‘यापुढे शिवसेनेतील लोकशाही बंद, आणि मी म्हणेन तोच अंतिम शब्द’ असा इशारा देऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवे ते काय सांगितले, असा प्रश्न शिवसेनेच्या मुशीत घडलेल्या आणि शिवसेनेच्या सावलीतच ‘लहानाचे मोठे’ झालेल्या असंख्य शिवसैनिकांना नक्कीच पडला असेल. अगदी स्थापनेपासून कालपर्यंतच्या काळात, शिवसेनेत यापेक्षा वेगळे काय होते, अशी शंकाही अनेकांना छळू लागली असेल. कदाचित, काही शिवसैनिकांच्या दृष्टीने, शिवसेनेत लोकशाही होती किंवा नव्हती, हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसेलही. शिवसेनेत अंतिम शब्द ‘साहेबां’चाच, हे अलिखित सत्य, तमाम शिवसैनिकांनीही विनाअट स्वीकारलेले असताना, ते नव्याने प्रस्थापित केल्याच्या थाटात पुन्हा व्यक्त करण्याची उद्धव ठाकरेंना गरज का भासावी, याच्या शोधात आता अनेक धुरिणांनी डोकी खाजविण्यास सुरुवात केली असेल.. शिवसेनेच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या सावलीत सातत्याने राहिलेले मनोहर जोशी यांच्यासारखे नेते आणि शिवसेनेचे गाढे अभ्यासकदेखील, उद्धव ठाकरे यांच्या या नव्या घोषणेमुळे बुचकळ्यातच पडले असतील. ‘शिवसेना हे एक कुटुंब आहे, आणि बाळासाहेब ठाकरे हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम’, असे मनोहर जोशी यांनी त्यांच्या संशोधनपर प्रबंधातच कुठेतरी लिहून ठेवले आहे. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्यावर या कुटुंबाच्या प्रमुखपदाची जबाबदारी पडल्याने, हीच प्रथा पुढे सुरू राहणार, हे ओघानेच येणारे सत्य मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेदेखील स्वीकारले. त्यामुळेच तर, दसरा मेळाव्यात भर सभेत अपमानित अवस्थेत मंचावरून उतरून घरी परतण्याचा प्रसंग ओढवल्यानंतरही, मनोहरपंतांनी उद्धव ठाकरे यांचाच शब्द पाळला होता, हे अनेकांना पुन्हा एकदा आठवलेदेखील असेल. नंतर, दादरमधून किंवा अगदी कल्याण मतदारसंघातूनही, लोकसभेच्या उमेदवारीसाठी हरतऱ्हेच्या पक्षांतर्गत प्रयत्नांना फारसे यश येत नाही हे लक्षात आल्यानंतर, राजनाथ सिंह यांच्यापासून, नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊनही त्यांची राज्यसभेवरही वर्णी लागलीच नाही. कारण, शिवसेनेच्या ‘कुटुंबन्याया’नुसार उद्धव ठाकरे यांचा शब्दच अखेर अंतिम ठरला. प्रत्येकनिवडणुकीत उमेदवारीसाठी आपणच लायक आहोत असे समजणाऱ्या आणि आपलीच निवड व्हावी याकरिता ‘मातोश्री’वर डोळे लावून बसण्याची सवय जडलेल्या अनेकांना उद्धव ठाकरेंच्या या नव्या घोषणेचे आश्चर्य वाटले असेल. पण ‘लोकशाही बंद’ करण्याचा उद्धव ठाकरे यांनी नव्याने घेतलेला हा जुनाच पवित्रा पक्षातील अलीकडच्या काही घडामोडींशी संबंधित आहे. शिवसेनेच्या या कुटुंबात काहीतरी धुसफूस सुरू असल्याचे अनेक संकेत गेल्या काही वर्षांंपासून मिळत होते. या कुटुंबातून सर्वात अगोदर छगन भुजबळ बाहेर गेले, तेव्हा तो आघात शिवसेनेने कठोरपणे पचविला. त्यानंतर घराबाहेर पडणाऱ्यांची जणू रीघ लागली. राज ठाकरेही बाहेर पडले. पण तेव्हा सावरण्यासाठी बाळासाहेबांचा आधार होता. त्यांच्या पश्चात मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या गळतीमुळे शिवसैनिकांच्या निष्ठेचीच कसोटी लागली, आणि त्यांना शपथ घालून एखाद्या भावनिक धाग्याने घट्ट धरून ठेवण्याची धडपडही सुरू झाली. ‘उडून गेले ते कावळे, राहिले ते मावळे’ अशी स्वतचीच समजूत काढत घर शाबूत ठेवण्याचे प्रयत्न करताना केवढी कसरत करावी लागते, हे त्या अनुभवातून जाणाऱ्याखेरीज अन्य कोणास समजूच शकणार नाही. बाळासाहेबांनादेखील ती कसरत करावी लागली होती. त्यामुळेच, घरटय़ातून उडून जाणाऱ्यांची ‘कावळे’ म्हणून उपेक्षा करण्याआधी, ‘चिमण्यांनो परत फिरा’ अशी आर्त साददेखील त्यांनी घातलीच होती. आज कदाचित ती सादही शिवसैनिकांना आठवली असेल..