डावीकडून सुरुवात करायची, पुरोगामित्व आणि सत्ता चोखून झाले की राहिलेली साल आणि कोय घेऊन नव्या सत्तासोयरिकीसाठी कमरेचे गुंडाळून उजव्यांच्या कळपात जाऊन बसायचे, हा देशातील दलित राजकारणाचा नवीन प्रघात आहे. या उद्योगात ही डावीउजवी सव्यापसव्यी वळणे घेणारेच फक्त निलाजरे ठरतात असे नाही, तर सत्तासोपानावर दोन घटका विसावायला मिळावे यासाठी अशी वळणेवाके घेऊ देणारेही तितकेच बेजबाबदार ठरतात. रामविलास पासवान आणि भाजप हे यांचे ताजे उदाहरण. पासवान इतके दिवस चारा घोटाळाकार लालूप्रसाद यादव यांच्याशी सोयरिकीची बोलणी करीत होते. ती फिसकटली असावीत. कारण मुळात लालू हे काँग्रेसकडून जो काही चारातुकडा टाकला जाणार आहे, त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातला काही वाटा हा पासवान यांच्या झोळीत टाकला जाईल अशी व्यवस्था होती. परंतु काँग्रेसनेच लालू यांना फक्त भीक घातली आणि भिक्षेसाठी लटकवत ठेवले. तेव्हा लालूंनाच जे हवे होते ते मिळाले नसेल तर ते पासवान यांना काय देणार, असा प्रश्न होता. त्याचे उत्तर पासवान यांनी आपल्या पद्धतीने सोडवले. आता त्यांनी थेट भाजपशी बोलणी सुरू केली असून आपला भाजपबरोबर निकाह पक्का असल्याचे संकेत दिले आहेत. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आणि काँग्रेस असा तिहेरी घरोबा याआधी होऊ घातला होता. तो आता फिसकटताना दिसत असून पासवान भाजपच्या मार्गाने निघत असताना लालू यांच्या काही आमदारांनी नितीशकुमार यांच्याकडे पाहून डोळे मिचकावणे सुरू केले आहे. या मंडळींच्या उडय़ा-कोलांटउडय़ा पाहून निवडणुकांची चाहूल लागली की हे असे होतच असते अशी आपण समजूत करून घेऊ शकतो. तसे करण्यात काहीही हरकत नाही. उलट तो एक प्रकारचा प्रामाणिकपणाच ठरावा. आम्हाला सत्तेची भूक लागली आहे आणि ती भागवण्यासाठी जे काही प्रयत्न असतील ते आम्ही करू इच्छितो असे सांगण्यात काहीही गैर नाही. परंतु आपण जे काही करतो त्यास तात्त्विक मुलामा देण्याचा प्रयत्न या मंडळींकडून होतो, त्यामुळे त्यांचा समाचार घेणे भाग पडते. पासवान यांची राजकीय ज्वलनशीलता कधीच संपून गेली आहे. आता राहिलेला आहे तो निव्वळ कडबा. गेल्या विधानसभा निवडणुकांत पासवान यांच्या पक्षास बिहारात अनपेक्षित यश मिळाले. या यशाची तयारी आणि अपेक्षा खुद्द त्यांनाही नव्हती. त्यामुळे नितीशकुमार की भाजप की लालू की काँग्रेस, असा प्रश्न त्यांना पडला. परंतु नितीशकुमार आणि भाजप यांचे आपापसातच भागल्यामुळे त्यांना पासवान यांची गरजच राहिली नाही. त्यामुळे त्यांना नकळतपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावणे भाग पडले. या नंतरच्या राजकारणात नितीशकुमार यांनी खास बिहारी पद्धतीने पासवान यांना पद्धतशीरपणे खच्ची केले. त्यामुळे आपणच दलितांचे एकमेव तारणहार आहोत, हा त्यांचा तोरा मागे पडला. नितीशकुमार यांनी महादलित आयोगाची नियुक्ती करून दलितांमधल्या वेगवेगळय़ा २२ अनुसूचित जाती शाखांना आपल्याजवळ आणले. परिणामी पासवान पूर्ण निष्प्रभ होत गेले. इतके, की २०१० सालातील बिहार विधानसभा निवडणुकांत पासवान यांच्या पक्षाने लढवलेल्या ७५ जागांपैकी फक्त तीन जागांवर त्यांच्या पक्षाला विजय मिळवता आला. त्याआधीच्या लोकसभा निवडणुकांत पासवान यांची काय परिस्थिती होणार आहे, याची चुणूक दिसली होती. त्यांच्या पक्षाला बिहारातून एकही जागा मिळाली नाही आणि खुद्द पासवान यांनादेखील पराभव पत्करावा लागला. तेव्हा या अशा पासवान यांना मिळेल त्याच्या मागे जाणे भाग होते. तसे करणे ही त्यांची राजकीय गरज आहे, यात शंका नाही. तेव्हा प्रश्न पासवान यांचा नाही, तर त्यांना जवळ करू पाहणाऱ्या भाजपचा आहे.

