04 March 2021

News Flash

वाघच, पण वाघ नव्हे

सारे जग भारतात वाघांची संख्या कशी वाढली आहे हे सांगत असताना दै. लोकसत्ता मात्र महाराष्ट्र या वाढीत कसा पिछाडीवर आहे, हे सांगू पाहतो...

| January 22, 2015 12:32 pm

महाराष्ट्रात वाघांची गणना करायची गरजच काय, हा सवाल आम्हाला रास्त वाटतो. हे वाघच आमचे प्रतीक आणि आम्ही या वाघांचे प्रतीक असे हे परस्पर साहचर्य असल्यामुळे राज्यातील सर्वच वाघ आमच्या मागे आहेत, असे आम्ही मानतो. आता काही क्षुद्र वृत्तीचे लोक यावर म्हणतील की इतका वाघांचा पािठबा होता तर स्वबळावर सत्ता का आली नाही?
आम्ही व्याघ्रप्रेमी दै. लोकसत्ताचा जाहीर निषेध करीत आहोत. सारे जग भारतात वाघांची संख्या कशी वाढली आहे हे सांगत असताना दै. लोकसत्ता मात्र महाराष्ट्र या वाढीत कसा पिछाडीवर आहे, हे सांगू पाहतो, म्हणजे काय? महाराष्ट्र काय देशापेक्षा मोठा आहे की काय? तेव्हा साऱ्या देशातच जर वाघांची संख्या वाढत असेल तर ती महाराष्ट्रात मात्र वाढत नाही, असे सांगण्यात काय हशील? देशात जे घडते ते महाराष्ट्रातही घडणार असे मानून घ्यावे ना लोकसत्ताने. उगाच महाराष्ट्राच्या चष्म्यातून या वाघांकडे पाहायचे कारणच काय? महाराष्ट्राच्या सीमेवरच्या मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत ही संख्या वाढली. आणि महाराष्ट्रात मात्र कमी झाली, हे असे कसे म्हणता येईल? ज्यात त्यात महाराष्ट्राला घालूनपाडून बोलणाऱ्यांचा डाव या बातमीतून दिसून येतो.. महाराष्ट्राचे भले झालेले ज्यांना पाहवत नाही अशांचा एक मोठा वर्ग आहे.. त्या वर्गानेच ही बातमी दिली असणार, या बाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. वाघ हा आसपासच्या प्रदेशातून मोकाट िहडत असतो. कारण तो खरा केसरी आहे, पर्यटक नाही. तेव्हा मनाला येईल त्या प्रदेशात तो जाणार. आता कर्नाटकात गणना सुरू असताना नेमका तो त्या वेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेला नसेल कशावरून? मध्य प्रदेशातदेखील असेच झाले असणार, याकडे कसे दुर्लक्ष करणार? आता तिकडे गणना सुरू आहे, आपण ती झाल्यावर तिकडे जाऊ या हे वाघाला कसे कळणार? तो काय इकडची पंगत झाल्यावर तिकडच्या पंगतीत रांगेत उभा राहणारा भोजनभाऊ आहे की काय?  किंवा या पक्षाने नाही दिले तिकीट, तर ते घ्या दुसऱ्या पक्षाकडून असा विचार करणारा आयाराम गयाराम म्हणजे काही वाघ नव्हे. तो त्याच्या मर्जीनेच वागतो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की मोजले जात असतानाच्या मोक्याच्या क्षणी आपले अनेक वाघ आसपासच्या राज्यांत गेले असणार असा आम्हाला दाट संशय आहे. त्यामुळे त्या राज्यातल्या वाघांची संख्या वाढली असणार. आणि तसे झाल्यामुळेच आपल्या राज्यात वाघांची संख्या पुरेशा गतीने वाढत नसल्याचा निष्कर्ष काढला गेला असेल, असे आमचे पूर्ण अभ्यासांती झालेले मत आहे.
आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात वाघांची गणना करायचे कारणच काय? या राज्यात सव्वा दहा कोटी वाघ आहेत, असे आमचे आजोबा मानत. आजोबा जे मानत ते आमच्या वडिलांनादेखील पूर्णपणे मान्य असे आणि त्यामुळे ते आम्हालाही मान्य नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या घरात विचार करण्याचा प्रयोग एकटय़ा आजोबांनीच केला. आणि त्यांनी तो केलेला असल्यामुळे आपण त्यात कशाला वेळ घालवा, असे आमच्या वडिलांचे मत आम्हीही शिरोधार्य मानले. त्यामुळे त्यांचा, महाराष्ट्रात वाघांची गणना करायची गरजच काय, हा सवाल आम्हाला रास्त वाटतो. हे वाघच आमचे प्रतीक आणि आम्ही या वाघांचे प्रतीक असे हे परस्पर साहचर्य असल्यामुळे राज्यातील सर्वच वाघ आमच्या मागे आहेत, असे आम्ही मानतो. आता काही क्षुद्र वृत्तीचे लोक यावर म्हणतील की इतका वाघांचा पािठबा होता तर स्वबळावर सत्ता का आली नाही? पण सत्ता मिळवणे हे क्षुद्र माणसांचे स्वप्न असते. तो मोह वाघांना नसतो. त्याला रस असतो केवळ आपले वाघपण जपण्यात. तेव्हा सत्तेतील यशापयशाच्या फुटपट्टय़ांनी आमची व्याघ्रवृत्ती मोजता येणार नाही. आणि दुसरे असे की आम्हाला आमचे भक्ष्य शोधण्यासाठी आमच्या गुहेतून बाहेर एक पाऊलही कधी टाकावे लागले नाही, ते काय या वाघांची कृपादृष्टी असल्याशिवाय की काय? आमच्या घराण्यातील कोणालाही चार घास कमावण्यासाठी हात-पाय हलवावे लागलेले नाहीत. तरीही आम्हाला बक्कळ भक्ष्य मिळत गेले. ही केवळ आमच्या वाघांची कृपा. आमच्या नावाने हे वाघ बाहेर शिकार करतात आणि आमच्यासमोर त्या भक्ष्यातील आमचा वाटा आणून ठेवतात. काही छिद्रान्वेषी आमच्या वाघांच्या कृतीला खंडणीखोरी असे म्हणतात. ते आम्हाला अर्थातच मंजूर नाही. आता आमच्या पदरी इतके शूर वाघ नसते तर आम्हाला असे ‘देईल खाटल्यावरी’ असे आयते काही मिळाले असते काय? तेव्हा आम्ही आणि वाघ काही वेगळे नाही, हे मुदलात लक्षात घ्यायला हवे.
या वाघ संख्येच्या बाबतचे सर्वच निष्कर्ष आम्हाला अमान्य आहेत, असे नाही. काहींच्या मते महाराष्ट्रात वाघांच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे. हे मात्र आम्हाला मान्य करावे लागेल. संपूर्ण भारतवर्षांत ३६ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे किंवा कसे हे आम्हास ठाऊक नाही. नसल्यास महाराष्ट्र हा संपूर्ण एकच व्याघ्र प्रकल्प समजला जावा यासाठी आमचा प्रयत्न राहील. तसे झाल्यास वाघांची शिकार होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आणि शिकार काही केवळ बंदूक आणि काडतुसे यांनीच होते असे नाही, हे आपण जाणता. ती मंत्रिमंडळात सामील करूनदेखील होऊ शकते, हे आम्ही जाणतो. आता हे खरे की मुदलात या वाघांनी मंत्रिमंडळात जाण्याची गरजच नव्हती. आमचेही तसेच मत होते. पण आम्ही पडलो लहान. निवडणुका होईपर्यंत वडील आमचे ऐकत होते. पण आपले वाघांचे सरकार एकटय़ाच्या बळावर येणार नाही असे निकालानंतर स्पष्ट झाल्यावर वडिलांनी आमच्याशी बोलणेच टाकले. तेव्हा आमचा हा सल्ला काही त्यांनी ऐकला नाही. आम्हाला वाटत होते, वाघांनी कसे वाघासारखे राहावे. भक्ष्य मिळाले नाही म्हणून वाघ काय कोठे माधुकरी मागावयास जातो की काय?  छे! तो भक्ष्य मिळेपर्यंत उपाशी राहतो. आम्हीही वडिलांना तसेच म्हटले. की राहू आपण सत्तेबाहेर. यावर वडील आम्हाला रागे भरते झाले. त्यांचे म्हणणे असे की उपाशी राहणे वगरे जंगलातल्या वाघांना ठीक आहे, आपणास नाही. आणि दुसरे असे की आपल्या वाघांची शिकारीची सवय अलीकडच्या काळात साफ गेली आहे. पूर्वी ते शिकारी मोहिमेवर बाहेर पडत. अलीकडे चौकातल्या शाखांत बसूनच ते शिकार करतात. तेव्हा शिकारीची सवय गेलेल्या आपल्या वाघांच्या सुलभ उदरनिर्वाहासाठी त्यांना मंत्रिमंडळात पाठवले नाही तर त्यांच्या चाऱ्या-पाण्याची सोय बंद होईल आणि त्यांचे चारा-पाणी बंद झाले की आपले काय? तेव्हा आम्हालाही त्यांचे म्हणणे पटले आणि आम्ही आमच्या वाघांना मंत्रिमंडळात न पाठवण्याचा हट्ट मागे घेतला. परिणामी आमचे इतके वाघ एकदम कमी झाले. तेव्हा त्यामुळेदेखील वाघांच्या गणतीत महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी झाल्याचे आढळले असेल.
तेव्हा या मुद्दय़ात मात्र तथ्य असावे असे आम्हाला वाटते. परिणामी महाराष्ट्रातील वाघांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आम्हाला खात्री आहे, या संख्येत पुन्हा वाढ होईल. खरे तर त्या बाबत आम्हाला काळजी नाही. आमची चिंता वेगळीच आहे. ती म्हणजे आहेत त्या वाघांचे वाघपण जपायचे कसे, याची. या चिंतेने आमची झोप उडाली असून ती लागलीच तर म्याँव म्याँव करणाऱ्या आणि चारा खाणाऱ्या वाघांचे स्वप्न पडून आम्हाला दचकून जाग येते. आता तर साधे ट्विटरदेखील आम्हास आवडेनासे झाले आहे. वाघच, पण वाघ नाही ही अवस्था असह्य़च.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 12:32 pm

Web Title: satirical editorial on tiger numbers
टॅग : Tiger
Next Stories
1 पुनरावृत्ती नको
2 माध्यमांपुढील आव्हाने
3 केजरीवालांचा किरण
Just Now!
X