रात्री सर्वजण थोडं लवकरच भोजनासाठी गेले. बाहेरच्या सुखद गारठय़ात गरम मूगडाळ खिचडी आणि कढी तसंच आलूपराठा असा छान बेत होता. खाता-खाता कर्मेद्रनं विचारलं..
कर्मेद्र : डॉक्टरसाहेब, ही सहा चक्रं, त्यांची शरीरातली स्थानं आणि अगदी त्या पिटय़ुटरीवरच्या डहाळ्या वगैरे सर्व वर्णन ऐकलं. पम या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी अ‍ॅनॉटमी सांगितली आहे, हे काही मला पटत नाही.
योगेंद्र : का?
कर्मेद्र :  मुळात त्या काळी इतकी शरीराच्या आतली रचना आळंदीसारख्या आडगावच्या विशीतील तरुणाला (हृदयेंद्र सात्त्विक संतापानं काही बोलू पाहता, त्याला अडवत) ओके.. तुझ्या मते भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला माहीत होती का, अशी मला शंका येते.
योगेंद्र :  मूळ गोष्ट अशी की जो योगबळानं ब्रह्माण्डाचं ज्ञान हस्तगत करतो, तो पिण्डाचं का नाही करणार? दुसरी गोष्ट अशी की कुंडलिनीच्या उध्र्वगामी प्रवासात जे ‘दिसलं’ त्याचं वर्णन माउलींनी केलंय. जे दिसलं त्याच्या रूपसाधम्र्याला अनुसरून रूपकं त्यात आहेत आणि कुंडलिनी जागृतीनंतरच्या प्रवासाचं वर्णन असलेला हा काही एकमेव अभंग नाही..
ज्ञानेंद्र : आणखी कोणता अभंग आहे?
योगेंद्र : मोगरा फुलला.. मोगरा फुलला.. फुले वेचता बहरू कळियांसि आला.. इवलेसे रोप लावियेले द्वारी.. तयाचा वेलु गेला गगनावेरी.. दाराशी म्हणजे मूलाधाराशी लावलेली वेल म्हणजे कुंडलिनी.. त्या वेलीवरचा मोगरा फुलणं म्हणजे एक-एक चक्र उमलणं.. कळ्यांना बहर येणं म्हणजे प्रत्येक चक्राच्या शुद्धीनंतर शक्ती मोकळी होणं, सुप्त शक्ती जागी होणं आणि तो वेल गगनावेरी म्हणजे सहस्रारात जाणं.. यात हाच तर प्रवास मांडला आहे!
हृदयेंद्र : विलक्षण!
ज्ञानेंद्र : फार छान..
डॉक्टर नरेंद्र : मोगरा फुललाचा हा अर्थ कधी जाणवलाच नव्हता..
कर्मेद्र : हा अर्थ बरोबर असो किंवा चुकीचा असो, पण हे कसं चार-पाच वाक्यात अभंग संपलासुद्धा! असा वेग असता तर एव्हाना दहा-पंधरा अभंग झाले असते..
योगेंद्र : बाबा रे, हे विवरण पटकन कळलं कारण ‘पैल तो गे काऊ’च्या अनुषंगानं या विषयाची आपण सखोल चर्चा केली होती..
हृदयेंद्र : आणि किती अभंगांचा अर्थ लावला, याला महत्त्व नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ म्हणतात ना? तसा एक जरी अभंग नीट समजला ना तर जगतानाही तो सोबत करू शकतो.
कर्मेद्र : पण पुन्हा माझा प्रश्न उरतोच की.. ‘पैल तो गे काऊ’ काय किंवा ‘मोगरा  फुलला’ काय, त्यात शरीरांतर्गत रचनेचा जो संकेत आहे, तशी अ‍ॅनॉटमी त्या काळी माहीत होती का?
योगेंद्र : पुन्हा तेच! मी काय म्हटलं, आता पहा हं, मी तुम्हाला अ‍ॅनॉटमी सांगतो, असा काही माउलींचा अभिनिवेश नाहीये. जे ‘पाहिलं’ तेच रूपकांच्या भाषेत उतरलं आहे. तिचा अ‍ॅनॉटमीच्या अंगानं आपण अर्थ तेवढा लावायचा प्रयत्न केला.
ज्ञानेंद्र :  बरं, त्या काळी अ‍ॅनॉटमी माहीत होती का, तर होतीच! त्या काळीच नाही, तर त्याआधी कित्येक हजारो वर्षांपूर्वी वेदकाळातही ती माहीत होती.
कर्मेद्र : ज्ञान्या, तुझंही वैदिक विमान उडायला लागलं?
ज्ञानेंद्र : जे लिखित आहे तेवढय़ापुरतंच मी सांगतोय. अथर्ववेदात केन सूक्त नावाचं एक सूक्त आहे. ‘केन’ म्हणजे कोणी. ‘हे कोणी केलं’ हा प्रश्न विचारत त्यात सर्व शरीरांतर्गत रचनाच मांडली आहे. शरीराची सर्व यंत्रणा, रक्ताभिसरण प्रक्रिया त्यात सविस्तर आहे. त्याशिवाय या हाडामांसाच्या देहात प्रेम अथवा विविध भाव कोणी रुजवले, असेही प्रश्न आहेत! पंडित सातवळेकरांनी संपादित केलेली प्रत माझ्याकडे आहे.
डॉक्टर नरेंद्र : चला, आता मला निघालं पाहिजे! तुम्हा चौघांचा पुढचा प्रवास कसा आहे?
ज्ञानेंद्र : आणखी एक-दोन दिवस आमचा मुक्काम आहे. त्यानंतर मी आणि योगेंद्र परतणार आहोत. हृदू आणि कर्मू अलाहाबादला जाणार आहेत.
डॉक्टर नरेंद्र : संगमावर स्नानाचा बेत आहे काय?
हृदयेंद्र : नाही. इलाहाबादहून मी गुरुजींच्या गावी जाणार आहे. कर्मू तिथून हावडय़ाला सासुरवाडीला जाणार आहे. वहिनी सध्या तिथेच आहेत, त्यांना घेऊन तो परतणार आहे.
डॉक्टरसाहेबांसह चौघं निघाले आणि आपल्या खोलीवर परतले.  हळुहळू सगळेच निद्रेच्या आधीन झाले. हृदयेंद्र मात्र जागाच होता.त्याला डॉक्टरसाहेबांचा प्रश्न आठवला, ‘तुम्हा चौघांचा पुढचा प्रवास कसा आहे?’ खरंच आपण काय-काय उत्तरं देतो, पण आपला पुढचा प्रवास आपल्याला तरी माहीत असतो का? हा भावधारेचा प्रवास आहे! अधिकच अगम्य, अतक्र्य.. भावसमुद्राकडे वेगानं निघालेला..
चैतन्य प्रेम