सत्तेच्या वळचणीखाली राहणे ही जशी पासवान यांची गरज आहे तशीच ही सत्ता वळचण तयार होईल अशी परिस्थिती निर्माण करणे ही भाजपचीही गरज तयार झालेली आहे. तेव्हा मिळेल त्या मार्गाने बेरजेचे राजकारण करीत राहावे अशी त्या पक्षाची धारणा दिसते. पासवान यांना हाताशी धरणे हा याच धारणेचा भाग आहे. याआधी भाजपने या सत्ताकारणेच्या सोसात आपण कमी नाही, हे अनेकदा दाखवून दिले आहे. गत निवडणुकीत विद्याचरण शुक्ल यांच्यासारख्या नतद्रष्ट राजकारण्याशी हातमिळवणी करून आपण प्रसंगी किती वाकू आणि वळू शकतो हे भाजपने सिद्ध केले होतेच. आता तो पक्ष पासवान यांच्यासाठी पायघडय़ा घालताना दिसतो. वास्तविक पासवान ही काय चीज आहे हे भाजपने याआधीही अनुभवले आहे. हे पासवान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात मंत्री होते. दूरसंचार क्षेत्रात मनमोहन सिंग यांच्या सरकारात ए. राजा यांनी जो काही धुमाकूळ घातला त्याची सुरुवात पासवान यांनी करून दिली होती. अरविंद केजरीवाल आणि मंडळींनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या कंपनीसाठी वाटेल तितक्या लांब पायघडय़ा घालण्याचे पुण्य याच पासवान यांच्या नावावर आहे. पुढे २००२ सालातील दंगलीनंतर त्यांना निधर्मीवादाची उबळ आली आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पासवान प्रत्येक टप्प्यावर भाजपचा उल्लेख दंगलखोरांचा पक्ष असाच करीत आले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे हात रक्ताने माखले असून त्यांच्याविरोधात निधर्मीवाद्यांची व्यापक आघाडी उभी करण्याची हाक याच पासवान यांनी दिली होती. अशा आघाडीचे त्यांचे प्रयत्न अगदी अलीकडेपर्यंत होते. परंतु त्यांच्या या निधर्मी हाकेला ओ देण्यास फारसे कोणी उत्सुक नाहीत. कारण अशी बांग देणाऱ्यांच्या रांगेत मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी, जयललिता आदी मान्यवर पासवान यांच्या आधीपासूनच उभे असून त्यांचा आवाज पराभूत पासवान यांच्यापेक्षा अधिक मोठा आहे. त्यामुळे पासवान यांच्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नाही. परिणामी आपले हे निधर्मित्व तात्पुरते बाजूस ठेवण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. त्यांना आता भाजपची आठवण का आली, यास ही पाश्र्वभूमी आहे. सत्तातुर भाजपचीही एक एक खासदार जोडावा अशीच तयारी असल्याने पदरी पडले आणि पवित्र झाले असाच पवित्रा त्या पक्षाने घेतलेला आहे. यातील हास्यास्पद भाग असा, की पासवान यांना आपल्या पारडय़ात खेचल्याने दलित मते मिळतील, अशी आशा बाळगणे. मुळात पासवान यांच्याच मागे आता कोणी फारसे शिल्लक राहिलेले नाहीत. तसे नसते तर त्यांचा पराभव झाला नसता. तेव्हा पासवान यांची निधार्मिकता जेवढी बेगडी त्याहूनही अधिक बेगडी त्यांच्या मागे दलित आहेत, हे मानणे. तेव्हा इतक्या निष्प्रभ नेत्याला हाताशी धरून भाजप नक्की काय आणि किती मिळवणार हा प्रश्नच आहे.
या असल्या कोलांटउडय़ांमुळे या मंडळींचे राजकारण उघडे पडते. महाराष्ट्रात जी गोष्ट रामदास आठवले यांनी करून दाखवली ती देशाच्या पातळीवर करण्याचे श्रेय नि:संशय रामविलास पासवान यांना द्यावे लागेल. यानिमित्ताने अधोरेखित होते ते दलित राजकारणाचे हे असे आठवलेकरण. यातील क्रूर विनोद हा, की पासवान आणि आठवले या दोघांच्याही नावात राम आहे. एकाचा राम हा दास आहे तर दुसऱ्याचा विलास. परंतु दोघांच्याही राजकीय ताकदीने कधीच राम म्हटलेला आहे.