सत्तेची एकदा चटक लागली की सोडता सोडवत नाही. मग ती येनकेनप्रकारेण आपल्याच हाती कशी राहील यासाठी राजकारणी झपाटले जातात. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. नातेवाईक असो वा मित्र; त्यांना मग सत्ताप्राप्तीच्या मार्गात कोणीही आपलासा वाटतो. किंवा अगदी त्याच्या उलटेही होते.. अशाच खेळाची ही कथा..
लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले आहे, आता पुढचे काम नवनियुक्त सरकारला करायचे आहे. आपल्याकडच्या निवडणुका म्हणजे जगासाठी एक आश्चर्यच असते. म्हणजे बघा, खंडप्राय देश, त्यात ८० कोटी मतदार, त्यांना निवडता येणारे ५४३ लोकप्रतिनिधी, एवढय़ा मोठय़ा देशात निवडणुका घ्यायच्या म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. हां, आता त्यात गरप्रकार घडलेच नाहीत असे नाही. तब्बल ३१३ कोटी रुपये बेनामी रक्कम आणि लाखो लिटर दारू जप्त करण्यात आली, पेड न्यूजची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आणि काय काय.. हे झाले पसा आणि दारूचे. निवडणुकीच्या िरगणात असलेल्या उमेदवारांनी अकलेचे तारे तोडले ते वेगळेच. मात्र, एवढे सारे होऊनही अखेरीस निवडणुका शांततेत पार पडल्या आणि शांततेत सत्तांतर झाले. म्हणूनच तर देशोदेशींच्या प्रसारमाध्यमांना आपल्याकडील लोकसभा निवडणुकांचे अप्रूप वाटत असते. निवडणुका कशा होतात, मतदार आणि निवडणुकीतील उमेदवार, राजकीय पक्ष हे कोणत्या मुद्दय़ावर प्रचार करतात इत्यादी इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी विदेशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या कालावधीत देशात ठाण मांडून असतात. देशातील प्रसारमाध्यमेही यात पुढे असतात, हे वेगळे सांगायला नको. थोडक्यात काय तर लोकशाहीतला हा सर्वात मोठा सण जवळून अनुभवण्याची प्रत्येकालाच हौस असते. लेखकूंसाठी तर ही मोठी पर्वणीच. या सणाचा फायदा घेत कुणी संस्मरणांचं पुस्तक लिहून त्याला राजकीय रंग देतं, कुणी दिग्विजयाकडे चाललेल्या नेत्याचा चरित्रकार होऊ पाहतं. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ही पुस्तके प्रसिद्ध होतात आणि त्यातील काही उतारे हेतुत: प्रसिद्ध केले गेल्याने अपेक्षित वादळ उठून, पुस्तक हातोहात खपण्याची बेगमी होते..
..अनिरुद्ध भट्टाचार्य यांचे ‘द कँडिडेट’ हे पुस्तक मात्र या पठडीतले नाही. ही कोणत्याही वाममार्गाचा वापर न करता निवडणूक लढवणाऱ्या नायकाची कथा आहे. म्हणजे ती कपोलकल्पितच असणार.. होय. ही कादंबरीच. पण भारतीय राजकारणाचे वातावरण मात्र तंतोतंत खरे. वास्तवातलेच.
जयदीप बॅनर्जी हा या कादंबरीचा नायक. अमेरिकेत दोन दशके मानाच्या पदावर नोकरी केल्यानंतर मंदीचे कारण पुढे करत जयदीपला अचानक नोकरीवरून काढून टाकले जाते. नोकरी गमावलेल्या, पन्नाशीला टेकलेल्या जयदीपचा संसारही तुटायच्या मार्गावर असतो. यातून काही काळ विश्रांती मिळावी, मनाला उभारी यावी यासाठी जयदीप भारतात परतायचे ठरवतो. दिल्लीत आपल्या आई-वडिलांकडे काही काळ राहून मग पुढचा निर्णय घ्यायचा असे ठरवूनच जयदीप मायदेशी पोहोचतो. दिल्लीत जयदीप त्याचा बालमित्र गोवर्धन राय ऊर्फ राजा याला भेटायला जातो. हा राजा असतो सत्ताधारी पक्षाचा खासदार, त्यात मंत्रीही. मात्र, एका घोटाळ्यात अडकल्याने श्रेष्ठी त्याच्यावर नाराज असतात, आणि त्याचे मंत्रिपद धोक्यात आलेले असते. अशा वेळी जे इतर लोकप्रतिनिधी करतात तेच राजा ठरवतो. पश्चिम बंगालमधील नारायणपूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा राजा सोनार बांगला पार्टी नावाचा स्वतंत्र पक्ष काढण्याच्या मानसिकतेत असतो. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतात. त्यामुळे स्वतंत्र चूल मांडून निवडणूक लढवायची आणि निवडणुकीनंतर जो पक्ष सत्तेत येईल त्याला पािठबा दर्शवायचा अशी राजाची रणनीती असते. नेमका याच वेळी जयदीप त्याच्या भेटीला जातो. सहज म्हणून भेटायला गेलेल्या जयदीपलाच राजा नारायणपूरमधून निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह धरतो. निवडणूक कशाशी खातात याची काहीही माहिती नसलेला जयदीप अर्थातच राजाची ही मागणी धुडकावून लावतो. मात्र, हळूहळू राजा त्याच्या गळी आपली योजना उतरवतोच. अखेरीस जयदीप नारायणपुरात जाऊन उमेदवारी अर्ज भरतो. राजाची योजना फसते का, जयदीप निवडणूक जिंकतो का, तो पुन्हा अमेरिकेला जातो का, त्याच्या संसाराचे काय होते याची उत्तरे मिळवण्यासाठी ‘द कँडिडेट’ हातात घ्यायला हरकत नाही.
