बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या काळात शिवचरित्र लिहिले त्या काळात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, इतिहासकार शेजवलकर अशी एकापेक्षा एक तगडी मंडळी कार्यरत होती. यातील एकाही इतिहासाभ्यासकाने बाबासाहेबकृत शिवचरित्रातील त्रुटी दाखवल्याचा इतिहास नाही.

या पुरोगामी महाराष्ट्राचे भाग्य थोरच म्हणायचे कारण शिवाजी शहाजी भोसले ही व्यक्ती क्षत्रियकुलावतंस होती आणि त्यामुळे अर्थातच ती ब्राह्मण नव्हती. नपेक्षा छत्रपती कसे अगदी सामान्य होते, त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न किती कचकडय़ाचे होते आणि केलेल्या लढाया किती लुटुपुटुच्या होत्या हे दाखवून देण्यात या बिनबुडाच्या पुरोगाम्यांनी आपली तोटकी बुद्धी खर्च केली असती. ती त्यांची संधी गेली. त्यामुळे ती हुकलेली संधी हा वर्ग बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारास विरोध करून वसूल करताना दिसतो. बाबासाहेबांना हा पुरस्कार दिला जाऊ नये अशी मागणी करणारे पत्रच या बुद्धिवंतांनी महाराष्ट्र सरकारला दिले आहे. बाबासाहेब हे प्रतिगामी आहेत, ते इतिहासकार कसे मुदलातच नाहीत, ते महिलाद्वेष्टे आहेत आदी कारणे या पत्रात सादर करण्यात आली असून त्यावर अशा काहींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या व्यक्तींची कर्तबगारी किंवा त्यांच्या बुद्धीची झेप त्यांच्याविषयी आदरानेच बोलावे अशी असती, तर बाबासाहेबांना पुरस्कार नको म्हणून पत्रक काढायला हवे ही उपरती होण्यासाठी या बुद्धिवंतांना आजपर्यंत वाट पाहावी लागली नसती. महाराष्ट्रातील या पुरोगामी वाचाळवीरांपेक्षा जितेंद्र आव्हाड हे अधिक बुद्धिमान आणि प्रामाणिक भासावेत अशी आजची परिस्थिती आहे. याचे कारण या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला जाग येण्याआधी या आव्हाड वा तत्समांची राजकीय कुंडली जागृत झाली आणि आपल्या अल्पस्वल्प बुद्धीस पटतील अशी कारणे देत त्यांनी बाबासाहेबांच्या महाराष्ट्रभूषणास विरोध सुरू केला. याचा अर्थ असा की ज्या महाराष्ट्रात एके काळी तटस्थ बुद्धिवंत हे येथील राजकीय नेतृत्वास मार्ग दाखवीत त्या महाराष्ट्रात आज बाल्यावस्थेतील राजकीय नेत्याची री ओढण्यात या विद्वानांना कोणतीही शरम वाटत नाही. अर्थात फार अपेक्षा करणेच चूक. कारण यातील अनेक जण वा त्यांच्या संस्था शरद पवार यांच्या नियंत्रणाखालील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेल्या शिध्यावर चालल्या आहेत, हा महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास आहे. त्यामुळे या बोलघेवडय़ांपेक्षा आव्हाड वा तत्सम हे अधिक प्रामाणिक तरी ठरतात. याचे कारण त्यांच्या विरोधामागील कारण स्पष्ट असते. ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण आहेत. तेव्हा या पत्रकबहाद्दरांनाही आवर्जून विचारावाच असा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान, चरित्रकथन करण्यात आयुष्य घालवणाऱ्या बाबासाहेबांचे आडनाव पुरंदरे नसते किंवा-  अधिकच स्पष्ट विचारायचे तर बहुजन समाजातील असते- तर या बोलघेवडय़ांनी त्यास विरोध केला असता काय? या बिनबुडाच्या विद्वानांनी बाबासाहेबांना विरोध करण्यासाठी जी कारणे जाहीर केली आहेत त्यांचा समाचार घेण्याआधी जाहीर न केलेल्या कारणाचा उल्लेख करणे आवश्यक होते. या पत्रकबहाद्दरांच्या जोडीला विरोध करणाऱ्यांत आणखी एक नाव म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचे. या ज्ञानपीठविजेत्याची भाषा उसनी घ्यावयाची झाल्यास त्यांना एक प्रश्न विचारणे सध्या गरजेचे झाले आहे. लेखकाचा लेखकराव होतो याबद्दल नेमाडे यांनी काळजी व्यक्त केली होती. परंतु मानमरातबापासून दूर राहण्याचे ढोंग करणाऱ्या, प्रसिद्धीपराङ्मुख असल्याचा आव आणणाऱ्या लेखकरावांचा उत्तरायुष्यात किरकोळ विदूषक का होतो, हा प्रश्न आहे. हे लेखकराव इतके अप्रामाणिक की ज्या कुसुमाग्रजांवर टीका करण्यात त्यांचे आयुष्य गेले त्या कुसुमाग्रजांच्या नावे लाखभर रुपयांसकट दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना त्यांना लाज का वाटली नाही? तेव्हा ज्या तऱ्हेने वाटेल त्या विषयावर नेमाडे सपासप भाष्य करीत सुटले आहेत ते पाहता त्यांना आगामी गणेशोत्सवांत मनोरंजनाच्या एकपात्री प्रयोगांसाठी निमंत्रणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या सर्वानी बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण देण्यास विरोध केला त्या कारणांविषयी.
बाबासाहेब हे इतिहास संशोधक नाहीतच, असे या सर्वाचे आग्रही प्रतिपादन आहे. ते तसे मांडण्याची सुरुवात केली पुरोगाम्यांचे तारणहार शरद पवार यांनी. वास्तविक पवारांचे राजकीय गुरू, अभ्यासू दिवंगत यशवंतराव चव्हाण हे बाबासाहेबांच्या शिवचरित्राचे खंदे प्रशंसक होते. इतकेच काय शिवचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटक कै. चव्हाण होते. परंतु चीनयुद्धाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना प्रकाशनास येता आले नाही. तेव्हा ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाचे निवेदक होते पु. ल. देशपांडे आणि त्या प्रसंगी जिजाबाईंवर विशेष कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकार होत्या सुनीताबाई. खुद्द बाबासाहेब स्वत:च आपण इतिहास संशोधक नाही, असे आयुष्यभर सांगत आले आहेत. आपण छत्रपतींचे कीर्तनकार आहोत, शाहीर आहोत हे त्यांनी कधीही लपवलेले नाही. सभासदाची बखर हा त्यांच्या शिवचरित्रलेखनाचा प्रामुख्याने आधार आहे. परंतु तरीही लक्षात घेण्यासारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या इतिहास संशोधक मंडळाच्या आधारे बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिले त्या संशोधक मंडळात ग. ह. खरे यांच्यासारखा चिकित्सक बुद्धीचा इतिहासकार होता. खरे यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांचे हस्तलिखित तपासले. तेव्हा त्यात काही त्रुटी असत्या तर त्या खरे यांनी दाखवून दिल्याच असत्या. आता खरे यांचे आडनाव हीच खरी त्रुटी असेल तर त्यास कोणाचा इलाज नाही. बाबासाहेबांनी ज्या काळात शिवचरित्र लिहिले त्या काळात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, इतिहासकार शेजवलकर अशी एकापेक्षा एक तगडी मंडळी कार्यरत होती. आजच्या