद यादव यांच्या संतसूर्य तुकाराम या पुस्तकाचा सहज समावेश व्हावा. हे पुस्तक अगदीच सुमार आहे ते काही त्यात संत तुकाराम यांच्यावर कथित वादग्रस्त मजकूर आहे, म्हणून नाही. ते ना आहे धड संशोधनपर लिखाण ना आहे ती पूर्ण ललित कलाकृती. ज्याला संशोधन म्हणतात ते करण्याइतकी बौद्धिक कुवत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा नाही आणि केवळ कल्पनेच्या आधारे साहित्यविहार करावा इतकी प्रतिभा नाही अशा प्राध्यापकी लेखकांचा मराठीत सुळसुळाट आहे. हे प्राध्यापकी लेखक जे शिकतात वा शिकवतात त्याच्यापलीकडे त्यांचे जग नसते. त्यामुळे प्राध्यापक होण्यासाठी आपण जे काही शिकलो त्यावर ही मंडळी उर्वरित आयुष्य काढतात. अर्थात हेही खरे की अशा कमअस्सल लिखाणासाठी प्राध्यापक असणे ही काही पूर्वअट असू शकत नाही. अन्यथा विश्वास पाटील आदींच्या लेखनाचा समावेश त्यात करणे अवघड झाले असते. संशोधित तपशिलात कल्पनाशक्ती बेमालूमपणे मिसळून एक स्वतंत्र कलाकृती निर्माण करणे हे कौशल्य आहे. ते यादव यांच्याकडे आहे, असे खचितच म्हणता येणार नाही. संशोधन वा प्रतिभा यातील एका वा दोन्ही आघाडय़ांवर उत्तम कामगिरी करणे सर्वानाच शक्य होईल असे नाही. ते आपल्याला जमले नाही, याबद्दल यादव यांनी कमीपणा मानायचे काही कारण नाही. एखाद्यास एखादी गोष्ट नाही जमत, तसेच हे. परंतु राजहंसाचे चालणे, जगी झाली या शहाणे, म्हणून काय कवणे चालोचि नये या वचनाप्रमाणे म्हणून अन्य कोणी काही लिहू नये असे म्हणता येणार नाही. घटनेने लेखनस्वातंत्र्याची हमी दिलेलीच आहे. पण प्रश्न निर्माण होतो तो संशोधनाचा आव आणला की. आपले लिखाण संशोधनाधारित आहे असा एकदा का दावा केला की त्या संशोधनाचा आगापिछा सादर करणे संबंधितांवर बंधनकारक ठरते. यादव आणि त्यांची संत तुकाराम सपशेल फसते ती या मुद्दय़ावर. आपली ही कलाकृती पूर्ण कल्पनाकृती आहे अशी प्रामाणिक भूमिका यादव यांनी घेतली असती तरी ते काही प्रमाणात सहानुभूतीस पात्र ठरले असते. तेवढा प्रामाणिकपणा त्यांना दाखवता आला नाही. मराठीत हे असे अनेकांचे होते. पूर्ण ललित म्हणून आपले लिखाण लक्षवेधी ठरले नाही तर त्यास संशोधनाचे ठिगळ लावले म्हणून तरी त्याची दखल घेतली जाईल असा विचार त्यामागे असतो आणि यादव यांनीदेखील यापेक्षा वेगळा काही विचार केला होता, असे म्हणता येणार नाही. त्यांची वादग्रस्त कादंबरी संतसूर्य तुकाराम ही फक्त संशोधनाच्या पातळीवर पोकळ ठरते असे नाही, तर त्यात कल्पनेचेही चांगलेच दारिद्रय़ आहे. तुकारामकालीन समाजरचना कशी असेल याचे कल्पनाचित्र यादव यांना रेखाटता आले नाही तर ते एक वेळ क्षम्य ठरावे. परंतु त्या काळातील समाजरचना कशी असणार नाही याचे तरी किमान भान एक ज्येष्ठ लेखक म्हणून यादव यांना असणे गरजेचे होते. ते त्यांना कसे नाही याच्या अनेक खुणा या कादंबरीत पदोपदी आढळतात. या सगळ्याकडे एक वेळ दुर्लक्ष करता आले असते. कारण कोणी किती हिणकस काम करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. परंतु यातील चीड आणणारी बाब म्हणजे स्वत:च्याच कलाकृतीस वाऱ्यावर सोडण्याचे यादव यांचे पाप. त्यांच्या या कलाकृतीतील काही तपशिलांबाबत वारकरी संप्रदायाने आक्षेप घेतला आणि यादव यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्तकरताना सुरुवातीला यांना कोणी तरी कादंबरी वाचायला शिकवले पाहिजे असा बाणेदारपणा दाखवणाऱ्या यादव यांनी वातावरण किती तापले आहे याचा अंदाज आल्यावर स्वत:चेच लिखाण झटकून टाकले आणि आपल्याच कादंबरीस अनाथ केले. तथापि त्यांच्या या कथित संशोधनाधारित कलाकृतीचा अंत झाला, म्हणून दु:ख करण्याचे कारण नाही. परंतु त्यामुळे वारकऱ्यांचा काळ सोकावला, त्याची दखल घेणे गरजेचे ठरते.
या मुद्दय़ावर वारकऱ्यांनी जे काही केले त्यास शुद्ध दंडेली असे म्हणावे लागेल. एरवी वैष्णव धर्माची पताका फडकावीत सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या संताची परंपरा सांगणाऱ्या या वारकऱ्यांनी या पुस्तकाबाबत जी असहिष्णुता दाखवली ती पाहता संत वाङ्मयाच्या परिशीलनाने व्यक्तीत बदल होतोच असे नाही, हे दिसून आले. वारकरी संप्रदायाचे असे एक संघटन आहे. अनेक विधायक उपक्रम त्यामार्फत सुरू असतात. परंतु डाउ केमिकल्स आणि यादव यांचे हे पुस्तक याबाबत या संघटनेचा दृष्टिकोन अजिबातच विधायक नव्हता. आपल्या विचारांना विरोध करणाऱ्याचा आवाजच दाबायचा ही धारणा राजकीय पक्षांचीदेखील नसते. असहिष्णू म्हणून ओळखले जाणारे राजकीय पक्ष वा नेतृत्वदेखील विरोधी मताचा, जबरदस्तीने का असेना, पण आदर करते. परंतु जी सभ्यता वा सुसंस्कृतपणा राजकीय पक्ष वा संघटना दाखवतात तितकी सहनशीलता वारकरी संप्रदायास दाखवता आली नाही. कोणत्याही प्रश्नास, विषयास वा मुद्दय़ास एकापेक्षा अनेक बाजू असू शकतात. परंतु मी म्हणतो तीच बाजू खरी असा उद्दामपणा दाखवण्याचे त्यांनी काही कारण नव्हते. वारकरी संप्रदायाच्या या वागण्याने कोणास तालिबान्यांची आठवण झाल्यास ते गैर म्हणता येणार नाही. खरे तर वारकरी संघटनांनी ही आगलावी भूमिका घेतली नसती तर या टाकाऊ पुस्तकाकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेही नसते आणि लुप्त होणाऱ्या अनेक पुस्तकांप्रमाणे तेही गायब झाले असते. परंतु या पुस्तकामुळे संतांच्या अस्तित्वालाच जणू धोका निर्माण होत असल्यासारखा कांगावा वारकऱ्यांनी केला. साडेतीनशे वर्षांच्या अव्याहत इस्लामी आक्रमणातदेखील वारकरी परंपरा टिकून राहिली. तेव्हा एका किरकोळ पुस्तकामुळे तिच्यापुढे आव्हान निर्माण होईल असे मानणे हे या पुस्तकाचे उदात्तीकरण करणारे आहे, हे वारकऱ्यांना लक्षात आले नसावे.    
यादव यांचे हे आणि लोकसखा ज्ञानेश्वर  ही दोन्ही पुस्तके नष्ट करा असा आदेश या प्रकरणी मंगळवारी पुण्यातील न्यायालयाने दिला तेव्हा न्यायव्यवस्था वारकऱ्यांच्याच मार्गाने जात असल्याचे दिसले. न्यायालयाने इतकी टोकाची भूमिका घेण्याचे मुळात कारण नव्हते. ती घेण्याआधी ही दोन्ही पुस्तके संबंधित न्यायाधीशांनी वाचली आहेत काय असा प्रश्न निर्माण होतो. ही पुस्तके फाडून नष्ट करा असा टोकाचा आदेश देण्याआधी न्यायालयाने साधकबाधक विचार करणे गरजेचे होते. घटनेच्या कोणत्या कलमाने त्यांना असा आदेश देता येतो? या प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या तुकाराम-वंशजांनी तर कहरच केला. देशात संत टीका प्रतिबंध कायदा हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. ते फारच हास्यास्पद. यातील साधा मुद्दा हा की एखाद्या व्यक्तीस एखादी व्यक्ती संत वाटली तरी सर्वानाच ती संत वाटेल असे नाही. काहींच्या मते आसाराम वा अन्य काही बापू हेसुद्धा संत आहेत. तेव्हा त्यांना टीका प्रतिबंधक कायदा लागू करणार काय? दुसरे असे की संतसुद्धा माणूसच असतो आणि सर्व मानवी गुणदोष त्याच्याही अंगी असतात. तेव्हा त्यांचे मूल्यमापनच होऊ नये हे म्हणणे अगदीच अतार्किक. आताच्या काळी संत तुकाराम असते तर त्यांनीदेखील ही मागणी नाठाळ ठरवून तिची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली असती.
तेव्हा आनंद यादव यांच्या पुस्तकाचे काय होते, हा मुद्दा नाही. तर त्यानिमित्ताने अन्य कोणाचीही.. अगदी वारकऱ्यांचीदेखील.. यादवी चालू देता नये. हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू