26 September 2020

News Flash

ख्रिस्तोफर ली

गेल्या शतकामध्ये साहित्यातून भयरसाचा अखंड पुरवठा करणाऱ्या ‘फ्रॅन्केन्स्टाइन’ आणि ‘ड्रॅक्युला’ या भयदूतांनी चित्रपडद्यावर जेव्हा धुमाकूळ घातला, तेव्हा जगभरातील प्रेक्षकांना या खलरत्नांची हादरवून टाकण्याची ताकद उमजली.

| June 13, 2015 12:27 pm

गेल्या शतकामध्ये साहित्यातून भयरसाचा अखंड पुरवठा करणाऱ्या ‘फ्रॅन्केन्स्टाइन’ आणि ‘ड्रॅक्युला’ या भयदूतांनी चित्रपडद्यावर जेव्हा धुमाकूळ घातला, तेव्हा जगभरातील प्रेक्षकांना या खलरत्नांची हादरवून टाकण्याची ताकद उमजली. पैकी ‘फ्रॅन्केन्स्टाइन’ लोकप्रिय असला, तरी बेला लगोसी या कलाकाराने  साकारलेल्या ड्रॅक्युलाइतकी मजल त्याला मारता आली नाही. पुढे ड्रॅक्युलाचा साडेसहा फुटी क्रौर्यावतार प्रेक्षकांच्या मनात आणि स्वप्नांत शिक्का बसावा इतका पक्का झाला, तो १९५८ साली आलेल्या ‘हॉरर ऑफ ड्रॅक्युला’मधील सर ख्रिस्तोफर ली यांच्या रांगडय़ा रूपामुळे.
बेला लगोसीने कित्येक दशके ड्रॅक्युला भूमिकेवर कोरलेल्या नावाचा दबदबा विसरायला लावण्याचे काम सर ख्रिस्तोफर ली या ब्रिटिश कलावंताने केले. या भूमिकेचा पगडाच जन आणि सिनेमानसावर इतका होता, की अगदी अलीकडेपर्यंत सिनेक्षेत्रातील ‘माइलस्टोन’ ठरलेल्या जवळजवळ सर्व कलाकृतींमध्ये ख्रिस्तोफर ली यांचे खलअस्तित्व अविभाज्य अंग होते. सुमारे २५० हून अधिक चित्रपटांमध्ये खलावेश गाजविणाऱ्या या कलाकाराचे भूमिकावैविध्य अचाट करणारे आहे. उलट गणतीने त्यांच्या भूमिका पाहिल्या तर ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मालिकेतील सारुमान, अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्डमधील धारदार आवाजाचा जबरवॉकी, चार्ली अ‍ॅण्ड चॉकलेट फॅक्टरीमधला डॉक्टर वोंका, स्टार वॉर्समधील काऊंट डुकू, जिना चित्रपटातील मुख्य महंमद अली जिना, ‘द मॅन विथ गोल्डन गन’ बॉण्डपटातील स्कारामांगा या ठळक भूमिकांमध्ये ख्रिस्तोफर ली हे चलनी खलनाणे सात दशके खणखणत राहिले. शेरलॉक होम्स, थ्री मस्केटर्स आणि ड्रॅक्युला याचा दुसरा भयावतार फ्रॅन्केन्स्टाइन या चित्रपटांमध्येही त्यांचे लखलखते अस्तित्व आहे. १९२२ साली जन्मलेल्या ली यांनी अगदी छोटय़ा भूमिकांद्वारे चित्रपटांत प्रवेश केला. रंगभूमीवर त्यांनी साकारलेल्या ड्रॅक्युलाच्या भूमिकेमुळे त्यांच्याकडे चित्रपटातील तीच भूमिका चालून आली. नेमका त्याच वर्षी त्यांचा फ्रॅन्केन्स्टाइनही दाखल झाला होता. पुढे अमेरिकेत गेल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला आणखी लखलखीत बनविले. दादा दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकारांच्या पंक्तीमध्ये या कलाकाराने स्वत:ला मुरवून टाकले. ऑपेरा गायक ही मूळ ओळख आणि आपल्याच भूमिकांना मागे टाकून नवी ओळख तयार करण्यात अखेपर्यंत मग्न असलेल्या या कलावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांनी साकारलेल्या ड्रॅक्युलाला मात्र मरणपंथ अशक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:27 pm

Web Title: sir christopher frank carandini lee
Next Stories
1 मुजीब रिझवी
2 हेमंत कानिटकर
3 विजय शर्मा
Just Now!
X