पत्रकबहाद्दर पुरोगाम्यांपेक्षा या सर्वाच्या बुद्धिनिष्ठा वादातीत होत्या हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा तरी हे पत्रकबहाद्दर दाखवतील. तेव्हा या आणि अशा इतिहासाभ्यासकांनी बाबासाहेबांच्या शिवचरित्राची यथोचित दखल घेतली होती. आजच्या या बोलघेवडय़ा, माध्यमजीवी पुरोगाम्यांना वाटते त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जर उणिवा असत्या तर ते दाखवण्याइतका अधिकार या अन्य अभ्यासकांत नक्कीच होता आणि तसा तो दाखवला असता तर त्या चुका मान्य करण्याइतका प्रामाणिकपणा बाबासाहेबांच्या ठायी निश्चित आहे. परंतु यातील एकाही इतिहासाभ्यासकाने बाबासाहेबकृत शिवचरित्रातील त्रुटी दाखवल्याचा इतिहास नाही. बाबासाहेबांवरील आक्षेपामागील एक कारण दिसते ते दादोजी कोंडदेव या व्यक्तिरेखेविषयी. या दादोजींकडे बोट दाखवून बाबासाहेबांवर शिवाजी महाराजांचे ब्राह्मणीकरण केल्याचा आरोप केला जातो. तो करणारे इतके विचारशून्य आणि तर्कदुष्ट आहेत की ते एक बाब विसरतात. ती म्हणजे बाबासाहेबांना ब्राह्मण्याचेच गुणगान करावयाचे असते तर त्यांनी पेशव्यांची कारकीर्द निवडली असती. थोरल्या बाजीरावाचे युद्धकौशल्य – तो पेशवा असूनही – आजही युद्धकलेच्या अभ्यासात शिकवले जाते. तेव्हा शाहिरीतून ब्राह्मण्य पुढे आणणे हा बाबासाहेबांचा उद्देश असता तर थोरला बाजीराव कामी आला असता. खेरीज, मराठा साम्राज्य स्थापणाऱ्या शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचावा, प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा यासाठी बाबासाहेब पुरंदऱ्यांनी आयुष्याचे रान केले, हे कसे विसरणार? दुसरे असे की इतिहासाचे लेखन हे त्या त्या काळातील साधनांच्या आधारे केले जाते. त्यामुळेच नवनवीन साधने उपलब्ध झाल्यावर इतिहास नवनव्याने लिहिणे गरजेचे असते. तसे करावयाचे तर तेथे भावनांना थारा देऊन चालत नाही. ते बुद्धीचे काम. त्याच्या मागे उभे राहण्याची िहमत आजच्या या पत्रकी बुद्धिवानांत आहे काय?
या प्रश्नाचे जाहीर उत्तर देण्याइतकाही प्रांजळपणा या मंडळींकडे नाही. इतके दिवस पुरोगामित्वाच्या बुरख्यामुळे मिळत आलेल्या सरकारी चाऱ्यावर आणि लबाड माध्यमी पाण्यावर यांना मोठेपण मिरवता आले. यांची सगळी पुरोगामी हयात गेली ती काँग्रेसी नेत्यांच्या रमण्यात पळीपंचपात्री घेऊन उभी राहण्यात. राज्यातील आणि देशातील सत्ताबदलामुळे यांचे हे रमणे बंद झाले आणि पळीपंचपात्री कोरडी पडू लागली.
तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषणास विरोध करण्यामागील यांचे खरे कारण जे दाखवले जाते ते नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र ‘फडणवीस’ येतात आणि बाबासाहेब ‘पुरंदरे’ यांना महाराष्ट्रभूषण देतात, हा खरा यांचा पोटशूळ आहे. तो दूर करावयाचा असेल तर प्रामाणिकपणाशी प्रतारणा न करणाऱ्या बुद्धीस त्यांनी शरण जावे. वयाच्या या टप्प्यावर तरी या मंडळींनी विद्यासाधनेस सुरुवात करावी. त्यासाठी गरज वाटल्यास ब्राह्मण्यनिदर्शक मागास रूढी टाळून का होईना पण स्वत:चे मौंजीबंधन करून घ्यावे.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत