सामान्य, मध्यमवर्गीय माणसानं सुखी जगण्याची जी किमान स्वप्नं उराशी जपलेली असतात, त्यात काळानुरूप बदल होत गेले आणि जुन्या काळात चैनीच्या मानल्या गेलेल्या अनेक वस्तू पुढे गरजेच्या बनत गेल्या. कधी काळी पंखा ही चैनीची वस्तू होती, घरातील रेडिओ हे संपन्नतेचं प्रतीक होतं आणि फ्रीज, फोन, टेलिव्हिजन अशा वस्तू तर केवळ श्रीमंती हवेल्यांकरताच निर्माण झाल्या, अशी पक्की मध्यमवर्गीय समजूत होती. पुढे मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा आणि दैनंदिन जगण्याचा खर्च यांचा नेमका मेळ बसू लागला. बचतीच्या सवयी वाढत गेल्या आणि किमान गरजा भागवूनही काही पैसा हाती उरू लागला, तेव्हा या स्वप्नांची क्षितिजेदेखील आपोआप वाढू लागली. मग मध्यमवर्गातील घरामध्येदेखील रेडिओ आले, कालांतराने पंखेही बसले आणि पुढे फ्रीजदेखील आले. रामायण-महाभारतासारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालिकांची मोहिनी घराघरावर घिरटय़ा घालू लागली आणि दूरचित्रवाणी संच हीदेखील गरज बनून गेली. अशा रीतीने मध्यमवर्गीय राहणीमानाच्या कक्षा रुंदावत असताना, चैनीच्या म्हणून मानल्या गेलेल्या या वस्तू गरजेच्या कधी होऊन गेल्या तेदेखील कळले नाही. पुढे व्याख्याही बदलत गेली आणि दुचाकी, चारचाकी वाहनांनी चैनीच्या वस्तूंची जागा घेतली. मध्यमवर्गीयांच्या सुखी जगण्याची स्वप्नेही बदलू लागली. कुटुंबाला पुरेशी एक टुमदार गाडी दारासमोर हवी, अशी स्वप्ने पडू लागली. याच स्वप्नांवर स्वार होऊन एका गाडीचे देशात आगमन झाले होते. मारुती नावाच्या एका उद्योगाने देशात उडी घेतली, जपानी सुझुकीच्या तंत्रज्ञानाची अजोड जोड या उद्योगाला लाभली, आणि मारुती पावला.. परवडणाऱ्या किमतीतील ‘मारुती ८००’ या गाडीने घराघराशी जिव्हाळ्याचे नाते जोडले. ही गाडी असंख्य घरांच्या वैभवाचं प्रतीकही होऊन गेली. सामान्य कुटुंबांच्या जगण्याला या गाडीने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जगात वावरण्याचा आत्मविश्वासही दिला. पुढे सुझुकीनं अंग काढून घेतलं, तरी मारुती ८०० ला मात्र दिमाखात रस्त्यावरून धावताना कधीच कमीपणा वाटला नाही. दिमाखदार रूप, कमी देखभाल खर्च आणि कमाल इंधनक्षमता अशी ही बहुगुणी गाडी ज्याच्या दारी उभी राहिली, त्या प्रत्येक घराला तिने भरभरून आनंदच दिला. जागतिकीकरणामुळे जगण्याच्या कक्षा विस्तारल्या, जगाच्या बाजारपेठांनी भारतात पावले टाकावयास सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आलिशान गाडय़ांनी भारताचे रस्ते व्यापून टाकले. उदार आर्थिक धोरण, झपाटय़ाने वाढलेले औद्योगिकीकरण यांमुळे साहजिकच मध्यमवर्गीय उत्पन्नाचा स्तरदेखील उंचावला, क्रयशक्ती वाढली. मारुतीच्याच मालिकेतील नव्या गाडय़ांचे उत्पादन सुरू झाले आणि ‘मारुती ८००’ ला पर्याय म्हणून नवी ‘८०० ऑल्टो’ बाजारपेठेत दाखल झाली. ‘मारुती ८००’चे सारे गुण आणि नव्या जमान्याचं देखणेपण ल्यालेली ही गाडी मध्यमवर्गाला भावल्याने, ‘मारुती ८००’ कालबाह्य़ ठरली. म्हणूनच, या गाडीचे उत्पादन बंद होणार, या केवळ बातमीनेच, तिच्याशी नातं जडलेल्या आणि सुखाचे दिवस पाहिलेल्या असंख्य मनांना रुखरुख लागून राहिली होती. समाजात दिमाखानं वावरण्याचा विश्वास रुजविणाऱ्या या गाडीच्या मालिकेतील अखेरची गाडी उत्पादित होऊन गेल्या आठवडय़ात कारखान्यातून बाहेर पडली, तेव्हा तिच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्याला हातभार लागलेल्या मारुती कर्मचाऱ्यांनादेखील काही क्षणांचं हळवेपण आलं, ते त्यामुळेच!.. ‘मारुती ८००’ नावाची नवी कोरी गाडी यापुढे रस्त्यावर दिसणार नाही. पण ‘मारुती ८००’ नावाची एक इतिहासजमा झालेली गाडी, घराघरांच्या उत्कर्षांची ही पहिली पायरी मात्र, एक कहाणी म्हणून अजरामर होऊन राहील..