पवारांच्या शाई प्रकरणानंतर राज्यात विनोदाची जी आतषबाजी सुरू झाली, तिला निवडणुकांच्या इतिहासात तोड नाही. कुणाच्या घरी कोण काय खात होते, काय पीत होते, याचीही चर्चा या निमित्ताने झाली आणि राज्यातील अज्ञ जनतेच्या मनातील अनेक संभ्रम दूर होऊन राजकीय ज्ञानप्राप्तीचे असंख्य दरवाजेही खुले झाले..
लोकसभा निवडणुकीनंतर देशात सरकार कुणाचे यायचे ते येवो, पण ही निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना, अध्यक्षांना, रिमोट कंट्रोलांना आणि सर्व सर्वेसर्वाना आमची एक कळकळीची विनंती आहे. या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या काळापुरता ज्याला राजाचा मान मिळतो, त्या मतदारांचा प्रतिनिधी म्हणून अशी विनंती करण्याचा आमचा हक्क मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तरी कुणीच अमान्य करणार नाही, याची जाणीव असल्यामुळे आम्ही या सर्वाना एक साकडेही घालणार आहोत! सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षांच्या कडबोळ्यात तुम्ही कुठे असाल ते सांगता येत नसले तरी तुमचे जे खासदार उद्याच्या लोकसभेत बसणार आहेत, त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरते तरी काही तरी काम करावे, हा आमच्या विनंतीमागचा उद्देश आहे. सांप्रतकाळी देशात सर्वत्र विकासाचे वारे वाहत असतानादेखील, निवडणुकीच्या मैदानात मात्र विकासाचे नारेच दिले जात आहेत. काही ठिकाणी हा विकास पाहताही येत आहे, तर काही ठिकाणी विकासाच्या दाव्यांमुळे मतदाराची मानसिकता काहीशी द्विधा, संभ्रमित झालेली आहे. बँका आल्या, एटीएम आले, पेजरच्या जागी मोबाइल फोन आले आणि मोकळ्या मैदानांवर विमानतळ आले. रेल्वे आल्या आणि मोनो-मेट्रोही आल्या. त्यामुळे खरं तर आता मतदारांनी लोकप्रतिनिधींकडे काही मागावं आणि लोकप्रतिनिधीने मतदाराला काही द्यावं, असं काही उरलेलं नाही. एवढं सारं आसपास ओसंडत असताना, ते अनुभवण्याचं भरल्या पोटीचं सुख मिळावं यासाठी आता अन्नसुरक्षादेखील आहे. तरीही गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून काही उणीव आम्हाला जाणवत आहे, म्हणून ही तळमळ!
कारण, या विकासामुळेच आम्ही आमची मूळ संस्कृती हरवत चाललो आहोत. आज ज्यांनी नवमतदार म्हणून आपल्या नावाची नोंद केली असेल त्यांना वगळून, गेल्या दोनचार लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलंय त्या सगळ्यांना आठवतच असेल की विकासाची ही गंगा घरोघरी पोहोचण्याच्या अगोदरच्या काळात, गावागावांत पाणवठे होते. पुढे सार्वजनिक नळ योजना सुरू झाल्या. त्या वेळच्या दिवसांचे एक चित्र आज आमच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा तरळू लागले आहे. आम्ही उगीचच भूतकाळात रमतो, आम्हाला विकासाचे वावडे आहे, असेही काहींना वाटू लागेल. पण आम्ही विकासाचे खंदे समर्थक आहोत हे छातीठोकपणे सांगूनसुद्धा, आज आमची मने पाणवठे आणि सार्वजनिक नळ योजना गमावल्याच्या वेदनांनी सकारणच व्याकूळ झाली आहेत. सरकारांनी आपापल्या सत्ताकाळात ज्याप्रमाणे विकासाच्या काही योजनांसाठी काही जागा राखीव ठेवल्या, भले त्यावरील आरक्षणे नंतर व्यावसायिकरीत्या बदलली गेली असतील, उद्यानांसाठी राखीव भूखंडांवर व्यापारी संकुले उभी राहिली असतील, आरोग्य सेवा देण्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर पब संस्कृती फोफावली असेल किंवा शैक्षणिक संस्थांसाठी मिळालेल्या सरकारी भूखंडांवर आलिशान हॉटेले उभी राहिली असतील, तरीही त्या त्या वेळी त्या त्या जागा राखीव होत्या, तशाच सार्वजनिक नळपाणी योजनांसाठी काही जागा राखीव ठेवावयास हव्याच होत्या असे आम्हाला प्रकर्षांने वाटू लागले आहे. पाणवठेही आजकाल ओसाड पडले आहेत, आणि चव्हाटा हा प्रकार तर इतिहासातूनही पुसला गेला आहे. विकासाच्या प्रक्रियेमुळे आपण ज्या काही गोष्टी कायमच्या गमावल्याचे दु:ख आम्हाला आता आत्यंतिक तीव्रतेने जाणवू लागले आहे, त्यामध्ये चव्हाटा, पाणवठा आणि सार्वजनिक नळ या तीन गोष्टींना पहिले स्थान आहे. विकासाच्या नावाने इतिहासात दडविलेल्या या तीन गोष्टी पुन्हा एकदा जिवंत झाल्या नाहीत, तर भविष्यकाळ काय म्हणेल या चिंतेने आम्ही व्याकूळ आहोत. त्यामुळे, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, जी एक कळकळीची विनंती सर्वपक्षीयांना करावी असे आम्हाला वाटते, त्यासाठीच्या नमनाचे हे घडाभर तेल.
