यात्रा, जत्रा, उरूस, जुलूस यांना ग्रामीण जनजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ भक्तिभावाचा सोहळा नव्हे, तर ग्रामीण अर्थकारणाशी त्यांचा संबंध असतो. काही दिवसांच्या या सोहळ्यातून ग्रामीण उत्पादनांची देवाणघेवाण, विक्री होते, अनेक स्थानिकांना तात्पुरते रोजगार उपलब्ध होतात आणि काही काळाकरिता तरी अनेकांच्या घरी पसा खुळखुळू लागतो. यासाठीच यात्रा किंवा जत्रांचे आयोजन होत असे. अलीकडे तशीच परिस्थिती राहिलेली नाही. जग जवळ आल्याने ग्रामीण भाग आणि शहरी संस्कृती यांच्या सीमारेषादेखील अतिशय धूसर झाल्या. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीत शहरीकरणाची झाक डोकावू लागली. जुन्या ग्रामीण परंपरांना शहरी साज चढू लागला आणि जत्रेसारखे सोहळेदेखील इव्हेन्ट म्हणून साजरे होताना दिसू लागले. या परिस्थितीत, जुन्या प्रथा-परंपरांचे नव्याने व्यवस्थापन करण्याची गरज मात्र कधी कुणीच्याच लक्षात आली नाही. त्याच, जुन्याच रीती, परंपरांच्या तालावर नव्या जत्रांचे सोहळे नाचू लागल्याने त्यांची पारंपरिक घडी मात्र विस्कटू लागली आहे. गेल्या काही वर्षांत, जत्रेच्या ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीचे प्रमाण आणि त्यामुळे देवाच्या दारी ओढवणारे मृत्यू पाहता, जत्रा, उरुसासारख्या सोहळ्यांचेदेखील नव्या नियमांनुसार व्यवस्थापन करण्याची गरज वाढू लागली आहे. कारण खेडी आणि शहरे यांमधील अंतर कमी होत आहे. एखाद्या गावी जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी लागणारा वेळ आता किती तरी पटींनी कमी झाल्याने गर्दीचा भार वाढत चालला आहे. अशा गर्दीला चेहरा नसतो. जत्रा, यात्रांमधील अशी वाढती बिनचेहऱ्याची गर्दी आणि त्यातून होणारे चेंगराचेंगरीसारखे प्रकार अलीकडे वाढतच चालले आहेत. काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्य़ात मांढरादेवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन काही बळी गेले. सातारा जिल्ह्य़ातच पाल येथे खंडोबाच्या जत्रेत देवाचा हत्ती बिथरल्याने भयचकित गर्दीत पळापळ सुरू झाली आणि त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविक महिलेचा मृत्यू ओढवला, अनेक जण जखमी झाले. अशा घटना घडल्या, की नेहमीप्रमाणेच गर्दीला शिस्त नसते असा ढोबळ निष्कर्ष काढला जातो. कारण, अशा ठिकाणी गोळा होणारी गर्दी ही असंघटित असते. बहुधा त्यामुळेच, अशा गर्दीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घेतली पाहिजे. मांढरादेवीच्या जत्रेत सुमारे चार लाख भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, तेव्हा या ठिकाणी केवळ २०० पोलीस बंदोबस्तासाठी हजर होते. साहजिकच, अनावर होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणणे अशा अपुऱ्या पोलीसबळाच्या आवाक्याबाहेरचे काम होते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता यात्रा-जत्रांची गर्दी केवळ देवाच्या भरवशावर सोडून चालणार नाही. बदलत्या वर्तमानाचा साज यात्रा-जत्रांसारख्या सोहळ्यांवरही चढू लागला आहे. त्यामुळे केवळ धार्मिक परंपरा एवढेच त्याचे स्वरूप राहिलेले नाही. नव्या रूपात साजरे होणारे हे इव्हेन्ट आता व्यवस्थापनशास्त्राच्या चौकटीत आणण्याची गरज आहे. ही गरजच खंडोबाच्या यात्रेतील दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.