‘ऐसा मियां आथिला होसी। तेथ माझियाची स्वरूपा पावसी। हे अंत:करणींचें तुजपासीं। बोलिजत असें।।’ या ओवीत, माझ्या स्वरूपाचं दर्शन तुला पावसेत होईल, असा अर्थ सुशीला दिवाण यांना जाणवला. या ओवीत या अर्थाचा संकेत आहे, असं पत्र त्यांनी स्वामींना पाठविलं होतं. स्वामी हसले आणि ‘शब्द भक्ती अशी हवी,’ एवढंच म्हणाले!  (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ११३). आता स्वामींचे हे चार शब्दांचं वाक्य दिसायला किती साधंसोपं वाटतं, पण त्यात फार खोल अर्थ भरला आहे! शब्द भक्ती!! आपलं सगळं जीवन कसं आहे? ते शब्दमय आहे. जन्मल्यापासून आपण शब्दच ऐकतो आहेत, शब्दच बोलतो आहोत, शब्दांनीच कल्पना-विचार करतो आहोत, शब्दांच्याच माध्यमातून सर्वाधिक अभिव्यक्त होत आहोत. प्रत्येक शब्दाचा आपल्या अंतर्मनावर कमी-अधिक प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. शब्दांनीच आपल्याला धीर मिळतो, शब्दांनीच आपण अधीर होतो, शब्दांनीच आपण सुखावतो, शब्दांनीच दुखावतो, शब्दांनीच उभारी येते, शब्दांनीच खचतो! तेव्हा आपलं जीवन असं शब्दांच्या कह्य़ात आहे. अध्यात्माच्या वाटेवर आल्यावरही हे शब्द जुन्याच वाटांकडे नेण्याचा प्रयत्न करीत राहातात! म्हणून तर काहीजण विरंगुळा म्हणून किंवा अभ्यास वाढावा म्हणून सद्ग्रंथ वाचतात आणि त्यातल्याच शब्दांचा आधार घेत प्रापंचिक गप्पांत रमतात! पण जेव्हा त्या शब्दांचा खरा संकेत लक्षात येऊ लागतो किंवा त्याच शब्दांत आपल्या सद्गुरूशी ऐक्य साधण्याचा मार्ग शोधला जातो तेव्हा तो साधक शब्दाच्या माध्यमातून मूळ स्वरूपाशीच जोडलं जाण्याची भक्ती साधत असतो! भक्तीच्या पंथावर वाटचाल करतानाही पारमार्थिक शब्दांत जर आपण प्रपंचाकडे नेणारी वाट शोधत असू तर ती प्रपंच-भक्तीच आहे आणि पारमार्थिकच नव्हे, तर प्रापंचिक, भौतिक जगातील शब्दांतूनही आपण परमार्थाकडे जाणारी वाट शोधत असू तर ती शब्द-भक्ती, स्वरूप-भक्तीच आहे! आता ‘माझिया स्वरूपा पावसी’, म्हणजे पावसेतही मी स्वरूपस्थ आहे, या अर्थाचा दाखलाही स्वामींनी दिला आहे बरं! भगवद्गीतेचा मराठीतला व्यापक अवतार म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’. स्वत: श्रीकृष्णांनीच ‘ज्ञानेश्वर’ रूपात येऊन हे कार्य केलं, असं आपण म्हणतो. त्या आधारे ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा स्वामी स्वरूपानंद यांनी सोप्या मराठीत प्रासादिक व सहज असा जो अभंग-अनुवाद केला आहे, तो पाहाता हे काम माउलींचंच यात शंका उरत नाही! संपूर्ण ज्ञानेश्वरीची ‘अभंग ज्ञानेश्वरी’ आहेच, पण ‘अभंग अमृतानुभव’ आणि चांगदेव पासष्टीही आहे! माझा अनुभव असा आहे की, स्वामींच्या शब्दांचा आधार घेतला ना, तर माउलींचं मूळ वाङ्मय आकलनाच्या कक्षेत येतं आणि त्याची गोडी कळू लागते. घरात मोठय़ांसाठीचा जो स्वयंपाक असतो तोच आई लेकराला भरवते, पण प्रत्येक घास मऊसूत करून अतिशय प्रेमानं भरवते ना? तसंच आहे हे! त्यामुळे माझे स्वरूप पावसेतही आहे, हा अर्थ शब्दश:ही आहेच! स्वामींच्या साहित्याचं चिंतन जसजसं साधतं तसतसा माउलींचा बोधही म्हणूनच तर उमगतो!

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!