वर्षांनुवर्षे एकाच वाटेने चालत असल्याने आम्हाला रस्त्यावरचे खाचखळगे इतके सवयीचे झाले आहेत की, डोळे मिटून चालतानाही आमचा पाय कधीच खड्डय़ात मुरगाळत नाही. इतकंच नाही, कुठल्या खड्डय़ातील गढूळ पाणी किती खोल आहे, किती वेगानं गाडी त्यात घातली की किती लांबच्या माणसांच्या अंगावर त्याचा फवारा उडतो, हेही आम्हाला पाठ आहे. गणराया, तू तर साक्षात परमेश्वर आहेस. वर्षांनुवर्षे तू आमच्याकडे येतोस, त्यामुळे आता तुलाही आगमनाचे आणि घरी परतण्याचे सारे रस्ते पाठ झालेले असतील. तुझ्या आगमनाचा, वास्तव्याचा आणि विसर्जनाचा काळ हा तर आमच्या गावातील खड्डय़ांच्या बहराचा वार्षिक हंगामच असतो. त्यामुळे तुलादेखील आता तुझ्या वाटेवरची ‘खड्डा न् खड्डा’ माहिती झालेलीच असेल. तरीदेखील आम्ही दर वर्षी, तुझ्या आगमनाच्या अगोदर आणि विसर्जनाच्या काळात, रस्त्यावरच्या खड्डय़ांची काळजी करतो. हे गणराया, तू सुखकर्ता आहेस. पण, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’, यावरही आमची श्रद्धा आहे. त्यामुळे, तू सर्वाना सुखाचे समान वाटप करू शकणार नाहीस, हेही आम्हाला मान्य आहे. तुझ्या आमगनाच्या चाहुलीने रस्ते कंत्राटदार सुखावतात, त्यांचे सुखाचे दिवस सुरू होतात आणि खड्डे बुजविण्याच्या वार्षिक कामासाठी राखून ठेवलेल्या कोटीकोटींच्या थैल्यांची तोंडेदेखील तुझ्या केवळ आगमनाच्या चाहुलीने मोकळी होतात, ‘टेंडरां’च्या निमित्ताने ‘पाकिटे’ भरली जातात, आणि कुणाच्या तरी घरात का होईना, सणासुदीचा आनंद साजरा केला जातो, यातच आम्हाला खूप समाधान वाटते. रस्त्यावरच्या खड्डय़ांचे काय, ते बुजवले जातील, पुन्हा पडतील आणि पुन्हा बुजविण्याची कंत्राटे वाटली जातील. दरवर्षी तू येतोस, तसेच खड्डेही येतच राहणार. तुझी पाठवणी करताना, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे प्रार्थना करतो. तशीच प्रार्थना ‘खड्डेभरू’ कंत्राटदार आणि त्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणाही तितक्याच मनोभावे करत असतील, याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. तू सर्वाचे ऐकतोस आणि दरवर्षी येतोस, त्या वेळी रस्त्यांची अवस्था पाहून, तुझ्या स्वागताला आम्ही साधे रस्तेदेखील नीट करू शकत नाही ही खंत मनात उचंबळून येते, आणि पोटात खड्डा पडतो. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान येणार असतील तर आमचे रस्ते चकाचक आणि गुळगुळीत होतात, हे आम्ही पाहिले आहे. प्रगत राष्ट्राचा कुणी प्रमुख येणार असेल, तर आम्ही रस्तेच काय, शेजारची झाडेदेखील धुऊन पुसून चकचकीत केलेली आहेत. पण तू तर आमचाच, दरवर्षी येणारा, घरचाच पाहुणा आहेस. आणि नाही तरी, घरी जाताना पाण्यातील लाटांबरोबर हिंदकळावे लागतच असेल ना? मग विसर्जनाच्या वाटेवरूनच त्याचा अनुभव सुरू झाला, तर बिघडलं कुठे? ‘पावला पावला’वर असा अनुभव घेऊन घरी परतशील तेव्हा कुणीतरी म्हणेलच ना, की, ‘मला बाप्पा पावला’!!