नारायणपुरात निवडणूक लढवताना अमेरिकी जीवनशैली अंगवळणी पडलेला जयदीप भारतीय निवडणुकीत वापरावयाचे त्याच्या इलेक्शन मॅनेजर्सनी सुचवलेले सर्व हातखंडे धुडकावून लावतो. या बंगाली मतदारसंघात महिला मतदारांना साडी, तरुणांना फुटबॉल, इतरांना दारू, पसे दिले की मतांची बेगमी होते, असे मानणाऱ्या या इलेक्शन मॅनेजर्सना अर्थातच जयदीपचे हे वागणे खटकते. मात्र, राजाबाबूंचा मित्र म्हणून ते जयदीपला साथ देतात. मतदारसंघ िपजून काढताना जयदीपला खटकणाऱ्या गोष्टी, हमखास मतांसाठी करावे लागणारे राजकारण, प्रचाराची दिशा, कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते आपली, किती कम्युनिस्टांची, किती तृणमूलची याचा बारीकसारीक तपशील जयदीपचे सहकारी त्याला पुरवतात. मात्र, कोणत्याही वाममार्गाचा वापर न करता निवडणूक लढवण्याचा जयदीपचा निर्धार कायम असतो. त्याची पत्नी प्रचारात न दिसल्याने होणारी कुजबुज, विरोधक त्याच्याविषयी उठवत असलेल्या वावडय़ा हे सर्व आपल्याला अस्सल भारतीय निवडणुकीचा बाज याद करून देते. निवडणूक आणि प्रचाराचा माहोल उभा करण्यात लेखक अनिरुद्ध भट्टाचार्य यशस्वी ठरला आहे.
स्वत: लेखक पत्रकार असल्याने निवडणूक, प्रचार, लोकप्रतिनिधींच्या सवयी, त्यांचा स्वभाव यांचा तपशील लेखनातून डोकावतो. अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी स्वत: पत्रकारितेत असताना अनेक निवडणुका ‘कव्हर’ केल्या आहेत. राजाचे व्यक्तिचित्रण, राजकारणी त्यात केंद्रीय मंत्री असल्याने त्याला कराव्या लागलेल्या विदेशवाऱ्या, त्याचा बाहेरख्यालीपणा, त्यातून त्याचा उद्ध्वस्त झालेला संसार याचा तपशील ओघवत्या शैलीत अनिरुद्ध यांनी मांडला आहे. नारायणपुरातून आपल्याला उमेदवारी देण्यापेक्षा पत्नी किंवा मुलांना का नाही देत, या जयदीपच्या प्रश्नाला उत्तर देताना राजा त्याची व्यथा मांडतो. त्यामुळे जयदीपच का, बायको-मुलगा का नको या वाचकांच्या मनातील प्रश्नाला पूर्णविराम मिळतो. निवडणुकीच्या िरगणात जयदीपच्या विरोधकांचे व्यक्तिचित्रणही बेमालूम आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलने कम्युनिस्टांना हद्दपार केले असले तरी त्यांची मुळे टिकून आहेत. सलमान शेख या डाव्या उमेदवाराच्या प्रचारातून ते डोकावते. एका गुहेत ‘फ्रीलान्स कॉल सेंटर’ चालवणारा आधुनिक साधू हे वेगळेच प्रकरण या पुस्तकात काहीसे गूढ निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. पण ते तेवढय़ापुरतेच. कसेही करून सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी राजकारणी लोक कायकाय क्ऌप्त्या लढवतात, राजकारण कसे खेळतात हे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना हा डोंबाऱ्याचा खेळ नक्कीच आवडेल, यात शंका नाही.
द कँडिडेट
लेखक : अनिरुद्ध भट्टाचार्य
पेन्ग्विन प्रकाशन
पृष्ठे : ३०६
किंमत : २९९ रुपये