राज आणि उद्धव एकत्र दिसले त्याचे महत्त्व दोन समदु:खी बंधू एकत्र आले, यापेक्षा अधिक नाही. या दोघांतील एक सर्व असून दु:खी आहे तर दुसरा सर्वस्व गेल्यामुळे. हे असे एकत्र येणे, ही त्या दोन भावांची गरज आहे. महाराष्ट्राची नाही. याचे भान न सुटणे महत्त्वाचे..

वेदना जोडते. त्याचमुळे समान वेदना अनुभवणारे नकळतपणे एकत्र येत असतात. हे जसे वैयक्तिक आयुष्यात होते तसेच अनेक वैयक्तिकांनी भरलेल्या समाजकारणातही होत असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू. मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे दोघे बराच काळ एकत्र दिसले. साहजिकच त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोघे ठाकरे एकत्र येणार का यावर चर्चा-परिसंवाद झडू लागले असून स्वघोषित महाराष्ट्र हितवादी मंडळींकडून लगेच भावी समीकरणांची मांडणीदेखील सुरू झाली. हे दोघे एकत्र आले तर मराठी माणसाचे कसे भले होईल, महाराष्ट्राचे हित कसे साधले जाईल यावर दळण दळण्यास सुरुवात झाली आहे. या अशा उपद्व्यापांची संभावना शुद्ध शब्दांत करावयाची झाल्यास ती एकाच शब्दात करता येईल. बावळटपणा. थोरल्या ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आज जे काही झाले त्याचे गुऱ्हाळ आता बराच काळ सुरू राहील. किंबहुना तसे ते राहावे असाच या दोन बंधूंचा प्रयत्न असणार याबाबतही शंका बाळगायचे कारण नाही. तसा तो असण्यात काही गैर आहे, असेही नाही. परंतु प्रश्न आहे सध्या राजकीय जखमावस्थेत असणाऱ्या या दोन बंधूंच्या भेटीस महत्त्व देताना अक्कल किती गहाण टाकावी हा.    
याचे स्वच्छ कारण असे की, हे असे एकत्र येणे ही त्या दोन भावांची गरज आहे. महाराष्ट्राची नाही. याचे भान न सुटणे महत्त्वाचे. अलीकडे राजकीय आणि सामाजिक बरेवाईट हे एका व्यक्तीच्या हिताअहिताशी बांधायची सवय महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत बळावली आहे. त्यास माध्यमांनीही खतपाणी घातले. त्यामुळे रामदास आठवले यांच्या लाचार प्रयत्नांना यश येऊन त्यांना मंत्रिपद मिळाले तर दलितांचे भले, छगन भुजबळ यांच्यावर अन्याय म्हणजे ओबीसींवर अन्याय, पोरकट पंकजा पालवे मुंडे यांच्यावर टीका म्हणजे समस्त मागास जमातींवर टीका असे मानले जाऊ लागले आहे. एकंदरच समाजात सध्या बुद्धी गहाण टाकण्याचे प्रमाण वाढू लागले असून वरील उदाहरणे ही त्याचीच द्योतक आहेत. तेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे त्या दोघांची अपरिहार्यता आहे, हे ध्यानी घ्यावयास हवे. या अपरिहार्यतेस जागून ते एकत्र आले तर महाराष्ट्राचे भाग्य उतू जाणार आहे असे नाही आणि एकत्र नाही आले म्हणून महाराष्ट्र आपली गती गमावून बसणार आहे, असेही नाही. कारण या दोघांचे मूळ स्रोत असलेले शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे हयात होते तेव्हाही महाराष्ट्राची असली-नसलेली भाग्यरेषा ही शिवसेनेच्या बऱ्यावाईटावर कधीही अवलंबून नव्हती आणि यापुढे तर ती अजिबातच तशी असणार नाही. तेव्हा राज आणि उद्धव सोमवारी एकत्र दिसले त्याचे महत्त्व दोन समदु:खी बंधू एकत्र आले, यापेक्षा अधिक नाही.    