चव्हाटा आणि पाणवठा या देशाच्या कानाकोपऱ्यात किती जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत, त्याची चर्चा इथे करण्याची आमची आत्ता इच्छा नाही. कदाचित, तो इतिहास संशोधकांचा जिव्हाळ्याचा विषय ठरू शकेल. पण महाराष्ट्रात मात्र, चव्हाटा आणि पाणवठा ही ठिकाणे निर्विवादपणे सामाजिक जिवंतपणाचे पुरावे होते. आता पुन्हा त्याची गरज भासू लागली आहे, असे निवडणुकांच्याच निमित्ताने जाणवू लागले आहे. नव्या मतदारांना हे कदाचित माहीत नसेल, की पाणवठा आणि चव्हाटा या ठिकाणांवर गावाची धुणी धुतली जायची. ती शब्दश: कपडय़ांची धुणी तर असतच, पण त्याबरोबर धुलाईचा मौखिक कार्यक्रमही याच जागांवर पार पडायचा. त्याला उणीदुणी काढणे असेही म्हटले जायचे. या ठिकाणी काम करणाऱ्या हातांबरोबरच, जिभादेखील वळवळू लागत. त्यामुळे त्या काळी गावोगावी स्थानिक बातम्या देणाऱ्या वर्तमानपत्रांचीही फारशी गरज भासत नसे. कुणाच्या घरी काय चालले आहे, याची बित्तंबातमी देणारी चालतीबोलती वर्तमानपत्रे याच चव्हाटय़ांवर आणि पाणवठय़ांवरच वावरत असत. पुढे घरोघरी वर्तमानपत्रे येऊ लागली, दूरचित्रवाणीमुळे देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली धुणी धुणारा एक वर्गही उदयाला आला, तरीही त्या जागांनी पाणवठा-चव्हाटय़ाच्या उणिवा भरून काढलेल्या नाहीत. पण या जागांची आरक्षणेही बदलून गेली आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी चव्हाटे आणि पाणवठे भरू लागले आहेत, आणि तेथे उभे राहून जगाच्या साक्षीने एकमेकांची धुणी, उणीदुणी आणि उष्टीखरकटी काढण्याचे काम सुरू असलेले पाहावयास मिळू लागले आहे.
हे तीव्रतेने जाणवण्याचे कारणही निवडणुका हेच आहे. काही दिवसांपूर्वी, शरद पवार नामक महाराष्ट्रवादी नेत्याने शाईवरून विनोद केला, आणि तो विनोद आहे हे समजण्याआधीच त्यांनीच तसे जाहीर करून टाकले. तोवर पवार बोलतात म्हणजे खरेच असणार असाच साऱ्यांचा समज होता. खरे म्हणजे, विनोद हा त्यांचा पिंड नाही. सार्वजनिक ठिकाणी विनोद करण्याच्या भानगडीत पडण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे, शाई प्रकरणाच्या बातम्या सुरू झाल्या, तेव्हा पवारांचे पहिले नाव चुकीने घेतले जात असावे अशीही आम्हाला शंका होती. ती पुढे खोटी ठरली. मात्र त्यानंतर राज्यात विनोदाची जी आतषबाजी सुरू झाली, तिला निवडणुकांच्या इतिहासात तोड नाही, असे आम्हास जाणवत आहे. कुणाच्या घरी कोण काय खात होते, काय पीत होते, याचीही चर्चा या निमित्ताने झाली आणि राज्यातील अज्ञ जनतेच्या मनातील अनेक संभ्रम दूर होऊन राजकीय ज्ञानप्राप्तीचे असंख्य दरवाजेही खुले झाले. शिवाय, कोणता भाऊ किती चांगला याचे दाखले देण्यासाठी ज्या ऊर्जेने पवार सरसावले, त्यामुळे महाराष्ट्राची आणखी करमणूकही होऊ लागली आहे. बटाटेवडे आणि सूप हा वयोवृद्ध आजारी माणसाचा आहार योग्य की अयोग्य यावरही आता महाराष्ट्रात विचारमंथन सुरू आहे. लाखांच्या गर्दीसमोर जेव्हा अशी उणीदुणी आणि धुणी धुण्याचे कार्यक्रम केले जातात, तेव्हा मन जुन्या उणिवांच्या जाणिवेने खरंच भरून येते. म्हणूनच, सर्वपक्षीय नेत्यांना आमची एक विनवणी आहे, की सार्वजनिक नळ आणि पाणवठे पुनरुज्जीवित करा. ज्या ठिकाणी त्यासाठी जागा नसेल, तेथे जुनी आरक्षणे बदलून नव्याने आरक्षणे निर्माण करा. लोकसभेत बसणाऱ्या खासदाराचे काम काय, त्याने कोणती कामे करावीत, याची चर्चा नंतर करा; पण त्या खासदाराने आपापल्या मतदारसंघात तातडीने चव्हाटे आणि पाणवठे उभारलेच पाहिजेत, अशी आमची विनवणी आहे. कारण, पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका येत आहेत. त्याआधी हे काम करूनच टाका. इतिहास आणि भविष्यकाळही त्यासाठी तुम्हाला दुवा देईल!