महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनभाऊ गडकरी यांनी गोदा उद्यानाच्या नूतनीकरणप्रसंगी नाशकातील सोहळ्यात एकमेकांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांचे निवडणुका पार पडेपर्यंत निर्माल्य होऊ नये, अशीच दक्षिणगंगा गोदामाईची इच्छा असली पाहिजे. या स्तुतिसुमनांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार, महायुतीमध्ये मनसे सामील होणार का, महायुतीची विशालयुती होणार का, या प्रश्नांशी प्रदूषणग्रस्त गोदामाईला फारसे देणेघेणे नाही. पण अशा राजकीय स्तुतिसुमनांची निर्माल्ये विसर्जित झाली, तर राजकारणाच्या प्रदूषणाचे ओझेही तिलाच वाहावे लागेल, हे त्यामागचे कारण असेल. राजकारण क्षेत्राचे वारे नेहमीच एकाच दिशेला वाहत नसतात. ते प्रसंगानुरूप दिशा बदलत असतात. ज्या दिशेला वारे वाहतील, त्या दिशेने वाहत जाणे अनेकदा राजकारणाच्या हिताचे असले तरी त्या वाऱ्यांसोबत वाहणाऱ्या किंवा तशी इच्छा असणाऱ्या साऱ्यांनाच ते वारे मानवतही नाहीत. काहींना सामावून घेण्यात ते वारेच नाखूश असतात. आता निवडणुका जवळ आल्याने हे वारे अधिकच वेगाने उलटसुलट वाहू लागले असतानाच परवा गोदातटीच्या ‘मनसे’च्या गोदा उद्यानाच्या ‘स्वप्नपूर्ती’प्रसंगी गडकरी आणि राज ठाकरे यांनी एकमेकांचे पोवाडे गायिले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या तमाम ‘जाणकार’ राजकीय निरीक्षक समूहांच्या भुवया उंचावल्या. एकदा भाजपच्या एका मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी मनसेला ‘महायुती’त आणण्याची प्रतिज्ञा केली आणि तेव्हापासून साऱ्या नजरा ‘विशालयुती’कडे लागून राहिल्या. पण नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ‘टाळी’ देण्याघेण्यावरून वादावादी झडली. खिडकीतून ‘डोळे मारण्याचे’ आणि त्यावर दटावण्याचेही प्रयोग झाले.. मग पुढे मुंडे यांनीही हे प्रयत्न सोडून दिले. असे असताना, अचानक गोदावरीच्या साक्षीने मनसेच्या मंचावर गडकरी अवतरल्याने, विशालयुतीच्या प्रयोगाचा दुसरा अंक सुरू होणार की काय, अशा आशाही या राजकीय जाणकारांच्या मनात जाग्या झाल्या. गडकरी यांच्या ‘ब्रिजभूषण’ कर्तृत्वाचा राज यांनी गौरव करावा आणि राज यांचाच खंबीर पाठिंबा मिळाल्यानेच आपले कर्तृत्व बहरले, असे सांगत गडकरी यांनी ‘राजऋणा’चा कृतज्ञ उल्लेख करावा, यामुळे आता विशालयुतीच्या स्वप्नपूर्तीची मुंडे यांच्या हातून निसटून गेलेली सारी सूत्रे गडकरी यांच्या हाती गेली, अशा शंकाही व्यक्त होऊ लागल्या. मनसेच्या मंचावर गडकरी आल्याने रालोआची विश्वासू साथीदार असलेल्या शिवसेनेत अस्वस्थता सुरू झाली आणि श्रेयभयाच्या मळमळीने भाजपमधील काहींना ग्रासले. यापलीकडे काही होण्याच्या शक्यता धूसरच असतानाच, ‘झाले गेले गोदेला मिळाले’, असा सूरही ‘गोदापार्का’त कुठेतरी उमटून गेल्याची चर्चा सुरू झाली. गोदावरीच्या धास्तीचे हेदेखील एक कारण असावे.. ‘झाल्यागेल्या’पैकी जे जे नको, ते सारे ‘गोदार्पण’ करण्याच्या परंपरेची बाधा राजकारणालादेखील झाली, तर गोदावरीच्या प्रदूषणाचा विळखा आणखीनच घट्ट होईल, हे या धास्तीचे मूळ असावे. अगोदरच गोदावरी प्रदूषणामुळे ‘बेजार’ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गोदेचे पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हानच पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी दिल्यामुळे, आता खरोखरीच आणखी काही ‘झालेगेले’ गोदेतच विसर्जित झाले, तर काय होईल, या चिंतेने पर्यावरणवाद्यांचीही झोप उडाली असेल.. सारे झाले गेले गोदार्पण करून प्रदूषण आणखी वाढवू नका, अशीच त्या गोदावरीचीही इच्छा असेल. प्रदूषणग्रस्त गोदामाईचे अश्रू कोणास दिसणार नाहीत, पण त्या इच्छेचा आदर केला पाहिजे. निवडणुकांच्या तोंडावर गोदेचे प्रदूषण आणखी वाढवणे कोणास परवडणारेही नाहीच!..