या दोघांतील एक सर्व असून दु:खी आहे तर दुसरा सर्वस्व गेल्यामुळे. शिवसेनेस या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. याचा अर्थ सत्ताधारी भाजपच्या पाठोपाठ आज विधानसभेत शिवसेनेचा क्रमांक लागतो. हा पक्ष भाजपबरोबर सत्तेत नाही. तो भाजपच्या विरोधात आहे. परंतु या पक्षाचा दैवदुर्विलास असा की, असे असूनही विरोधी पक्ष म्हणून तो ओळखला जात नाही. तो मान जातो तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसकडे. या पक्षाने विधानसभेत भाजपला प्रामाणिकपणे विरोध केला. त्याच वेळी विरोधी पक्षनेतेपद असलेली शिवसेना शेवटपर्यंत सत्तेत जाणार की नाही, याच गोंधळात सापडलेली दिसली. परिणामी सत्तेचे तूपही त्या पक्षाच्या हातून गेले, विरोधी पक्षीय भूमिकेसाठी लागते ते तेल काँग्रेसच्या चिमणीत गेले आणि हाती फक्त एकनाथ शिंदे यांच्या विरोधी पक्षनेता या कचकडय़ाच्या पदाचे धुपाटणे तेवढे राहिले. याचा परिणाम असा की फक्त शिवसेना नेते सोडले तर हा पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधी आहे, असे मानावयास कोणीही तयार नाही. यात सत्ताधारी भाजपदेखील आला. भाजपचे नेते आजही आमची सेनेशी सत्ता सहभागाबद्दल बोलणी सुरू आहेत, असे जाहीरपणे सांगत आहेत आणि त्याबद्दल शिवसेनेसह कोणाचाही कसलाही आक्षेप नाही. यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे अनंत गीते हे सेना नेते. ते नरेंद्र मोदी सरकारात मंत्री आहेत. म्हणजे मुंबईत शिवसेना भाजपच्या नावे बोटे मोडणार आणि दिल्लीत सत्तेत सहभागी होणार. त्यामुळे शिवसेनेच्या डोक्यावर ही विरोधी पक्षाची टोपी अद्याप तरी नीट बसलेली नाही.     
उद्धव ठाकरे यांचे जे विधानसभा निवडणुकीनंतर झाले ते राज यांचे लोकसभा निवडणुकीत झाले. एका बाजूला मोदी यांचे जाहीर गुणगान, तरी भाजपशी हातमिळवणी मात्र नाही. परंतु माझे उमेदवार निवडून आले तर मोदी यांना पाठिंबा देतील ही घोषणा. यामुळे ते नक्की कोणत्या दिशेला पाहात आहेत आणि त्यांना जायचे आहे कोणत्या दिशेने हेच मतदारांना कळेनासे झाले. त्यानंतर राज्य विधानसभा निवडणुकांत पुन्हा मोदी यांच्यावर हल्ला. या सततच्या सव्यापसव्यामुळे मतदारांच्या मनातील गोंधळ मात्र निश्चित कमी झाला. त्याचमुळे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांची दखलही घेतली नाही आणि विधानसभेत ती अशी घेतली की तीही घेतली नसती तर बरे झाले असते असे त्या पक्षास वाटावे. परिणामी वास्तव हे की आज विधानसभेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेकडे काही नाही आणि शिवसेनेकडे बरेच काही असूनही ते असून नसल्यासारखे आहे. याचा अर्थ या दोन्ही पक्षांना एका रिकामपणाने ग्रासलेले आहे. आपला पुढचा कार्यक्रम काय, हा प्रश्न चेहऱ्यावर घेऊन मनसे कार्यकर्ते आहेत आणि आपण भाजप झिंदाबाद म्हणायचे की मुर्दाबाद या प्रश्नाने शिवसैनिक चिंताग्रस्त आहेत.    
या वास्तवाच्या भानाने या दोघा ठाकरे बंधूंना एका व्यासपीठावर आणले. या मधल्या काळात जे काही घडले त्यामुळे आपल्याकडे संघटना आहे पण तिला पुढे नेईल असे नेतृत्व नाही, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली नसेलच असे म्हणता येणार नाही. आणि आपल्याकडे नेतृत्वाचे इंजिन आहे, पण या इंजिनाने ओढावेत असे संघटनेचे डबेच मागे नाहीत याचे भान राज ठाकरे यांना आलेले नाही, असेही मानता येणार नाही. या संदर्भात दोघांच्याही मनात शिवसेनेचा सुरुवातीच्या काळचा आठव अद्यापही कायम असेल. या काळात सेनेच्या हातून काही भरीव होईल अशा अपेक्षा होत्या. त्याचे श्रेय जितके कै. ठाकरे यांना जाते तितकेच त्यांनी निवडलेल्या काही आश्वासक सद्गृहस्थांनादेखील जाते. असे कोणी नामांकित सद्गृहस्थ आज या दोघांकडेही नाहीत.  
 ही वास्तववेदनेची कटू जाणीव उभयतांना एकमेकांकडे ढकलण्यासाठी कारणीभूत आहे. त्यापेक्षा अधिक काही त्यात नाही. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणे या घटनेचे वर्णन फारफार तर एकादशीकडे शिवरात्र गेली आणि तीही उपाशीच राहिली असेच करावे लागेल.